वासुदेव कुठे हरवलायं
वासुदेव कुठे हरवलायं
वासुदेव कुठे हरवलायं ? समाजातील परंपराना लोप का पावत चाललेला आहे?
कर जोडुनी विनवतो तुम्हा ।
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा ।
नका गुंतू विषय कामा ।
तुम्ही आठवा मधुसुदना ।
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा ॥
सकाळच्या मंगळ प्रहरी हरीनामाचा टाहो फोडत , टाळ चिपळ्यांच्या निनादाने , सारा परिसर भक्तीमय करणारे ..अगदी सूर्योदयावेळी विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करत , अभंग गौळणी गात दारोदारी दान मागणारा लोककलाकार म्हणजे वासुदेव .. पुर्वी गावात आलेल्या वासुदेवाला भरपुर मान सन्मान मिळायचा , घरच्या लक्ष्मीचा दान द्यायला हात कधीच आखडत नसे .
वासुदेव गावाकडे समाजप्रबोधन करायचे , आपल्या गायणातुन तत्वज्ञान सांगायचे यात दैववाद असायचा ..
महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीतील वासुदेवांची परंपरा सुमारे हजार- बाराशे वर्षांपूर्वीची जुनी असावी असा अंदाज आहे . संत ज्ञानोबा , तुकोबा, संत नामदेव यांच्या संतसाहित्यातही वासुदेवावरील रूपके आढळतात . त्याचबरोबर ऐतिहासिक दाखलेही आहेत , छत्रपती शिवाजी महाराजही वासुदेवांच्या सहाय्याने मावळ्यांच्या घरी निरोप पाठवायचे ...
डोक्यावर मोरपंखाची टोपी , पायघोळ अंगरखा , पायात विजार , धोतर , कमरेभोवती शेलावजा व उपरणे गुंडाळलेले , एका हातात चिपळी दुसर्या हाती टाळ , पांवा मंजिरी अशी वाद्य त्याचबरोबर काखेत झोळी , गळ्यात कवडीमाळ कपाळी गंधटिळे व मुखी ईश्वराचे नाम असा वासुदेवाचा मनमोहक पोशाख ..
कधी कधी प्रश्न पडतो , आज हा वासुदेव कुठे हरवलायं ? समाजातील परंपरा लोप का पावत चाललेल्या आहेत ?
भारत आणी भारतीय संस्कृती खूप महान आहे , काजव्यासम चकाकणारी , स्वच्छ, निर्मळ, समृद्ध अशी संस्कृती जगात अव्वल आहे .
खरं तर काळाच्या ओघात या लोककला लोप पावत चालल्या आहेत , निमशहरांमधील वसाहती , भलीमोठी सोसायटी , कप्पेबंदता , या वातावरणात वासुदेवांना प्रवेश नसतोचं . घराची दरवाजे बंद झालीत माणसं माणसांपासुन दुर झालीत , गाव ओसाड पडत चाललीत , दान मिळणे दुरच ही लोककला बघायलादेखील लोकांजवळ वेळ नाही . त्याचबरोबर वासुदेवांची पिढी वासुदेव न होता शिक्षण घेवुन व्यवसायाकडे वळालीत ही गोष्ट एका अर्थाने चांगलीचं . वासुदेव समाजातील बहुतांश कुटुंब उदरनिर्वाहासाठी शहरांकडे वळालीत . काळानुरूप विविध प्रगती होत चालली आहे , खेडीपाडी , शहरे आर्थिक दृष्ट्या भक्कम होत चालली आहे . जसजशी प्रगती होते तशी संस्कृतीची पायमल्लीही होत चालली आहे .
एकविसाव्या शतकात लोककला जोपासणारे लोक बोटावर मोजण्याइतके उरलेत .
आजच्या समाजात बदलत्या रूढी परंपरा नुसार प्रत्येक जण वागतो आहे . आपल्या भाषेत त्याला मॉडर्ण , फॅशन वैगरे शब्द आहेत .
आपण जास्तीत जास्त पाश्चिमात्य संस्कृतीचा स्विकार केला आहे .
धावपळीच्या जीवनात मानव मशिन झालायं , आणी संवेदना, भावना ,माणुसकी बोथट होत संस्कृतीचा विसर पडतोय .
राष्ट्र टिकवायचं असेल, संस्कृती टिकवायची असेल , तर परंपरा जपायला हव्यात .
हरवलेला वासुदेव पुन्हा त्याच उत्साहात परत यायला हवा , तेव्हाच खरं पुढच्या पिढीला परंपरेची जाणीव होईल .
गातो वासुदेव मी ऐका ।
चित्त ठायीं ठेवुनि भावें ऐका ।
डोळे झाकूनि रात्र करूं नका ।
काळ करीत बैसलासे लेखा गा ।
राम राम स्मरा आधीं ॥
- संत तुकाराम
