deepali bhavsar-dnyanmothe

Others

1.5  

deepali bhavsar-dnyanmothe

Others

दृष्टी ...

दृष्टी ...

6 mins
2.1K


आषाढ सरी कोसळून थांबल्या. तसा कौलांवरून येणारा थेंबांचा आवाज हळूहळू मंदावला . खिडकीबाहेर , ठिपकणाऱ्या थेंबांची चमचमती माळ विरळ होत गेली.... आणि अंगणात साठलेल्या पाण्यात थेंबानी कधीची उठवलेली गोल गोल नक्षी उमटायची थांबली.... वातावरणातला हवाहवासा सुखद गारवा मनात भिनला ...

मी कोपऱ्यातल्या स्टँडवर अडकवलेल्या छत्रीकडे एक नजर टाकली अन् काही विचार करून बाजूला असलेला रेनकोट उचलला ... पायात गम बूट अडकवले अन् ओल्या वाऱ्याची शिरशिरी अंगावर घेत सरावाच्या पायवाटेवरून निघाले..

हलका पाऊस झेलत ...हिरव्या मखमली , पार लांबवर पसरलेल्या गालिच्यासारख्या पोपटी नवथर रंगाला डोळ्यात साठवत तांबडया ओल्या मातीवरून कधी घसरत, कधी सावध करीत ,असं हे एकला चलो रे .......

चालतांना नजर समोरचा निळसर हिरवा डोंगर आणि त्यावरून कोसळणाऱ्या असंख्य शुभ्र प्रपातांवर खिळलेली.

पावसाने गच्च भरलेले ढग त्या डोंगराच्या अंगाखांदयावर.आज दिवसभर पाऊस नुसता कोसळणारे वाटतं...

लांबवर भातशेतीत चमकणारं पाणीच पाणी .. तंद्रीत सुखीमावशीचं शेत कधी आलं कळलंच नाही ... बांधावरच तिचं खोपटं पार वाकलेलं ... कसबसं तग धरून उभंय.

बांधावरच्या मोठया सावरीला वळसा घालुन मी चिखलातून पाय सोडवत सुखीमावशीच्या शेताच्या दिशेने निघाले.

शेतात वाकलेली सुखी मावशी दिसली .एका ओळीत छोटी छोटी भाताची रोप लावत हळूहळू मागे सरकत मधेच उभं रहात आवडीच्या लोकगीताची तान छेडत पुन्हा कमरेत वाकत एका लयीत तीचं काम चालू होतं. मी तीला हाळी दिली आणि हात हलवला. तीने इकडे ये चा इशारा केला .

बांधावरून उतरतांना नेमका पाय घसरला आणि जवळजवळ अर्धा पाय चिखलात बुडाला .तो वर काढायची माझी कसरत पाहून सुखी मावशी खुदखुदली...

आणि चेष्टत म्हणाली , " जरा हळू चालावा मानसानं ... आन बेतानं पाय टाकावा ...नुसता घाईनं पळत रवलस तर अंदाज कसा येनार खोलीचा .." मी रागाने तिच्याकडे पहात पाय झटकला ....

ती जवळ आली आणि इरल्यासकट बांधावरच्या दगडावर टेकली .साठलेल्या पाण्याने माझा गम बूट धूत मी तिच्याकडे बघितले . माझा फुगलेला चेहरा निरखत म्हणाली ," चल ,वायच जराशी चाय पीऊ."

पुन्हा बांधावर चढत कसरत करत तिच्या झोपडीत गेलो .मी अवाक् झाले ... सगळं सामान भिजलेलं, बसायला कोरडी जागाच नाही, जो काय चारपाच भांडयांचा तिचा संसार तो पूर्ण भिजलेला.... दोरीवरचे कपडे ओलेगच्च ... तरीही हिच्या चेहऱ्यावर हसू?

माझा उतरलेला चेहरा पाहून ती हसली आणि बसायची खूण करत स्टोव पेटवायला घेतला . बऱ्याच प्रयत्नानंतर तो पेटला आणि तिने आधण ठेवले .ओली साखर आणि ओली चहापाडर टाकतांना गाणं गुणगुणायचं कसब मात्र चांगलच साधलंय हिला ... मी पुटपुटले. छोटया फुलपात्रातलं दुध पाच सहा वेळा उघडून चाचपडत पहात ,ते नीट असल्याची खात्री झाल्यावर खुशीत येत सुखीमावशी म्हणाली, "एक गंमत सांगतय तुला .. काय असावा असा तुला वाटतंय .. वळख पाहुया ?"

