deepali bhavsar-dnyanmothe

Others

5.0  

deepali bhavsar-dnyanmothe

Others

साथ सोबत

साथ सोबत

7 mins
1.8K


रातकिड्यांची किरकिर हळूहळू मंदावतेय .... संपतच आलीय की जवळ जवळ ... हा रात्रीचा शेवटचा शांत प्रहर ... मग हळूहळू पहाट चाहूल .. ब्राम्हमुहुर्ताची शुभ वेळ! ही नेमकी काळ्याकभिन्न रात्रीला जोडूनच का असावी बरं ?

ह्या रात्रीच्या अंधाराच्या जोडीला कधी, इथल्या नेहमीच्या रातकिडयाची तार स्वरातली किरकिर तर कधी त्या दूर टेकडीवर उभ्या मोहाच्या झाडावरल्या, काजव्यांच्या फांदीची ती नाजूक चमचम ..? हो लांबवरलं काजव्यांचं चमचमणारं मोहात पाडणारं झाड ते !

नेमकं काय बरं साजेसं या मौनभरल्या अंधाराच्या मनोव्यापाला ? किरकिर की चमचम ? अन् यातलं मी काय निवडावं नेमकं मन रमवायला ? लांबवर बघावं की जवळचं ऐकावं ?मनात साठवून काय घ्यावं बरं ? सध्या तरी कान बंद करावे अनं दृष्टी सुख घ्यावं !

पण कधी कान उघडे ठेवले ना की अंधाराच्या सोबतीला ही एका लयीतली शांतताही ऐकू येवू लागते ..पण कान देवून . मन एकाग्र करुन ऐकावं लागतं बरं ... आणि माझ्या मौनाची ही गुणगुणही तशी चिरपरिचित !

तानपुरा घेऊन रियाजाला बसावं अनं ओळखीचे , माहितीचे सुर गुणगुणत गुणगुणत ... अचानक हा भवताल अनोख्या ...आजवर कधी न ऐकलेल्या आपल्याच स्वरमंडलानं भरून जावा . . दिव्य स्वरांची सोबत मिळावी अन् विस्तीर्ण पोकळीतला गंधार सापडावा अस होत असावं ना कधी कधी सुरांची साधना करणाऱ्या ... कुणा गायकांसोबत ... अन् मग त्यातून बाहेर आल्यावर त्याच तानपुऱ्याला डोकं टेकवून शांत बसल्यावर भवतालची सुरांची मंडलं हळूहळू मौनाची वलयं होत जातात आसमंत अजून गहिरा , हळवा , ओलसर .. दवभिजला करत !

ते मौन आणि सापडलेला गंधार ! कृतकृत्य क्षण मौनानच साजरे होतात बहुधा ! किती लोभसवाणं आहे न हे मौन . . शांततेच्या राज्यात जाण्यासाठी उचललेलं पहिलं पाउल .

मलाही मौन प्रिय झालयं आताशा ... सुर गुणगुणावे .. तसं माझं हे मौन गुणगुणत रहातं मनाभोवती ..

फेर धरतं जुन्या नव्या आठवणींबरोबर

आणि कधी कधी मग , अनोख हुरहुर लावणारं काहीतरी आठवत जातं जुनं मनाच्या सांदी कोपऱ्यातलं ... अचानक ...ते सुर असतात कधी तर कधी शब्द ! कधी विचार ! कधी तो ओळखीचा रंग भारला अवकाश , कधी कुठला चिरपरिचित

गंध ? हे तरंग मन भरून भारुन टाकतात ... सोबत ही करतातच की मनातल्या मनात अन् त्यावरोबर हे आत्ता मिळणारं दृष्टी सुख ..

खरं तर चालता चालता दूरपर्यंत काजव्यांची सोबत हवी हवीशी वाटतेय माझ्या मनाला ! म्हणून त्यांना बघत रहावं आणि चालत रहावं दूरपर्यंत .. . तेवढीच कुट्ट अंधारात गवसलेली नेत्रसुखाची परमावधी ! मंद वाऱ्याच्या झुळुकीसरशी झाड हलले की थोडा वेळ त्यांची समाधी भंग होते ... मलाही नेमकी तिथूनच येवून ही झुळूक स्पर्श करून जाते . गालावर हळूवार ! आणि त्या सोबतीची खात्री पटते मग .

निस्तब्ध आसमंत ..पान न् पानं ... सगळ शांत .. अंधाराच्या कुशीत सगळं आलबेल असल्यासारखं !

एखादी सुगंधी पाकळी हळूवार उमलतीकडे झुकावी तसा हा रात्रीचा प्रहर उगवतीकडे झुकतोय . मावळतीची चंद्रकोर पूर्णपणे टेकलीये दूरच्या डोंगरावर , श्रांत ...क्लांत ... मलूल ! तिचे साजूक कमलनेत्र हळूवार मिटल्यागत भासतायेत...

