पिंजऱ्यातील स्वातंत्र्य
पिंजऱ्यातील स्वातंत्र्य
ही घटना आहे काही वर्षांपूर्वीची. एका रविवारी दादाच्या आग्रहास्तव मी त्याच्या सोबत कल्याणमध्ये रामबागेत गेलो. त्या ठिकाणी जाण्याची माझी पहिलीच वेळ होती. आज पर्यंत त्या जागेचं केवळ वर्णन ऐकून होतो पण आज मात्र प्रत्यक्ष अनुभवत होतो. त्या ठिकाणी वर्दळ असली तरी वातावरण मात्र मनाला सुखावणारं असतं. माणसांच्या वर्दळीतही कुठल्याही प्रकारचा कृत्रिमपणा अनुभवास येत नाही. दुचाकीवर मागे बसून मी प्रत्येक गोष्ट न्याहाळत होतो. थोड्याच वेळात आम्ही पायउतार झालो आणि समोरच्या एका दुकानात शिरलो.
ते एक असं दुकान होतं जिथे घरी पाळण्यासाठी मासे, पक्षी, लहानसहान प्राणी विकत मिळतात. त्यांना लागणारं खाद्य, त्यांची औषधं, पिंजरे वगैरेही मिळतात. दादा त्याच्या कासवासाठी खाद्य विकत घेत होता आणि मी तिथं विकायला ठेवलेले प्राणिमात्र बघण्यात गढून गेलो होतो. त्या ठिकाणी ससे, मासे, कासवे, पोपट, लव्हबर्ड्स, कुत्रे, कबुतरं, मांजरं वगैरे विकण्यासाठी ठेवलेले होते. या सर्वांची अगदी पद्धतशीर बडदास्त ठेवलेली होती. त्यांची स्वच्छता, खाणं-पाणी, औषधं वगैरे सर्वकाही अगदी व्यवस्थित आणि वेळेवर होतं. अगदी घरच्या पाळीव प्राण्यांसारखी किंबहुना त्याहूनही जास्त सोय होती. या सर्व कामांसाठी दोन खास नोकर नेमलेले होते. त्यातील एका नोकराशी मी बातचीत केली. काही नविन मासे आणि कासवाचे प्रकार माहीत करून घेतले. बोलता बोलता हळूहळू आम्ही ज्या ठिकाणी पक्षी ठेवलेले होते त्या ठिकाणी आलो. प्रत्येक पक्षी न्याहाळताना एक वेगळीच अनुभूती प्रत्ययास येत होती.
माझी नजर चौफेर फिरत एका ठिकाणी स्थिरावली. काही क्षण असं वाटलं की नजर याच जागी खिळून रहावी. माझी नजर एका पक्ष्यावर स्थिरावली होती. त्याच्याकडे बघताक्षणी तो मनावर गारुड करून गेला. त्या ठिकाणच्या सर्व जीवांमध्ये हा पक्षी सुंदर होता. त्याच्या समोर क्षणभर मला मोरही फिका वाटला. निसर्ग सौंदर्याचा अनुपम नजराणा माझ्या समोर होता. मी त्याला नखशिखांत न्याहाळू लागलो. त्याचे इंद्रधनूप्रमाणे सप्तरंगी आणि कापसाहून मुलायम पिसं, चिमणीहून नाजूक शरीर, इवलेसे पण गरुडाप्रमाणे ताकदवान पंख, त्याचा राजहंसासमान डौल, कोकिळेसमान सुमधूर आवाज, दवबिंदू समान चमचमणारे इवलेसे डोळे, इवलीशी मात्र भाल्यासमान टोकदार चोच, प्रमाणबद्ध पाय व धारदार नख्या, घारीसमान चलाख नजर... सर्वकाही थक्क करणारं होतं. बघताक्षणी असं वाटायचं की विधात्याने त्याला निर्माण करताना खूपच फुरसतीत काम तडीस नेलं असावं. त्याच्याकडे पाहून अवघं सृष्टीसौंदर्य एकाच ठिकाणी एकवटल्याचा भास व्हायचा. प्रथमदर्शनीच तो मनात घर करून गेला होता. तिथल्या नोकराला मी त्याच्याबद्दल माहिती विचार
