बहिण-भावाचं नातं...
बहिण-भावाचं नातं...


हे नातं खरंच खूप वेगळं आहे
अवखळ आहे, मिश्किल आहे
म्हटलं तर हलकं-फुलकं आहे
म्हटलं तर जबाबदारीचं आहे
बहिण मोठी असो वा लहान
भावावर दरारा तिचाच आहे
भाऊही लहान असो वा मोठा
त्यालाही ते मान्य आहे
बहिणीची खोड काढल्याविना
दिवस त्याचा संपत नाही
आणि तिलाही त्याच्याशिवाय
एक क्षणभरही करमत नाही
वाद जरी झाले क्षुल्लक कारणांनी
तरी एकमेकांवर बारीक लक्ष आहे
वेळेला बाजू सावरणे आहे तर
वेळेला कानउघडणी आहे
परीक्षा असो वा इतर काही
चढाओढ यांच्यात कधीच नाही
बहिणीला नेहमी भावाचे कौतुक आहे
तर भावालाही तिचा कायम अभिमान आहे
हीच बहिण जेव्हा सासरी निघते
तेव्हा भावाची आसवं लपवणं आहे
आणि भाऊ जेव्हा बोहल्यावर चढतो
तेव्हा बहिणीचा तोरा काही औरच आहे
आपापल्या संसारात पडल्यावरही
ओढ, काळजी तेवढीच आहे
एकमेकांना न दुखवता
कायम नात्याची जाणीव आहे
न बहिणीला भावावर रोष आहे
न भावाला बहिणीचा द्वेष आहे
एरव्ही भेटण्या वेळ नसला जरी
राखी दिनी मात्र...
नक्की भेटण्याची आस आहे
म्हणूनच म्हणते,
हे नातं खरंच खूप वेगळं आहे