आठवतंय मला
आठवतंय मला
आकाशात साचलेले काळे ढग,
दुरून कुठूनतरी येणारा भिजलेल्या मातीचा वास,
येऊ घातलेल्या पावसाला जणू पिटाळून लावणारा वारा,
वारा अंगावर झेलत खिडकीत उभा मी,
चेहऱ्यावर आदळलेलं ते वाळकं पान
आठवतात मला ते चिखलाने भरलेले इवले इवले पाय,
माझं भिजलेलं डोकं पुसण्यासाठी हातात टॉवेल घेऊन दारात उभी आई,
पावसात भिजलेलं अंग घुसळून पाणी उडवणारा तो कुत्रा,
समोरच्या मैदानावर चिखलात खेळणारी ती मुले
आठवतो मला तो कांदाभजीचा खमंग वास,
अलं घालून केलेला गरम गरम चहा
जणू चहाचा तलाव वाटावा तशी डबकी,
डबक्यात बसून ओरडणारे बेडूक
ओल्या रस्त
्यांवरून वेगात धावणाऱ्या गाड्या,
गाड्यांची चाके जाताच उडणारं डबक्यातलं पाणी,
पाणी पँटवर उडल्यामुळे त्रस्त चेहेऱ्याने पाहणारी माणसं
आठवतो मला कपाटात धूळ खात पडलेला रेनकोट,
जो कितीतरी महिन्यांपासून पावसाळ्याची वाट पाहत होता,
मोकळ्या श्वासासाठी तडफडत होता,
तो जुनाट रेनकोट अंगावर चढवून शाळेला निघालेला मी,
होमवर्क करायला विसरल्यामुळे आता मास्तरांची छडी खावी लागणार या भीतीने पोटात उसळलेला गोळा,
शाळेच्या समोरचा पावसाच्या पाण्याने ओसंडून वाहणारा ओढा,
रस्त्याच्या कडेला उगवलेलं गवत चपलीच्या टोकाने खुडत चालणारा मी, शाळेसमोर पोहोचताच दिसणारं बंद गेट,
शाळेचं बंद गेट पाहताच मनात फुटणाऱ्या आनंदाच्या उकळ्या
सर्वकाही आठवतय मला...