स्वप्नपूर्ती
स्वप्नपूर्ती
आजचीही संध्याकाळ रमणिय होती. ओवी नेहमीप्रमाणे आवरुन केसात गजरा माळून ओजसची वाट पहात होती. दर पाच मिनिटांनी आरशासमोर जाऊन स्वतःला न्याहाळत होती. घडयाळाचा काटा पुढे सरकत होता तशी ओवीच्या हृदयातील धडधड वाढत होती अखेर बरोबर सात वाजता गाडीचा हॉर्न वाजला.
"आई मी येते ग!" म्हणत ओवी दारापाशी गेली ओजसच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य बघून ओवी थोडी लाजली आणि हळूहळू पावले टाकत त्याच्या गाडीत शेजारी जाऊन बसली. ओजस आणि ओवीचे नुकतेच लग्न ठरले होते आणि लग्न ठरल्यापासून रोज ते एकमेकांना भेटत होते आणि भविष्याची स्वप्ने रंगवीत होते . साखरपुडयानंतर तीन चार महिन्यानंतर लग्न होते त्यामुळे एकमेकांना समजून घ्यायला आवडीनिवडी जाणून घ्यायला दोघांनाही वेळ मिळाला . अखेर लग्नाचा दिवस उजाडला दोन्ही घरी लगबग सुरू झाली. पाहुणे, मित्रपरिवार, नातेवाईक सर्वांनी घर गजबजून गेले.
दोन्हीही परिवारात आनंद ओसंडून वाहत होता. ओवीच्या घरात ती सगळ्यांची लाडकी असल्याने तिच्या सासरी जाण्याच्या कल्पनेने घरातले थोडे हिरमुसले होते पण ओजस खूपच प्रेमळ होता त्यामुळे तिची काळजी करण्यासारखे काहीच नव्हते. अखेर दोघांच्याही डोक्यावर अक्षता पडल्या आणि ते आनंदाने न्हाऊन निघाले कार्य संपवून ओवीची पाठवणीची वेळ जशी जवळ येत होती तसा ओवीच्या आईच्या डोळ्यातील अश्रूंना बांध फुटत होता पण ओवीचे बाबा खूपच खंबिर असल्याने त्यांनी आईला सावरले. ओवी आणि ओजसची गाडी जशी कर्यालयातून बाहेर पडली तसा बाबांचा धीर खचला आणि आक्रोश करत ते खाली बसले. त्यांच्यासाठी ओवी त्यांचा जणू मोठा मुलगाच होती. कालांतराने लेकीचे सुख बघून ओवीचे आईबाबा धन्य झाले.ओवी आणि ओजसने खूपच छान संसार मांडला होता. दोघेही एकमेकांशी सामजस्याने वागत होते. छोटेछोटे खटके उडणारच पण त्यावर विचार न करता पुन्हा प्रेमाने जवळ येत होते. लग्नानंतरचे सोनेरी दिवस दोघेही अनुभवत होते. म्हणता म्हणता लग्नाला दोन वर्षे झाली आणि एक दिवस दोन्ही कुटुंबात खुषखबर पसरली. ओवीला 'दिवस गेले' होते. दोन्ही कुटुंबांनी आनंदसोहळा साजरा केला. त्यानंतर ओजस आणि ओवी अजूनच जवळ आले कारण आईबाबा होण्याचे सुख अनुभवत होते. ओवीच्या सासूबाई तिची खूप काळजी घेत होत्या. तिला काय खावेसे वाटतेय काय नाही ह्याची जातीने खबरदारी घेत होत्या. बघता बघता तीन महिने झाले ओवीच्या आईने तिची ओटी भरली. सर्वांचे आशीर्वाद घेऊन ती येणाऱ्या बाळाची स्वप्ने रंगवू लागली. मनातल्या मनात त्याच्याशी बोलू लागली. वेळच्यावेळी ओजस तिला डॉक्टरांच्या कडे घेऊन जात होता आणि बाळाची खुशाली ऐकून दोघेही आनंदाने घरी परतत होते. ओवीचे सगळे हट्ट तो कौतूकाने पुरवत होता. पाचवा महिना लागला तसे सोनोग्राफी, इंजेक्शन याची तयारी सुरू झाली आणि रुटीन चेकअप साठी दोघे डॉक्टरांकडे गेले. सोनोग्राफीसाठी बरेच नंबर होते दोघांनाही सोनोग्राफीत दिसणाऱ्या बाळाची हालचाल बघण्याचे खूप कुतूहल वाटत होते. बराच वेळ डॉक्टर