ली. त्याने जास्त काही सांगितलं नाही. इतरांप्रमाणे त्याचीही चांगली बडदास्त होती. वेळेवर दाणा-पाणी, आजारपणात औषधे, सूर्यप्रकाश, स्वच्छता, सावली, मनसोक्त गुंजारव करण्याची मुभा... सर्वकाही अगदी त्याच्या मनासारखं होतं. तरीही त्याच्या डोळ्यात काही वेगळे भाव मला जाणवले. ते भाव होते सद्यस्थितीची मर्यादा आणि अवकाश भरारी मारण्याची आशा दर्शवणारे. सर्वकाही पुरवलेलं असतानाही तो पक्षी स्वतःच्या नाही तर मालकाच्या मर्जीने जगत होता. दुकान मालकाशी जेव्हा मी त्याच्याबद्दल बोललो तेव्हा त्याने त्या निरागस जीवाला कश्याप्रकारे सुखसोयी पुरवल्या आहेत ते सांगितलं. पण त्याच्या भोवती असणारा पिंजरा मात्र दुकान मालकाच्या बोलण्यात आणि दृष्टीक्षेपात आला नाही. त्याच्या लेखी तिथला प्रत्येक जीव आपापल्या मर्जीचा मालक होता , हवे तसे वागण्यास स्वतंत्र होता. पण कदाचित हे अर्धसत्य आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही. पक्षी स्वतंत्र होता पण त्याच्या स्वातंत्र्याला पिंजऱ्याच्या सळ्या त्याच्या स्वातंत्र्याची मर्यादा सांगत होत्या. पिंजऱ्यातून बाहेर येण्याची त्याला मुभा नव्हती. त्याच्या नाजूक , इवल्याश्या शरीराच्या मानाने त्याचा पिंजरा भरपूर विस्तीर्ण होता. उडून पिंजऱ्यातल्या दांडीवर बसणे आणि पुन्हा खाली बसणे एवढीच काय ती त्याची भरारी. मोठी अवकाश भरारी त्याला स्वप्नातच किंबहुना तिथेही दिसत होती की नाही देव जाणे !
मालकाला त्याच्या सर्व गरजा समजत होत्या पण अवकाश भरारीची मुख्य मूलभूत गरज मात्र समजत नव्हती. पक्षी आणि अवकाश भरारीचं समीकरण त्याला अवगत नव्हतं. त्याच्या लेखीच्या स्वातंत्र्यात पक्षी मात्र परतंत्र होता. त्याचा श्वास मोकळा असूनही कोंडलेला होता. तो भरारी मारूही शकत होता आणि नाही ही. त्याच्याकडे मी आता आधी प्रमाणे कुतूहलाने नव्हे तर सहानुभूतीने बघत होतो. मन कुठेतरी त्याच्यासाठी किंबहुना सर्वच जीवांसाठी आक्रांत करत होतं. त्या विचारांत मी पुरता हरवून गेलो होतो आणि इतक्यात दादाने मला धक्का दिला आणि मी भानावर आलो.
घरी जाताना मात्र मी त्या मुक्या जीवाला सोडवण्याचाच विचार करत होतो. त्याचं अवकाश भरारीचं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय करत होतो. एव्हाना दुचाकीने वेग घेतला होता पण माझ्या मनातलं वादळ काही शमलं नव्हतं. आजही ते तसंच घोंघावत आहे कारण पुन्हा रामबागेत जाण्याचा प्रसंगही आला नाही आणि संधीही मिळाली नाही. पण मी आता दृढनिश्चय केला आहे... संधी मिळाली की रामबागेत जायचं. तथाकथित स्वातंत्र्याला स्वातंत्र्याचा खरा अर्थ देण्यासाठी, तो मोकळा श्वास खरोखर मोकळा करण्यासाठी, त्या लोखंडी पिंजऱ्याचं कुलूप तोडून ते बंदिस्त निसर्गसौंदर्य पुन्हा निसर्गाच्या हवाली करण्यासाठी...