राजवटींची उद्दिष्टे:सहज गप्पा गोष्टी
राजवटींची उद्दिष्टे:सहज गप्पा गोष्टी
मित्रांनो, सर्वप्रथम सांगायचे ते हे की तुम्ही वाचत आहात त्या निव्वळ गप्पा गोष्टी आहेत, कुठल्याही बाबतीत निर्णायक विधान याद्वारे प्रसूत करत नाही.
कांचन बारीची लढाई (१६७०) व पश्चात साल्हेरची लढाई (१६७१) सुरू असताना मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना हा दाऊदखानाच्या सोबत होता. यादरम्यान भीमसेन सक्सेना याला आलेला रोचक अनुभव त्याने विदीत केला आहे. तो वाचल्यावर बॉर्डर या चित्रपटातील "हम तो सिपाही है साब्जी, प्लान तो उपर वाले लोक जानते है" असे एका पाकिस्तानी सैनिकाने सनी देओलला दिलेले उत्तर स्मरून जाते.
या सुमारास भीमसेन हा दाउदखानाच्या पाठोपाठ साल्हेरकडे चालला होता. तो मागे रेंगाळल्यामुळे त्याची (भीमसेनची) वाट चुकली. भीमसेन म्हणतो,
“दाउदखानाने हुकूम सोडला होता की भारी सामान मुल्हेरमध्ये ठेवण्यात यावे. साल्हेर किल्ल्याचा उपराळा करण्यासाठी सैन्याने भल्या पहाटे मुल्हेरहून निघावे."
दाउदखान हा स्वत: लवकर निघाला. मला उशीर लागला. माझ्याबरोबर थोडे पायदळ होते. ते घेऊन मी मुख्य सैनिकांकडे निघालो. तो पर्यंत दाउदखान आणि मुख्य सैन्य हे बरेच लांब निघून गेले होते.
मी पुढे निघालो तो साल्हेर आणि मुल्हेर यांच्या दरम्यान एका निर्जन खेड्यापाशी पोहोचलो. हे खेडे साल्हेर आणि मुल्हेरच्या मध्ये आहे. जवळच एक लहान टेकडी होती. मी त्या टेकडीवर होतो. मी पाहिले की काही सैनिक टेकडीकडे येत आहेत. ते मराठे होते. ते टेकडीच्या पायथ्यापर्यंत आले. मी मोठ्या घोटाळ्यात पडलो. एक घोडेस्वार माझ्याकडे येत होता. तो आपल्या सोबत्यांच्याकडे वळून म्हणाला, तुम्ही येथेच थांबा. मला वाटते मी या घोडेस्वाराला (भीमसेन) ओळखतो. या नंतर तो घोडेस्वार आणखी दोन स्वारांबरोबर माझ्याजवळ आला. त्याने मला नावाने हाक मारली. तो म्हणाला, 'तू येथे एकटाच कसा?'
मी अतिशय घाबरलो होतो. मी त्या माणसाला ओळखले नाही. तो म्हणाला. 'मी नूरखान आहे.' या नंतर तो आपल्याबरोबर आलेल्या घोडेस्वारांना म्हणाला. 'तुम्ही आपल्या कामावर परत जा.' नंतर तो माझ्याकडे वळून म्हणाला, 'मी तुम्हाला तुमच्या छावणीत पोहोचवून परतेन. आपली गाठ पडली हे फार बरे झाले, नाही तर आज तुमचा जीव गेला असता.'
माझे वडील औरंगाबादेस होते तेव्हा नूरखानाची आणि त्यांची ओळख झाली होती. पुढे नूरखानाची नौकरी गेली आणि तो अडचणीत आला. त्याने काही घोडेस्वार जमविले आणि शिवाजीच्या हाताखाली चाकरी घेतली. बागलाण प्रदेशांत त्याची नेमणूक करण्यात आली. नूरखान हा दाउदखानाच्या छावणीपर्यंत मला सोडण्यास आला. मी त्याचा पाहुणचार केला. मी त्याला काही भेटी आणि काही रक्कमही देऊ केली. पण ती तो घेईना. त्याने दुपारी माझा निरोप घेतला.
इकडे दाऊदखान हा साल्हेरच्या वाटेवर होता. तो त्याला कळले की, मराठ्यांनी साल्हेरचा किल्ला घेतला (५ जानेवारी १६७१) त्यामुळे तो संध्याकाळच्या सुमारास मुल्हेरच्या तळावर परत आला."
असो, - अशीही ग्रंथकरत्याची हकीकत त्याने आपल्या तारीखे दिल्कुशा या ग्रंथात लिहून ठेवली आहे.
थोर इतिहाससंशोधक सेतुमाधवराव पगडी यांनी या ग्रंथाचे भाषांतर केले म्हणून भीमसेनची ही हकीकत समजली. पण यातून एका विलक्षण गोष्टीकडे लक्ष केंद्रित होऊन जाते.
नूरखान हा शिवाजीमहाराजांच्या नोकरीत आणि भीमसेन हा मोगलांच्या नोकरीत. आणि हे दोघे एकमेकांना मदत करतात ! सगळेच चमत्कारिक !
मित्रांनो, महाराज आणि बादशहा यांच्यातील हा संघर्ष राजकीय होता की धार्मिक.?
