शब्द तेवढे सोबती
शब्द तेवढे सोबती


शब्द माझे सोबती होतात
भजनातून भगवंतापर्यंत नेतात
टाळ मृदंगाच्या तालावर डोलतात
गीत सुरेल बनून ओठी येतात
शब्द माझे सोबती होतात
काळजात रुतलेल्या भावनांना
अबोल झालेल्या त्या हुंदक्यांना
हळुवार बोलते करून जातात
शब्द माझे सोबती होतात
आधाराच्या शब्दांनी हातात हात देतात
आशीर्वादाच्या सुमनांनी ओंजळ भरतात
अडीच अक्षरांनी जगणे गंधित करता
शब्द माझे सोबती होतात
कधी मान देतात,अपमान ही करतात
जखमेवरचा ढलपा काढून
मोकळे होतात
कधी मलम होऊन अलवार फुंकर घालतात
शब्द माझे सोबती होतात
ज्ञानेश्वरीचे ओवी,कबिराचे दोहे
नाथांचे भारुड..गीतेचा अध्याय बनतात
जगण्यास नवीन दिशा देतात
शब्द माझे सोबती होतात
प्रेमात पडायला शिकवतात
जगण्याचा आनंद देतात
शब्दसरीत न्हावूनी मने
तृप्त होतात
शब्द माझे सोबती होतात