स्टोव्हच्या उजेडात दिसणारे तिचे तांबूस तपकिरी डोळे आनंदात लकाकले. गोऱ्या रापलेल्या चेहऱ्यावर चमक आली .... खणाचं जुनं ठिगळं लावलेलं जांभळट पोलकं आणि अर्धी पिवळट धुरकट साडी, तिलाही ठिगळं ,त्यावर जुना टॉवेल बांधलेला अशा अवतारातही शिडशिडीत सुखीमावशी किती छान दिसतेय .. मी गुढग्यावर हनुवटी ठेवून तिच्याकडे बघतच बसले .बोलतांना तिचे जाडसर डूल हलत होते .. नाकातली नथनी चमकत होती ...

'अगं तुला काय ईचारतंय... सांग की ... इतका राग बरा न्हाय हा ...सांगतय तुला ' .

मी भानावर आले आणि हसून बोलले 'मला कशी समजणार तुझी गंम्मत ... तुच सांग ना ' ....

कपात चहा ओततांना ती खुशीत हसली. 'मी मागे तुस बोललं नवतंय ...ईसरलीस? '

'काय ते ? '

'आगो परशरामाचा पत्र आलय कालच पुन्हा ....

सारखं बोलवतय ... मी जाईन परशाकडे असं म्हनंतय .... पन मला कसा करमनार तिथे देवास ठावूक ? '

मी तिच्या कडे बघून हसले ...

गारठून गेल्यामुळे काही न बोलता आधी चहा संपवला मग थोडा वेळ इकडचे तिकडचे बोलून शेताकडे गेलो . तिच्या बरोबरीने शेतात उतरून भात लावायला मला फार आवडत असे .

गप्पा मारत मारत, कधी मोकळ्या गळ्याने ताना छेडत तीनं तिची गाणी ऐकवावी अन् मी माझी फिल्मी गाणी ..... तिच्या गाण्यांना मी हसत असे अन् माझ्या गाण्यांना ती..

भवतालच्या पोपटी रंगात न्हायलेलं लुसलुशीत भातशेत... वर आभाळात निळा ओलसर ढगाचा तुकडा ... दूरचे निळे राखाडी डोंगर .... मधे मधे मातकट चकाकणारे पाणी .... ढग , पाऊस आणि हयात मध्यभागी आम्ही !

पेरणी आणि गाणी ह्यात संध्याकाळ कधी होई ते समजायचे नाही .... उन्ह कलल्यावर मी तिचा निरोप घेऊन निघे ...

आता कितीतरी दिवसांनी माझे पाय पुन्हा तिच्या शेताच्या वाटेकडे वळले ...

पावसाळा कधीच संपला होता .... बोचरी थंडी हळू हळू जाणवू लागली होती...

झाडांची पानगळ सुरु होती, डिसेंबर असावा बहुतेक.

ओसाड शेताडीतून चालतांना मधे मधे

डोंगराकडे लक्ष जाई .उघडा बोडका डोंगर अजूनच तपकिरी काळा ...

वाळलेली पानं , शुष्क झाडं , कोरडा पण अंगावर शिरशिरी उठवणारा वारा ....

चालत चालत तिच्या घराची पायवाट कधी संपली कळलंच नाही ...

सुखी मावशीचं खोपटं आल्यावर पाय थबकले ....

ही असेल की नाही इथे की मुलाकडे रमून गेली .... मी पुटपुटत झोपडीचे दार हलवले ...

आतून क्षीण आवाज आला 'कोन ? '

' मावशी मी आहे ग .. '

'असा काय... ये बाय ये '

मी मावशीकडे बघितले .... खूप उदास वाटली ...

हसल्यासारखे करून उठून बसली

मावशीचे तपकिरी डोळे गढुळल्यासारखे वाटतायेत.... हसणारी रेष चेहऱ्यावरुन गायब झालीये ...

बोलता बोलता हळूहळू समजले की परशाकडे रहायला गेली खरी , पण थोडया दिवसानंतर हळूहळू सगळ्यांचे वागणे बदलत गेले ...तिथे तिला कुणीही विचारेनासे झाले . तिचा जीवच रमेनासा झाला .... शेताची ,घराची आठवण तिला उदास करू लागली .... मग एक दिवस आली निघून आपल्या खोपटात परत ....

आम्ही बाहेर बांधावर येऊन बसलो ..

गार वारा सुटलेला .... सुखी मावशीचे भुरकटलेले केस वाऱ्यावर उडत होते

तिच्या मनात खूप काही साठलेले ...

आपल्या कृश हाताची मिठी दोन पायाभोवती घालून गुढघ्यावर मान टेकवून बराच वेळ लांबवर बघत बसून राहिली ....