तो उठाव होता भूमीपुत्रांचा; एतद्देशियांचा, आणि कुणाविरुध्द ? तर परकीय सत्ता आणि परक
ीय नोकरशाही यांजविरुध्द.! शतकानुशतके ज्यांनी येथील भुमिपुत्राला केवळ गुलाम म्हणून वागविले, त्याच्या 'स्वातंत्र्यावर' बंधने लादून.!
दुसरे म्हणजे त्या बंधनात 'धार्मिक' बंधनेही आली हे विसरून चालता येणार नाही.!
तिसरे म्हणजे महाराजांच्या स्वातंत्र्यलढ्यात 'धार्मिक स्वातंत्र्य' हे आपसूकच येते.
असो आपण केवळ गप्पा करतोय तत्त्वचिंतन नाही!
मित्रांनो,
औरंगजेब बादशहाच्या कट्टर धार्मिकतेला महाराजांचा विरोध होता.! केवळ औरंगजेबच नाही तर पोर्तुगीजां सारख्या परकीय शासकांच्या धार्मिक कट्टरतेलाही महाराजांचा विरोध होता. गोव्याकडील मोहिमेनंतर महाराजांनी केलेला सप्तकोटेश्वराचे जीर्णोद्धार त्यांच्या 'धर्म निष्ठेचे' दर्शन घडवते.
मित्रांनो,
रावणाच्या दुर्गूना विषयी बोलताना आपण त्याच्या शिवभक्ती बद्दल चांगले किंवा बरे म्हणूया, बोलून जात नाही काय..?
तसे औरंगजेब बादशहाच्या बाबतीत घडलेच पाहिजे असे मी म्हणत नाही. कारण हा एक दृष्टिकोन आहे याने व्यक्ती बदलू शकत नाही. तरीही इतिहास आणि पुराणे आम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतात हे अव्यक्त आहे, पण अनाकलनीय नाही.!
मोगलशाहीत औरंगजेब बादशहाची धर्म प्रचार-प्रसाराची आक्रमक वृत्ती जोपासणारे देशी-विदेशी मुसलमान सेनापती-सरदार होते, तसेच राजकीय घडी स्थिर ठेवण्यासाठी जयसिंग व जसवंतसिंग या सारखे हिंदू राजपूतही बादशहाच्या चाकरीत होते. आणि भीमसेन सारखे कित्येक चाकर होते. पण हे सर्व वेगवेगळे होते.!
अर्थात बादशहाचे उद्दिष्ट साम्राज्यविस्तार आणि धर्म प्रसार हे जरी असले तरीही त्याच्या चाकरीतील अनेकांनी ही उद्दिष्टे आपापल्या सोयीनुसार आत्मसात केली होती असे दिसते.
खरे तर हे असेच असते.!
मुख्य सत्ताधीश आणि त्याचे अधिकारी किंवा म्हणा मुख्य असामी आणि त्याचे अनुयायी हे एक नसून किमान सामाईक धाग्याने बांधलेले असतात. मग तो धागा गरजेचा वा निष्ठेचा असा कोणताही असू शकतो.
राजपुतांना भाऊबंदकी पासून आपली जागीर आणि सत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी बादशहाची गरज होती, तसेच बादशहाला सुद्धा लढवय्या राजपुतांची गरज होती ती राजकीय घडी स्थिर ठेवण्यासाठीच.! मग भलेही ध्येय वेगवेगळे असो राजकीय उद्दिष्टे जवळपास सारखीच होती.
आजच्या भाषेत ते म्हणतात ना, "common minimum programm" किमान सामायिक धोरणानुसार सत्ता चालवायची असते.
पण मग ती सत्ता कशासाठी मिळवायची.? हा अधिकार त्या सत्ताधिशाचा !
'वाशिम' पाटी लावून निघालेली गाडी फक्त वाशिम जाणाऱ्यांसाठी नसते, वाटेत अनेक ठिकाणी इतर प्रवाशांनाही ती उपयोगाची ठरते.
प्रत्येकच सत्ता ही विशिष्ट ध्येय धोरणाने वागत असते. मात्र सर्वप्रथम ती एक राजकीय सत्ता असते, आणि राजकीय सत्तेचा गुण हा वर्चस्व असतो आणि वर्चस्वासाठी काही आंतरिक हेतू बाजूला सारावे लागतात.
मग वर्चस्व कशासाठी त्याची अनेक उत्तरे असतात, ती अनेक उद्दिष्टां प्रमाणे असतात.
प्रदेश ताब्यात घेणे, प्रदेशाचा महसूल प्राप्त करून राज्य अधिकाधिक बळकट करणे आणि शेवटी लोक जीवनावर प्रभाव पाडणे.!
शेवटच्या बाबतीत रयतेस धार्मिक स्वातंत्र्य देणे वा न देणे हा विषय होऊ शकतो.
तर असो मित्रांनो, प्रस्तुत भीमसेन-नूरखानबेग यांच्या भेट प्रसंगावरून काय बोलावे हेच कळत नाही..
शोधल्या तर यातून नाना कळा व्यक्त होऊ लागतात, पण मुख्य काय.? कदाचित या प्रश्नाचे उत्तर एक असू शकत नाही. कदाचित तेच बरे "हम तो सिपाही है साब्जी" शेवटी एवढच अनेक प्रकारच्या स्वभाव गुण रसायनाने बनलेलं माणसाचं मन... तराजूची पारडी स्थिरावण्याचा प्रयत्न.. आणि वाऱ्याचा गुण.!