बाप्पा
बाप्पा
मंगळवारी गणपतीला
लांबच रांगा दर्शनाला
फूलवाले, नारळवाले, प्रसादवाले
विक्रेते बाहेर सगळे, धंदा तेजीला
भक्तिचा बाजार पाहिला
आणि .... बाप्पा मनी हसला ॥१॥
रांगेतील एक श्रध्दावान
पायी आला दुरून
दर्शनाची आस धरून
उभा रांगेत दमून
एकदाचा त्याचा नंबर आला
क्षणभर दर्शनानेही सुखावला
भक्तिभावे नमस्कार केला
मागच्यास घाई,चला पुढे चला
घाईघाईने तो बाहेर पडला
आणि .... बाप्पा मनी हसला ॥२॥
अचानक आली ' बडी असामी '
कुटुंबासवे दर्शनाला
मंदिरात सर्वत्र मग
एकच गलबला झाला
' स्पेशल दर्शन ' करवावया
गडबड अधिकार्यांची उडाली
मागच्या दाराने मंडळी
मंदिरात प्रवेशली
थाटाची पूजा, यथासांग दर्शन
मनासारखे होता मुखी समाधान
मोठी देणगी मंदिराला
आणि .... बाप्पा मनी हसला ॥३॥
सार्वजनिक गणेशोत्सव
मंडळे ही जागोजाग
टिळकांच्या उत्सवाचे
बदलले स्वरूप आज
भव्य सजावटी, गाजावाजा
सर्वच नवसाला पावणारे महाराजा
विसर्जनाच्या मिरवणुकी
ढोल, ताशे, लाऊडस्पीकर
धुंद ते नाचणारे सिनेसंगीतावर
वाहतुकीचा खोळंबा झाला
आणि .... बाप्पा मनी हसला ॥४॥
यंदा ' कोरोना ' चे संकट
उत्सवांना लागला नाट
' न्यू ' नवा कौटुंबिक गणपती
' आॅनलाइन ' दर्शन, आरती
' न्यू ' नवा उत्सव पाहिला
आणि .... बाप्पा मनी हसला ॥५॥