उजेड , प्रकाशाची एकही तिरीप सहन व्हायची नाही त्या

नेत्रांना ... आणि तिच्या मनी बहुतेक दाटून आलीये हुरहूर !

मी तिला मनातच अजीजीनं म्हटलं ...अग .. जरा थांब .. थांब ना ! पळत जाऊन स्टँडवरच्या कॅमेराला घाईघाईने काढून त्याला telescopic lens लावली अन एका क्षणात तिला उराउरी भेटले अगदी जवळ जाऊन ! तीची कोमल सोबत नेहमीच फार हवी हवीशी वाटते .. म्हणून लगेच कैद केला तिचा अन् माझा भेटण्याचा हा क्षण !

खरंच ! ..कशाच्याही , कुणाच्याही जवळ गेल्याशिवाय ... त्या मनीचे , त्या आयुष्यातले खाचखळगे अन् त्यातल्या व्यथा , गाथा उमगत नाहीत हेच खरे ..

हळूहळू ती अंतर्धान पावली ... पण अंतःकरण मोकळे करुनच !

विस्तीर्ण क्षितीज नुसते ओकेबोके झाले .... बाकी सगळ्या आभाळभर चांदण्यांचा खच पडलायं नुसता .. पण डोंगरापल्याड अदृष्य झालेल चंद्रकोरी सोबतचे ते रेंगाळणारे क्षण आठवून .. राहून राहून पश्चिमेकडे नजर

जातेय ..

मावळण्यातली वेदना या पाश्चिमेच्या ललाटी कायम ठसठसत राहिलं असं वाटतंय ... दाटलेली हुरहुर , व्याकुळ विरह वेदना , आणि मग आभाळाच्या विशाल ,निळसर पटावरून निवृत्ती ..ह्या पाश्चिमेच्या भावसख्या कायमच !

सगळे नभांगण... तारका ,ग्रह ह्या

पश्चिमेला हलकेच आपले गुज सांगून निरोप घेत असावेत

वाटतं ! डोंगराआड लपलेली विस्तीर्ण पाश्चिमा नकळत हळवी का वाटू लागलीय ? तिला रात्रभर सोबत करणाऱ्या ह्या सख्या हळूहळू निरोप घेऊ लागतात म्हणून ?

ही रात्र जागतांना .. सगळ्यात आधी निरोप घेणाऱ्या त्या सूर्याचे ... मावळतीचे क्षणही मनात रेंगाळतायेत ..

ग्रेसांच्या मनातला ancient companion चा अर्थ उलगडत जातो हळूहळू ...

'A descending sun is always been my companion ! Not because he enters into the heart of night but because his way of entering into the darkest heart of night is very polite and lyrical!

He does not pierce the dagger of it's light into her heart but very lyrically makes the night aware of her time and tune! '

'मावळता सूर्य हा माझा आदिसखा

त्याचे अंधार गर्भात शिरणे

किती नम्र आणि भावनापूर्ण ,

विलक्षण गेयता असलेलं !

आपली सोनेरी किरमिजी किरणे

कटयारी सारखी अंधाराच्या काळजात

न रोवता कमालीच्या भावमधुरतेने

' आता तुझं राज्य "

असं निशेला गोंजारून सांगत तो

हळूवारपणे निरोप घेतो ... '

शब्द मनात रेंगाळत रहातात ...

ह्या आदिसख्याची साथ सोबत वसुंधरेला कायम हवीहवीशी वाटणारी ... आकाशाच्या पटावरून जातांना किती कोमल पणे निरोप घेतो तो ... त्याची किरणं ही किती रेंगाळतात .. ह्या वसुंधरेला प्रेमाच्या गुलाबी रंगात न्हाऊ घालून मग निरोप

घेतात !

मग सुरु होतो चांदण्यानं शृंगारलेल्या निशेचा खेळ !

तीचं खुललेलं सुंदर रुप साद घालत रहातं ... धुक्यानं आसमंत गाहिरा होत जातो ..रात्र चढत जाते ...

तिथे वर आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्यांची मैफल खूप रंगून लुकलूकत , चमचमत जणू दैवी स्वरांशी संधान बांधतेय ... त्या सुरांशी खेळत .. कधी समेवर पोहोचत .. भैरवीचा गुलाबी साज चढवेल आता ...आसमंताला .. कुणास ठाऊक ही इतकी रंगलेली मैफील आहे कुणासाठी ? निशाचरांना भावना असतात का ? हे सगळं सगळं सुरमयी गुपित समजून घेण्याच्या ? कदाचित असाव्यात ! म्हणून ते रात्र जगतात , साजरी करतात ...

