प्रा रवि बाविस्कर Ravi Baviskar

Others

5.0  

प्रा रवि बाविस्कर Ravi Baviskar

Others

दारा शिकोह।।

दारा शिकोह।।

2 mins
754


मुगल घराण्यातील भारतातील अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्व म्हणजे शहाजहान बादशहाचा मोठा मुलगा मोहम्मद दारा शिकोह. दाराचा ओढा जन्मापासूनच विविध धर्माच्या अभ्यासाकडे होता. त्याने यहुदी, ख्रिस्ती आणि वैदिक वाङ़्यमयाचा अभ्यास केला. संस्कृतच्या विद्वान पंडितांना त्याने विविध प्रकारे आश्रय दिला. यासाठी कट्टर लोकांकडून व औरंगजेबाकडून त्याची नेहमीच निर्भत्सना झाली.

त्याचा संस्कृत आणि फारशी या दोन्ही भाषांचा व्यासंग दांडगा होता. त्याने भगवद्गीतेचे फारसी भाषांतर केले. ६५ उपनिषदांची फारसी भाषांतरे करविली. या फारसी भाषांतरावरून नंतर युरोपिअन लोकांनी त्यांची लॅटिन भाषांतरे केली आणि त्या लॅटीन अनुवादावरूनच युरोपला विशेषता: जर्मनीला उपनिषदांचा परिचय झाला.

असो,

उपनिषदांबद्दल दारा म्हणतो-

"मी हिंदूंचे धर्मग्रंथ अभ्यासिले. हिंदू हे अद्वैताचे विरोधी नाहीत. त्यांच्या चार वेदात आढळणारे अद्वैत तत्वज्ञान उपनिषदातून ग्रंथीत करण्यात आले आहे. उपनिषदे म्हणजे अद्वैताचा समुद्र होय. म्हणून मी त्यांचे भाषांतर केले. कोणत्याही तत्वाचा उलगडा उपनिषदांच्या द्वारे होऊ शकतो. सृष्टीतील पहिला ग्रंथ म्हणजे उपनिषद् होत. अद्वैत सागराला पुरवठा करणारा हा अखंड झरा होय. पुराणातील आणि उपनिषदातील तत्वज्ञानात साम्य आहे. कुराणात ज्या पौरुषेय ग्रंथाचा उल्लेख आला आहे ते म्हणजे उपनिषद्च होत, दुसरे असू शकत नाहीत."


दाराने योगवशिष्ठाचे फारसी भाषांतर करविले आणि त्याला स्वतः प्रस्तावना लिहिली. त्या प्रस्तावनेत तो म्हणतो-

"रात्री मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मला तेजपुंज दोन व्यक्ती दिसल्या. मी त्यांच्याकडे नकळत ओढला गेलो. त्यापैकी एकाने (वसिष्ठांनी) मोठ्या ममतेने माझ्या पाठीवर हात ठेवला. आणि दुसऱ्या व्यक्तीकडे वळून म्हंटले, 'प्रभू रामचंद्र, हा पहा सत्यशोधनाच्या मार्गातील पथिक.' 

हे ऐकून, प्रभू श्रीरामचंद्राने स्मित हास्य केले आणि मला प्रसाद दिला. मला जाग आली. माझी खात्री झाली की मी योगवशिष्ठाचे भाषांतर करावे अशी प्रभू रामचंद्राची आज्ञा आहे. मला तीव्र इच्छा झाली. ती आज्ञा मी पार पाडली"

असे हे दाराचे मनीचे भाव त्याच्या मुखातून व्यक्त झाल्यावर त्याच्या अध्यात्मिक ज्ञानाची पातळी कळते. अनेक वर्षापासून पानांवर ओवीबद्ध झालेले धर्माचे तत्वज्ञान त्याला प्राप्त झाले होते.

दाराचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे 'मज्मुअलबहरैन' हा होय. सन १६५५ मध्ये त्याने हा ग्रंथ लिहिला. १६५८ मध्ये या ग्रंथाचा त्याने संस्कृत अनुवाद केला. हिंदू आणि मुस्लिम अध्यात्म मार्गातील साम्य दाखवून दोन्ही तत्त्वज्ञानात काही भेद नाही हे दाखविण्याचा दाराने यात प्रयत्न केला आहे. या ग्रंथाचे त्याने संस्कृत भाषांतर करून त्याचे नाव 'समुद्रसंगम' ठेवले आहे. जणू विविध धर्माच्या नद्या एका सागरात विलीन होतात असेच काही तत्वज्ञान सांगण्याचा त्याचा प्रयत्न थोर आहे. मात्र वारसाहक्काच्या युद्धात पराजित झाल्यावर औरंगजेबाच्या हुकुमाने दारावर खटला भरवण्यात आला. इस्लाम धर्मापासून भ्रष्ट झाल्याचा त्यावर आरोप ठेवण्यात आला. काजींनी आरोपीची चौकशी करून त्याला धर्मभ्रष्ट ठरविले आणि त्याला देहदंडाची शिक्षा सुनावली. त्यानुसार १० सप्टेंबर १६५९ रोजी दाराला ठार मारण्यात आले. त्यादिवशी जल्लाद त्याच्या कोठडीत शिरले. त्यांनी त्याला आणि त्याचा कोवळा मुलगा सिपहर यांना पकडून त्यांच्या गर्दानी छाटल्या.!!

जणू सत्य धर्मावर चालण्याची शिक्षा त्याला मिळाली पण दारा आठवणीत राहिला तो त्याच्या धार्मिकतेमुळे तर औरंगजेब धर्मांधते मुळे.! औरंगजेब क्रूर धर्मांध होता तर दारा दयाळू आणि धार्मिक होता असे हे दोन ध्रुवाचे जणू टोकच नियतीने सोबतच निर्माण केले..


Rate this content
Log in

More marathi story from प्रा रवि बाविस्कर Ravi Baviskar