उत्तराखंडमधील अविस्मरणीय क्षण
उत्तराखंडमधील अविस्मरणीय क्षण
माझ्या आयुष्यातील आत्तापर्यंतचा सर्वात सुंदर क्षण म्हणजे केदारनाथ ट्रीप आणि एकंदरीत उत्तराखंड मधील दहा दिवस....
खूप सुंदर आणि नयनरम्य उत्तराखंड राज्य हे देवभूमी म्हणून ओळखले जाते. मन मोहून टाकणारे ते सुंदर आणि उंच बर्फाचे पर्वत असे वाटतात जणू , कापसाचा मऊ गालिचा 😍.. उंच झाडे , पर्वतावरची घरे , छोटे वळणदार रस्ते , सकाळी पडणारे गाढ धुके , सतत खळखळून वाहणाऱ्या नद्या , थंड हवा ...हे सर्वच खूप मनाला प्रसन्न करणारे होते.
आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये अजून एक म्हणजे सकाळचा नाश्ता , गरम गरम मॅगी आणि आलू पराठा याची तर गम्मतच न्यारी , नाश्ता झाला की एकदम तरतरी यायची एक उत्साह यायचा तो वेगळाच.
पहिल्यांदा आम्ही , हरिद्वार येथून ऋषिकेश आणि मग तिथून यमुनोत्री कडे रवाना झालो. दोन दिवसात यमुनोत्री फिरून झाले. मग तेथून आम्ही गंगोत्री ला जाण्यास निघालो . हर्शिल पर्यंत आल्यावर आम्हाला असे समजले की , पुढे कुठेतरी दरड कोसळली होती. त्यामुळे आम्ही चार ते पाच तास हर्शील - गंगोत्री रोड वरच होतो. पण, रोड च्या बाजूला सुद्धा स्वच्छ वाहणारी नदी आणि समोर बर्फाचे पर्वत , एकदम सुंदर दृश्य होते.
चार ते पाच तास अडकून पडल्यानंतर आम्ही एकदाचे गंगोत्री ला पोहोचलो . मंदिरात गेल्यावर बाजूला पहिले तर काय , अगदी ओसांडून वाहणारी गंगा नदी ... मग आम्ही , नदीचे दर्शन घेतले आणि दुपारचे जेवण करून आम्ही केदारनाथ साठी रवाना झालो. रात्री मधे आम्ही एका हॉटेल वर मुक्काम केला. आणि तेही हॉटेल एकदम निसर्गाच्या सानिध्यात होते. आमच्या रूम च्या समोरच पर्वतावर ढग दाटले होते 😍.
सकाळी पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला केदारनाथ ला जाण्यासाठी.. आम्ही , संध्याकाळी चार ते पाच च्या सुमारास देवप्रयाग येथे पोहोचलो. रात्री आम्ही तिथेच एका हॉटेल मधे मुक्काम केला आणि सकाळी सर्व आवरून आम्ही केदारनाथ मंदिर दर्शन यात्रेला निघालो. आणि , आमचा सफर डोली मधे सुरू झाला. चार जण डोलीला धरतात त्यामुळे पडण्याची भीती नसते. आम्ही सकाळी निघालो होते ते आम्ही दुपारी तीन वाजता हिमालयाच्या उंच टोकावर असलेल्या केदारनाथ मंदिरात पोहोचलो.
अहाहा ! चहूबाजूंनी बर्फाळ प्रदेश ...बर्फाचे पर्वत ... आणि समोर भगवान शंकराचे सुंदर आखीव रेखीव मंदिर म्हणजेच केदारनाथ मंदिर.. तिथले सौंदर्य पाहून माझे डोळे दिपले ... वाटते जणू मी सुंदर अशा स्वर्गात आहे .. तिथे आम्ही दर्शन घेऊन जेवण करून रात्री 12 वाजता खाली देवप्रयाग येथे पोहोचलो. मी खूप धन्य धन्य झाले .
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बद्रीनाथ येथे जाण्यास निघालो. दोन दिवसांनी आम्ही तिथे पोहोचलो. मंदिराच्या चहूबाजूंनी हिरवे हिरवे उंच डोंगर आणि मध्यभागी असलेले श्री विष्णूचे म्हणजेच बद्रिविषाल मंदिर अगदी सुंदर वाटत होते. असे, आमचे दहा दिवस निसर्गाच्या सानिध्यात, भूमातेच्या कुशीत कसे गेले हे कळलेच नाही...
खूप सुंदर आठवण आहे ही आणि कायम राहील.