या मोकळ्या माळरानावरचा हा भन्नाट वारा ... रात्र चढतेय तसा मोकाट सुटलाय ...कुडकुडायला लावतोय नुसता ... कडाक्याच्या थंडीत मला आंजारून गोंजारून कुठे धावत निघून जातोय न कळे ! त्याच्या बरोबर पाठशिवणीचा खेळ खेळता खेळता , माझ्यावर राज्य आलं म्हणून मी आपली त्याला पकडायच्या तयारीत ,आणि तो मात्र हातातून सटकून पळून जातोय . अगदी हव्याहव्याशा पण निसटून जाणाऱ्या क्षणांसारखा ! न थांबता , न ओळख देता आला तसा निघून जातोय ! अगदी परक्यागत ... सोबत घालवलेले बेफाम आनंदाचे क्षण त्यालाही आठवू नयेत ? माझं मन थोडं खट्टू झालंय खरं !

लांबवरून चालत चालत येवून पुन्हा नेहमीच्या जागी टेकलं की आपसूकच नजर पार क्षितीजापर्यंत जाते .

दूरवर खाली गावात नुसतं धुक्याचं साम्राज्य ! काहीच दिसत नाही ... ह्या उंच डोंगरावर नुसतं अधांतरी तरंगल्याचा भास होतोय . . .

आता उठून जर ह्या झाडापानांना हात लावला नं तर दवाच्या थंड स्पर्शाने अंगावर शिरशिरी नक्की ठरलेली !आणि मग ओठांवर हसू ! अजून एक सुंदर अनुभूती मिळाली म्हणून !

गात्रांना सगळ अनुभवता येणं म्हणजे परमावधी सौख्याची ! नुसता पानांच्या सळसळीचा आवाज देखील हदयाच्या तारा छेडतो ? छे ! हा माहौलच जादूभरला आहे ! सगळ काही फक्त आपल्यासाठी च चाललंय अस वाटतंय

मांडवावरली रातराणी ... . किती फुललीयं .. चौफेर नुसत्या घमघमाटाची सोबत ! वाऱ्याच्या झुळुकां बरोबर आपल्या गात्रा गात्रातून फुललेल्या सुगंधाच अतीव सुंदर दान माझ्या झोळीत टाकतेय अन् मजेत हेलकावे घेतेय ... मी बघतच रहाते तिला .. इतकी सुंदर ही ... मला पुन्हा नव्याने जाणवलं !

हो ! सुगंधाचे वेड लागण्याच्या काळात ही माझी प्रिय सखी झाली होती खरी ! पण हळूहळू मीच तिला विसरले होते .... आता पुन्हा माझ्या आयुष्यात येवून ते सुगंधी करण्याचे ठरवलेय तीनं !

ही शेकोटी पण विझत आलीये आता ... तिची सोबत किती दिलासा देणारी ह्या कडाक्याच्या थंडीत ...

तिच्या जवळ बसून रहावं .. तिला बघत ... तिचं आपल्या साठी जळणं आणि उब देणं अनुभवत ..

ही उब घ्यावी आसुसून ... फार हवीहवीशी अन् प्रेमळ !

इथे ह्या शेकोटीतले लाल ठिपकयांसारखे उब देणारे निखारे , वर चांदण्याच्या ठिपक्यांचा खच !आणि दूरच्या झाडांवर काजव्यांचे चमचमते ठिपके .. नेमकं काय सुंदर आहे बरं !

थोडयाच वेळात फटफटेल ...

हे सर्व सोबती हळूहळू पांगतील ... आणि उषेचं राज्य सुरु होईल ...

पूर्वेला दूरवर लालसर गुलाबी रंग फुलतोय हळूहळू ... शब्द शब्द जोडत एखादी सुंदर कविता रचावी अगदी तस्स काहीसं चाललंय ह्या सृष्टीचं बरं ! प्रहरावर प्रहर जातातं अन् पहाटेची चाहूल लागते ... रात्रभर जागं राहून ही सृष्टी अनुभवतांना केवळ अन् केवळ अपूर्व आत्मानंदाचं धनी झाल्यासारखं वाटतंयं .... सगळं काही तेच असून नव्याने अनुभवल्यासारखं का वाटतंय ? का ही सृष्टी हे वेगवेगळे खेळ खेळत खेळत काही गुज सांगू पहातेय ? ... नेहमीसारखंच पण नवीन काही ... रे शांत मना .. ही सुंदर अनुभूती कसली ?

त्या चंद्रकोरीगत मीही आता शांत , क्लांत .... मलाही तिच्यासारखं टेकावंसं वाटतंय कुठेतरी !

आधीन व्हावं आता निद्रा देवीच्या !

गुजरे हुवे हसीन लमहोंका साथ घेऊन ...

मनात एकच येतंय ...

परमेश्वरा ! ह्या सगळ्या सोबत्यांची साथ पुन्हा माझ्या स्वप्नात नवा खेळ मांडू दे !


Rate this content
Log in

More marathi story from deepali bhavsar-dnyanmothe