आई
आई
माझ्या काळजाची तार आज छेडली
गं आई तुझी आठवण उरी दाटून आली...
दारी उभ्या प्राजक्ताने सडा घातला
तुझा मोगराही पानोपान बहरला
रातराणी पहा आपली कशी फुलली
ग आई तुझी आठवण उरी दाटून आली...
शेत शिवार आपला पीकांनी फुलला
तुझा कडूनिंबही आंगोपांग भरला
वा-याच्या झोक्यानं पिकं डुलू लागली
ग आई तुझी आठवण उरी दाटून आली...
उन्ह कलतीला ग आता लागले
पक्षी घरट्याकडे सारे परतले
वासरासाठी गाय हंबरू लागली
ग आई तुझी आठवण उरी दाटून आली...
समोर उभा दिवाळीचा ग पाडवा
नात्यातला संपला ग सारा गोडवा
कुणासाठी करू आता पुरणपोळी
ग आई तुझी आठवण उरी दाटून आली...
किती प्रेमानी घास तू ग मला भरविला
बाबा माझ्या शिवाय नाही कधी जेवला
त्या प्रेमाला पारखी मी ग आज झाली
ग आई तुझी आठवण उरी दाटून आली...
गाय वासरासाठी सोडते ग पान्हा
माझ्यासाठी परतुन येशील का ग पुन्हा
वेड्या मनाला ओढ तुझी लागली
ग आई तुझी आठवण उरी दाटून आली...
