Sayli Kamble

Others

3  

Sayli Kamble

Others

पुन्हा एकदा शाळेत

पुन्हा एकदा शाळेत

2 mins
411


शाळेचा निरोप घेऊन आता दोन दशकांहून अधिक काळ उलटून गेला आहे. जसजशी वर्ष सरत गेली तसतशा मित्रांच्या भेटी हळूहळू कमी होत गेल्या. त्यानंतर तर फक्त आठवणीतच भेट व्हायची तिही अगदी कधीतरीच. जसे शाळेचा विषय निघाला की. पण काही वर्षांपूर्वीच सोशल मिडियामुळे आम्ही बरेच वर्ग मित्र मैत्रिणी पुन्हा संपर्कात आलो आणि व्हाट्सॲप वर ग्रुप बनवला गेला. गप्पा सुरू झाल्या. त्यातूनच भेटायचे ठरले आणि एका सुट्टीच्या दिवशी १०-१२ जण मॉल मध्ये भेटलो. भूतकाळ आणि वर्तमानकाळ ह्यांची सांगड घालत गप्पा चांगल्याच रंगू लागल्या होत्या. तितक्यात आमच्यातील कोणीतरी सुचवले की शाळा बघायला जाऊया. सगळे लगेच या साठी तयार झाले आणि पुढच्या काहि वेळातच आम्ही शाळेच्या इमारती जवळ पोहोचलो. इतक्या वर्षांत आम्हा सगळ्यांमध्येच किती बदल झाला होता. पण शाळा, ती मात्र आजही अगदी तशीच आधीसारखीच ओळखीची वाटत होती. खरंतर आपल्याला रिनोवेशन कन्सेप्ट आवडते. काळानुसार बदलत रहावेसे. ..अपडेटेड रहावेसे वाटते. पण आयुष्यात काही गोष्टी/ वास्तु अशा असतात की त्या कधीच बदलू नयेत असे मनोमन वाटत असते. जसे की आपण जिथे लहानाचे मोठे झालो, घडलो ती वास्तू. कारण त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात बालपणीचा भुतकाळ लपून बसलेला असतो. असो. 

      शाळेच्या गेटसमोर आम्ही खुप फोटोज आणि सेल्फीज घेतले. हल्ली सेल्फीज काढणे हे अपरिहार्यच झाले आहे म्हणावे लागेल. पण शाळेत जाण्याचा मोह आम्हाला कोणालाच आवरत नव्हता. शाळा तर आज बंद होती. मग शाळेत जाण्याची परवाणगी मिळवायची तरी कशी. तिथेच शाळेचा शिपाई होता. आम्ही ह्या शाळेचे माजी विद्यार्थी आहोत आणि वर्गात जाण्याची खुप ईच्छा आहे अशी आम्ही त्याला विनंती केली. आमची तळमळ बहुदा त्यालाही जाणवली असावी. त्याने लगेच आम्हाला परवाणगी दिली. क्षणाचाही विलंब न करता आम्ही तळमजल्यावरच असलेल्या आमच्या दहावीच्या वर्गाच्या दिशेने जवळजवळ धावतच सुटलो. इतक्या वर्षांनी देखील स्वत:चाच बाक शोधून आम्ही आपापल्या बाकावर जाऊन बसलो. आमची उंची वाढल्याने बाक छोटे वाटत होते. असे असले तरीहि शरीराला मात्र अजिबात अवघडलेपणा जाणवत नव्हता. वर्गभर नजर फिरवली. वर्ग तसा लहानच होता. पण अचानक आलेल्या इतक्या सगळ्या आठवणींनी नजरेत मावेनासा झाला. शाळेत असताना खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या जगात जाण्याची विलक्षण ओढ असायची. तेव्हा त्या लहानग्या डोळ्यांनी कितीतरी स्वप्ने पाहिली होती. आज मात्र त्या खिडकी बाहेरील जग ह्या आठवणींपुढे फारच छोटे जाणवत होते.

     सवयीप्रमानेच मघाशी सांगितल्याप्रमाने बाकावर बसूनही फोटोज आणि सेल्फीजचा रितसर कार्यक्रम पार पडला. तिथून निघावेसेच वाटत नव्हते. पण याहून अधिक काळ थांबताही येणार नव्हते. मग सगळेच तिथुन निघालो आणि घरच्या दिशेने वळलो खरे. पण मनात एक आशा घेऊन की लवकरच शाळेत पुन्हा येऊ आणि ते ही आज उपस्थित राहू न शकलेल्या इतर मित्रमैत्रिणींना सुध्दा सोबत घेऊन.



Rate this content
Log in