श्रीमंत श्री शहाजीराजे भोसले
श्रीमंत श्री शहाजीराजे भोसले
श्रीमंत श्री शहाजीराजे भोसले
अहमदनगरच्या शाह शरीफ दर्ग्यास नवस बोलल्या नंतर मालोजीराजे भोसलेंच्या घरात *१५ मार्च १५९४ रोजी पुत्ररत्न जन्मास आले पण त्याचे नामकरण झाले नाही. दोन वर्षांनी दुसऱ्या पुत्राच्या जन्मानंतर दर्ग्याच्या नावावरून दोन्ही पुत्रांची नावे अनुक्रमे *शहाजी* आणि *शरीफजी* अशी ठेवण्यात आली. दोन्ही बंधू दणकट शरीरयष्टी , विलक्षण बुद्धिमत्ता आणि अफाट युद्धकौशल्यासाठी प्रसिद्ध होते. श्रीमंत शरीफजी राजे भातवडीच्या युद्धात वीरगतीस प्राप्त झाले. श्रीमंत शहाजीराजे आपल्या कारकिर्दीत निजामशाह , आदिलशाह आणि मुघल या तिन्ही सुलतानांकडे सरदार होते. निजामशाहीच्या पडत्या काळात शहाजीराजेंनी निजामशहाच्या बेगमला आपली बहीण मानले आणि निजामशाहीच्या मागे उभे राहिले. निजामशाहच्या चार वर्षांच्या मुलाला गादीवर बसवून स्वतः वजीर म्हणून कारभार पाहिला आणि आदिलशाह सोबत महाराष्ट्रात आलेल्या शाहजहान ला एकाचवेळी तोंड देऊन निजामशाहीला वाचवले. निजामशाहीच्या मागे उभे राहत तर कधी आदिलशाहीत जाऊन शहाजीराजांनी आपल्या पुणे व सुपे जहागिरी च्या देखरेखीसाठी जिजाऊ आणि शिवरायांना रवाना करून स्वराज्याची पायाभरणी केली.
शहाजी राजांचा पराक्रम , दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती आणि बुद्धिमत्ता पाहून मुघल बादशाह शाहजहान कमालीचा प्रभावित झाला आणि त्याने निजामशाही संपवण्याचा निर्णय मागे घेतला आणि निजामाच्या मुलाला जिवंत सोडले. आपल्या मुत्सद्दीपणाच्या जोरावर शत्रूच्या गोटात असूनही शहाजीराजांनी स्वराज्याला उभारी दिली. *शहाजीराजांच्या तल्लख बुद्धीचे उदाहरण म्हणून होडीत चढवून केलेल्या हत्तीच्या तुलेचा किस्सा सर्वश्रुत आहे.* स्वराज्याचा झेंडा जरी पताका म्हणजेच भगवी पताका ही शिखर शिंगणापूरच्या महादेवाचा ध्वज म्हणून शहाजीराजांनी शिवरायांच्या हाती
*" या भगव्याचा आब राखा"* असे सांगत सुपूर्द केली. स्वतः शत्रूपक्षात असूनही त्यांनी आपल्यामुळे स्वराज्य अडचणीत येऊ नये याची पूर्ण काळजी घेतली. त्यासाठी त्यांनी आपल्यात व आपल्या पुत्रात आलबेल नसल्याचे जगाला भासवले व पूर्णकाळ ते शिवरायांपासून दूर राहिले. काळ-वेळ पाहुन योग्य निर्णय कसे घ्यावेत आणि प्रतिकूल परिस्थितीतही आपले स्वप्न कसे साकार करावे हे शहाजीराजांनी जगाला शिकवले. स्वराज्य घडण्यामागे जिजाऊ आणि शिवरायांपेक्षाही मोठे योगदान शहाजीराजांचे आहे .
शहाजीराजे कर्नाटक मध्ये आपल्या द्वितीय पत्नी तुकाबाई आणि पुत्र व्यंकोजी आणि एकोजी यांच्या सोबत राहिले. शिवरायांसोबत त्यांचा पत्रव्यवहार सुरूच होता. राष्ट्रहितासाठी दुरावलेले दोघे पिता-पुत्र खूप वर्षांनी शेवटचे जेजुरी गडाच्या पायथ्याशी भेटल्याची नोंद सापडते. *२३ जानेवारी १६६४ रोजी कर्नाटक मधील सध्याच्या दवणागिरी जिल्ह्यातील होदेगिरीच्या जंगलात शिकारी साठी गेले असता घोड्याचा पाय लचकला आणि शहाजीराजे भरधाव घोड्यावरून खाली पडले . डोके दगडावर आपटून त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.*
शहाजीराजांच्या मृत्योपरांत त्यांच्या धाकट्या पत्नी तुकाबाई सती गेल्या. उद्विग्न मनाने सती जाणाऱ्या जिजाऊंना लहानग्या शंभूराजांनी मुत्सद्देगिरी दाखवत *जबाबदारी असणाऱ्या स्त्री ला सती जाण्याची आज्ञा नाही* असे सांगून रोखले. दवणागिरी येथे जिर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत असलेली श्रीमंत शहाजीराजांची समाधी अखंड भारतवर्षासाठी प्रेरणा आहे. छोट्याश्या लेखाच्या अंती एवढंच म्हणावं वाटतंय
*थोर महात्मे होऊन गेले । चरित्र त्यांचे पहा जरा ।।*
*आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा ।।*