बाप्पा
बाप्पा
यंदा तो आला तेव्हाच मुळी
थोडासा हिरमुसला भासला
लोडाला टेकून बसल्यावर हसला पण
भाव चेहऱ्यावरचा खरा नाही वाटला
मी म्हंटल, जाऊदे अख्खा दिवस
इतक्या लांबच्या प्रवासाने होत असेल दमछाक
रात्रीच्या जेवणानंतरच बोलू
घोट घोट पिता पिता ताक
रात्री गप्पा झाल्या खऱ्या पण
जाणवली कुठेतरी निराशा भारी
कळतच नव्हते काय झाले
का इतकी उदास यंदा खाशा स्वारी
दुसरा दिवसही तसाच गेला, मग मात्र मी सरळ विषयालाच हात घातला.
म्हंटल, बाप्पा काय झाले
माझं काही चुकतंय का ?
तू यंदाच्या वर्षी असा इतका शांत
गूढ, अंतर्मग्न गप्प गप्प का ?
बाप्पा म्हणाला खरं सांगू
जड जातंय अताशा दर साल येणं
भक्तांच्या ईच्छा इतक्या अशक्यप्राय
की नको वाटतंय त्यांचा प्रसाद ही घेणं
उत्सव गेलाय भूतकाळाच्या पडद्याआड
आता नूरलाय फक्त आणि फक्त व्यापार खेळ
पहिल्या दिवसाचा दहाव्या दिवासाशी
इतका सुद्धा नसतो रे मेळ
दिखाऊ आणि दांभिकपणा किती रे
पैशाचा नुसता वारेमाप पाऊस
श्रीमंत गरीब दरी दाखवण्याची
असली कसली रे मुलुखावेगळी हौस
ही ही अशी गर्दी पाहून
काळजात धस्स व्हायला होतं
मुलबाळ कुणाचं हरवताना दिसलं की
मला जागेवरच गलबलायला होतं
मूषक तर हल्ली येतच नाही
त्याला भीती वाटते की जीव गमवावा लागेल
मलाही खात्री देता येत नाही की
बीभत्स ध्वनीने कधी रथ मंडप हादरायला लागेल
खरं सांगू का हल्ली विसर्जनाची
मलाच सगळ्यात जास्त घाई असते
संध्याकाळ संपून रात्र होताच
भक्तांच्या भक्तीची वेगळीच पातळी दिसते
म्हणून अताशा मला इथे येण्याचं
हे अस येतंय रे खूप दडपण
अगदी काही तुरळक ठिकाणीच
मिळतंय घरासारखं घरपण
भराभरा तो बोलत होता अन्
घळाघळा अश्रू डोळ्यातून वाहत होते
खूप वेळाने डोळे पुसून मी पुन्हा पाहिले तेव्हा
देव्हाऱ्यातले बाप्पा प्रसन्न मुद्रेत दिसत होते