कापणी झालेलं खुरटं माळरान आणि सुखी मावशी एकसारखे वाटत होते ...

माणसांत राहून पण जास्त एकटी पडली..म्हणून इथे निघून आली ती..

अन् इथे आता एवढया मोठ्ठया माळावर एका खोपटीत पुन्हा एकटीनेच दिवस काढावे लागणार म्हणून काहीशी उदास झालेली...

' मला समजतच नाय बघ काय आन् कसा करावा ? '

बाजूचं खुरटया गवतावर आपल्या हात फिरवत सुखी मावशी बोलत राहिली...

'पन तुला एक सांगू बाय... '

' ही खोपटी आन हा माळ... मला माझा सोबती वाटताव ग ... खूप जवळचा ! '

'दुसरा कोनी कोनी नको वाटताव बघ '

'कुनाशी बोलू नाय की कुनाकडे बघू नाय ... '

'तुला सांगतंय ...माळावर ,माझ्या शेतात

आल्यावर लय मोकळं मोकळं वाटतंय बघ. '...

'काय वारं येतंय ! ... कसल्या कसल्या गोष्टी करत रहातंय बघ हे वारं ,आख्खा दिवस कानांत '...

' दिसरात खपून भात लावला आन् पाऊस आला की त्या मातीच्या वासानं , भाताच्या वासानं जीव निस्ता येडावतंय... त्या हिरव्या भाताला कुठ ठेवू नी कुठ नाही ? '

असा व्हतय ....

'आन् रातीला... हया आभाल गच्च भरतंय चांदण्यानं... अस्सा टिपूर चांदणा ... डोळे मिटूसा वाटत नाय ' ...

'हया पानांचा, झाडांचा वास ना माझ्या अंगाअंगात मुरलाय गो '.....

' ह्या सगला सोडून मी जगूची नाय ... कश्शीच जगूची नाय '......

सुखी मावशी बोलून थांबली ....

सुर्य कलला... आणि निळं आभाळ हळूहळू सोनेरी होऊ लागलं होतं.... लांबच्या तळ्यात आभाळाचं निळशार प्रतिबिंब ... आता अगदी सोनेरी जांभळट दिसतयं ......

बांधावरून हळूहळू चालत चालत आम्ही तळ्याकाठी येवून बसलो ... शांत ,निवांत ... फक्त किलबिल ऐकू येतेय कुठुनशी ...

दूरवर आकाशात शुभ्र पक्षी, माळा करीत करीत घराकडे परतू लागलेले .....

ती आकाशाकडे , त्या पक्षांकडे बघत राहिली ... अन स्वःताशीच हसली...

तिच्या गळ्यातून हलकेच एका गाण्याची तान उमटली ... सुरवातीला जरासा आर्त लागलेला सूर हळूहळू शांत मधूर होत गेला ....

गाण्यातले शब्द कळले नाहीत पण त्यातली आर्तता काळजात कळ उमटवून गेली ......

पाण्यामधे ,काठावर बसलेल्या आम्हा दोघींचे हलते प्रतिबिंब ... तिथे वर आभाळात घरट्याकडे परतणारे पक्षी.... आणि शांत स्तब्ध संध्याकाळ ....

सुखी मावशी एकटी नाहीच ....

तिने सहजपणे आपलं माणूसपण बाजूला सारलंय... आणि निसर्गाचा एक भाग बनून राहिलिये ती.... त्याच्यावर पुर्णपणे विश्वास टाकलाय तिनं अगदी गाढ विश्वास ... तिचा एकटेपणा दूर करणारा सोबती ... त्याच्या बरोबर राहून जणू निसर्गच झालीये ती ....

निसर्गातल्या शांततेत तिच्या मनातला मोह, अहं ....जर काही असलाच तर गळून पडलाय ....त्याच्या विशाल , भव्य रुपा समोर नतमस्तक होऊन ती त्यात एकरूप झालीये ...या दुनियेच्या मोहमायेतून बाहेर पडलीये तिची दुनिया वेगळी ,तिचं जग वेगळं....

गार वाऱ्याने तळ्यातल्या पाण्यात हलकेच तरंग उमटले .... पण थोडा वेळ ...मग पुन्हा पाणी संथ ,शांत होत गेले .... हळूहळू मावळतीचा सोनेरी रंग त्यावर पसरू लागला .... मला ते पाणी अगदी सुखी मावशीच्या तपकिरी शांत डोळ्यांसारखे भासू लागले....


Rate this content
Log in

More marathi story from deepali bhavsar-dnyanmothe