माझी आई
माझी आई
नऊ रंगाच्या नऊ साड्या आईने कधी घातल्याच नाही,
नऊ दिवसाचे कडक उपवास करून पण देव तिला कधी पावलाच नाही,
तरी माझ्या आईच्या चेहर्यावरचे हसू कधी ढळले ही नाही,
फाटक्या संसाराची ठिगळं जोडता जोडता केस पांढरे झालेले कळलेच नाही,
आयुष्यातील दुःखाची वादळे एकटीने झेलत ती कुणापुढे झुकली नाही रडली पण नाही,
म्हणुनच मला माझी आई देवी देवता पेक्षा कधी कमी वाटलीच नाही....
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे आपल्याजवळ असतात, तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी, त्याच्या वेदना जाणवत नाहीत आई म्हणजे विधात्याने आपल्या पहिल्याच साखरझोपेच्या वेळी टाकलेला सुंदर निश्वास असावा त्या निश्वासात पुरुषाच्या जळणाऱ्या मनाला शांत करण्याची प्रचंड शक्ती असते. आईच्या प्रेमळ सहवासात माणूस जगाचं क्रौर्य विसरू शकतो. अपमानाचे कडू घोट धैर्यानं पचवू शकतो.
आयुष्यात येणाऱ्या संकटांना नव्या जोमाने सामोरा जाऊ शकतो. विश्वकर्ता हा जग रंगविणारा एक कुशल रंगारी असेल तर आई ही त्यानं रंगविलेली सर्वोत्कृष्ट रंगाकृती म्हंटली पाहिजे. सर्व जग रंगवून झाल्यावर शेवटी निर्वाणीच्या हातानं आणि प्रभावी कुंचल्यानं रंगविलेली पूर्णाकृती म्हणजे आई ! पण खरोखर आईचं जीवन एवढं सहजसोपं असतं का ? मुळीच नाही ! आईचं जीवन म्हणजे अनेक उलथापालथी ! कधी ती कुणाची कन्या, कुणाची पत्नी, कुणाची माता असते तर कधी कुणाची सून, कुणाची भावजय असते. तिला स्वतःचं असं अस्तित्व कधी असतंच नाही; असलं तरी दाखवता येत नाही.
जगात सर्वात सखोल आणि कधीच अंत न लागणारं काय असेल तर ते आईचं मन ! स्वतःचं दुःख पचवून इतरांचं दुःख सौम्य कसं करायचं एवढंच आई जाणत असते. ती नेहमी कमीतकमी हानी आणि जास्तीत जास्त सोय निवडत असते. तोच तिचा स्वभाव असतो. आई जिथे असेल तिथे ती स्वर्ग निर्माण करू शकते. पराक्रमाचं मातृत्व पुरुषाकडे असतं पण मातृत्वाचा पराक्रम केवळ आईच जाणते !
खरोखर आई चा जन्म हा समर्पणच नसतो काय ? ती तिचं आयुष्य स्वतःसाठी कधी जगतच नाही. मानवतेचा अवमान एकवेळ क्षम्य ठरू शकतो, पण ज्या आईच्या कुशीतून मानवता जन्म घेते, तिच्या स्त्रीत्वाचा अवमान करणाऱ्याला कधीच माफ केलं गेलं नाही.
आजवरच्या इतिहासात कुठेही डोकावून बघावं; आई व स्त्रीची विटंबना करणाऱ्या, तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एकाही माणसाचं नाव आज आदरानं घेतलं जात नाही. अशा माणसांचं जे झालं त्याला एकच शब्द आहे, ऱ्हास !
सर्वात प्रथम ती गृहलक्ष्मी संपूर्ण घराला सांभाळते
कुणाचे दुखणे-आजारपण स्वतः जातीने लक्ष देते...
दुसरे रुप तिचे अन्नपूर्णेचे सर्वांची आवड निवड जपते
स्वतः स्वयंपाक बनवून आनंदाने सर्वांचे मन तृप्त करते...
तिसरे रुप तिचे सरस्वतीचे आपल्या मुलांचा अभ्यास घेते घरातील प्रत्येक वस्तूंचा स्वतः लक्ष ठेवून हिशेब ठेवते...
चौथे रुप तिचे महालक्ष्मीचे घरात सुख-समृध्दि नांदते लक्ष्मीच्या रुपात घरची नारी घरातील पैशाचे नियोजन करते...
पाचवे रुप तिचे महादुर्गेचे घरावर आलेले संकट निवारते ते पून्हा घरात येणार नाही जातीने पुरेपूर काळजी घेते...
सहावे रुप तिचे कालिकेचे इडा-पिडा घरातील घालवते
घरातील अंधश्रध्देचे समूळ उच्चाटन करुन चैतन्य आणते...
सातवे रुप तिचे अंबिकेचे अन्यायाविरुध्द बंड पुकारते
समाजात नारीवर होणारे अत्याचार हाणून पाडते...
आठवे रुप तिचे भवानीचे ती घरातील कुलदेवता
सर्वांना एकत्रित आणून घरात नांदवते एकता...
नववे रुप महिषासुरमर्दिनीचे समाजातील नराधमांचा
कमरेला पदर खोचून संहार करते त्या दानवांचा...
नवरात्रीत देवी बद्दल सगळे काही ना काही लिहितात..
पण जिने मला जन्म दिला,माझ्यावर चांगले संस्कार केले माझ्या आयुष्यात सुंदर रंग भरले अशा माझ्या देव स्वरूप आईला कोटी कोटी प्रणाम
