वास्तव
वास्तव
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान केला जातो.तसे पाहिले तर या एकविसाव्या शतकात महिला चांगल्या प्रकारे सन्मानित आहेतच. हा सन्मान महिला दिना पुरताच मर्यादित राहू नये तर त्या सदैव सन्मानित असाव्यात.किती ही काळ बदलला.परिस्थिती बदलली . तंत्रज्ञान युग आले .तरीही समाज मनाने घालून दिलेल्या प्रथा परंपरा आज ही तग धरून आहेत. स्री मग ती शहरी असो की ग्रामीण, शिक्षित असो की अशिक्षित, वृध्द असो की तरुण .सामाजिक परंपरांच्या जोखडातून ती पूर्ण पणे मुक्त झाली नाही. आर्थिक स्वातंत्र्य ,स्वावलंबन या गोष्टी ती उपभोगत असली तरी मानसिक आणि भावनिक स्वातंत्र्यापासून ती दूरच असलेली दिसते. याचे उदाहरणच द्यायचं झालं तर आज विधवा स्त्री जे जीवन जगते तिच्याकडे ज्या नजरेने पाहिले जाते ,तिला ज्या पद्धतीने वागवले जाते . ते खरच खूप वेदना देणारे वाटते.पती निधनानंतर सर्वस्व गमावलेली माऊली आयुष्याच्या जोडीदाराच्या विरहाने आक्रोश करत असतानाच तिच्या पायातली जोडवी काढायची धावपळ ,तिच्या गळ्यातले मंगळसूत्र जणू ओरबाडून काढले जाते.जे तिने जीवापाड जपलेले असते.तिच्या शरीराचे सौंदर्य खुलवणारे ,तिचा उत्साह वाढवणारे , नव्या उमेदीने लढण्यासाठी बळ देणारे हे अलंकार त्याच क्षणाला ओढून काढण्याची घाई का ? त्याच क्षणाला तिच्या अंतरी होणाऱ्या वेदना न कळणाऱ्याच असतात.
तिचा आक्रोश कोणाच्या हि कानावर पडत नाही.हे कमी म्हणून की काय पाच सवाष्णी लगबगीने येऊन त्या माऊलीला शेवटचं कुंकू लावतात.त्या ऊर बडवणाऱ्या पती विरहाने व्याकूळ झालेल्या स्री च्या जखमेवर पुन्हा एकदा घाला घातला जातो.हे दुःख कोणत्याही वयाच्या स्री जाती साठी वेदनादायी असेच आहे.वृध्द स्री असेल तर या वयात ही वेळ आली माझ्यावर याचं तिला अतीव दुःख होतं .आणि हीच जर तरुण असेल तर संपूर्ण आयुष्य तिला गुन्हेगार असल्याप्रमाणे जगावं लागतं . तिचं सजनं सवरणं ,स्वतः साठी जगणं सगळं संपून जातं.
स्वतः च आयुष्य ती अनेक प्रकारे उध्वस्त झाल्याचं दुःख भोगते.जिवलग तर सोडून जातोच.सोबत साज शृंगार ही जातो.
कोणत्याही धार्मिक कार्यात तिला दुर्लक्षित केलं जातं. कळतं पण वळत नाही यासारखे म्हणण्याची वेळ येते.आधुनिक समाजाने घालून दिलेले नियम तंतोतंत पाळले जातात.तिच्या अंतरीच्या वेदना कधी कुणाला समजतील हा प्रश्नच निरुत्तर आहे.कारण तिचं वेदनादायी जीवन हे काळोखात च विरून गेलेलं असतं.
हे चित्र थोड्याफार प्रमाणात बदललं गेलं तरी हा दिवस तिच्या साठी खास होईल.
सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
