STORYMIRROR

Arati Patil

Others

3  

Arati Patil

Others

चिंब

चिंब

2 mins
178

अचानक पाऊस आला..

तुझी आठवण आली

पावसात तुला भिजणे भारी आवडे

आणि मला तुझ्याकडे पाहत राहणे

लहान मुलांप्रमाणे तू

पावसात भिजायचीस

मला ही ओढून भिजवायचीस 

तुझ्याकडे रागाने पाहता 

अल्लड पणे हसायचीस 

काय सांगू तुला 

किती सुंदर दिसायचीस..


तुझ्यासोबत भिजण्यातला आनंद

जगावेगळा असायचा..

न आवडणारा पाऊस 

मला ही आवडू लागायचा..

टपरीवरचा चहा आणि भजी

तूच शिकवलेस खायला.

"काय होत नाहीरे? खा तू बिनधास्त"

हाच तुझा मंत्र असायचा..

तुझ्यासोबत चहा अजून गोड लागायचा.

तुझ्याकडे पाहता जिभेला चटका बसायचा..

किती रे तू वेंधळा? असं म्हणत हसायचीस

काय सांगू तुला किती सुंदर दिसायचीस.  


दोघांचे संभाषण तासनतास चालायचे

मग मात्र मी पावसाचे आभार मानायचे

तू निघालीस की वाटायचं 

का थांबला पाऊस.??

तुझ्यासोबत वेळ घालवणे 

हीच असायची मनाची हौस..

"थांब ना अजून जरा" म्हणता

तू आढेवेढे घ्यायचीस ...

बरं म्हणून मग हलकेच लाजायचीस..

काय सांगू तुला ..किती सुंदर दिसायचीस..


राणी . ... 

आज ही तू आहेस मी आहे..सोबत सोबत..

पण माझी राणी हरवली..

संसाराच्या रहाटगाड्यात.. 

पावसाची आवड मागे पडली...

पाऊस आला की तुझी गडबड चालू होते...

दोरीवरचे कपडे काढायचे हेच तूझ्या ध्यानी येते..

भिजूया जरा म्हणता... आज तूच नको म्हणतेस

आजारी पडला तर?? म्हणून तूच घाबरतेस...

जाऊया टपरीवर म्हणता...

नको म्हणतेस,"कशाला उगाच बाहेरचं "

असं म्हणून घरीच भजी तळतेस ..

तुझे कौतुक करता...

हळूच हसून .. अजून एक प्लेट देतेस...

काय सांगू तुला ...किती सुंदर दिसतेस ..


तू सोबत आहेस त्याचा आनंद आहे ग मला...

पण तुझ्यातली तू हरवत आहेस याची खंत वाटते मला..

अल्लड माझी प्रेयसी.. माझ्या संसाराची राणी झाली...

नकळत का होईना तिच्यातली लहान मुलगी हरवून गेली

मला नव्हतं तुला बदलायच .. पण संसारामुळे तू बदलत गेलीस...

मी ही त्यातच गुरफटलो...प्रियकर पासून नवरा झालो..


तुला पाऊस आवडतो...हे जणू विसरून गेलो...

संसार करता करता.. जगणं मागे सोडून आलो...


राणी तुला आता मला पाहिल्यासारखं पहायचय...

तुझ्यासोबत पावसात पुन्हा पुन्हा भिजायचय..

आता मी तुला म्हणेन... 

"काय होत नाही ग... चल बिनधास्त"

त्या पावसाचा ही मग असेल आपल्यावर वरदहस्त


आता मला जुन्या आठवणी नव्याने जगायच्या आहेत

नव्याने तुझ्याशी सारे डाव मांडायचे आहेत...

खेळात तू जिंकशील मी हरेन...

पण हरून ही मी तुलाच जिंकेन..


तूझ्या हसऱ्या चेहऱ्याने मला जगणे शिकवतेस

काय सांगू तुला .. राणी... तू मला किती आवडतेस


मग होऊ या ना चिंब?


Rate this content
Log in