सोनोग्राफी करत होते. ओवी एकदा स्क्रीनवर एकदा डॉक्टरांकडे बघत होती पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळेच दिसत होते. सोनोग्राफी संपवून डॉक्टरांनी ओवीला आणि ओजसला समोर बसवले. त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकून दोघेही स्तब्ध झाले. ओवीच्या डोळ्यासमोर तर अंधारच पसरला. डॉक्टरांनी सांगितले की बाळाच्या डोक्यात मेंदू नाहीये तिथे फक्त खड्डा आहे. हे ऐकून दोघांनाही कळत नव्हते काय बोलावे काय करावे. डॉक्टरांनी दोघांनाही समजावून सांगितले की बाळ ठेवता येणार नाही आणि ठेवले तर ते मतिमंद जन्माला येईल, लाखांमध्ये एखाद्याच्या वाटयाला असे दु:ख येते पण आमच्याच वाटयाला का? असा प्रश्न ओजस आणि ओवीला सतावत होता. दवाखान्यातून बाहेर पडल्यावर ओवीला कसेबसे सांभाळत ओजसने घरी नेले. घरी सर्वानाच बाळाबद्दल ऐकून धक्का बसला. दुसऱ्या डोक्टरकडे जाऊन पुन्हा एकदा सोनोग्राफी करावी असा निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेतला. आशेवर दुनीया चालते ना तसाच काहीसा प्रकार. पण दुसऱ्या डोक्टरांनी देखील सोनोग्राफीत बाळाला मेंदू नसल्याचा निष्कर्ष काढला तेव्हा मात्र ओजस आणि ओवीच्या पायाखालची जमिन सरकली. पण मनाचा निर्धार करून एकमेकांना सांभाळत बाळ न ठेवण्याचा निर्णय दोघांनी घेतला. त्यानंतर एका आठवडयांनी नॉर्मल डिलिव्हरी करून ओवीचे बाळ तिच्यापासून वेगळे करण्यात आले. काही दिवस ती माहेरी रहायला गेली. बाळंतपणाचे सर्व सोपस्कार चालू होते पण हातात काहीच नव्हते. त्या काळात ओवीच्या आईवडिलांनी, तिच्या सासरकडच्यांनी आणि खास करून ओजसनी तिला खूपच आधार दिला. हळूहळू दिवस पुढे जात होते तसे दोघेही त्या दु:खातून बाहेर येत होते आणि आपापल्या विश्वात रममाण होत होते. त्यानंतर पुन्हा दोन वर्षांनी बाळाची चाहूल लागली पण ह्या वेळी ओवीला आनंदापेक्षा भिती जास्त वाटत होती. हे बाळ कसे असेल ह्याची खूप काळजी घेत योग्य औषधोपचार करत एक, दोन, तीन .....असे पाच महिने झाले. पुन्हा सोनोग्राफीची वेळ आली आणि ओवीची भिती जास्तच वाढली. दोन्ही कुटूंबातील लोकांना आशेचा किरण दिसत होता. डॉक्टरांकडे जायची वेळ झाली तसे ओवी आणि ओजसच्या हृदयातील कळा वाढू लागल्या. ह्यावेळी तर सोनोग्राफीच्या वेळी ओवीने डोळे मिटूनच घेतले होते. पण पाच मिनिटांनी डॉक्टरांनी ओवीला डोळे उघडायला सांगितले आणि, "बघ तुझे बाळ किती छान आहे, हालचाल करतय, सर्व अवयवांची वाढ देखील व्यवस्थीत आहे." हे शब्द कानावर पडताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पुढचे चार महिने काळजी घेत आनंदाने राहून ओवीने एका परीला जन्म दिला. गोरीपान, फुलासारखी नाजूक, नितळ त्वचा अशी राजकन्याच होती. तिला बघून सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले. खचून न जाता, न डगमगता आलेल्या दु:खावर मात करून कुशीत असलेल्या आपल्या राजकुमारीकडे बघण्यात ओवी आणि ओजस रममाण झाले होते. त्यांच्या आयुष्यातले सर्वात मोठे स्वप्न आज पूर्ण झाले.