पाऊस आणि मी
पाऊस आणि मी


बऱ्याच दिवसांनी किंबहुना मोठे झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या निवांतपणे खिडकीत बसून पाऊस न्याहाळत होते. खरंतर चहाचा आस्वाद घेत पुस्तक वाचायचा बेत होता. पण पाऊस सुरू झाला आणि त्याने माझे लक्ष कधी वेधले ते माझे मलाच कळाले नाही.
लहानपणापासून नेहमी एक वाक्य मोठ्या माणसांकडून ऐकत आले आहे, 'तुझ्यापेक्षा खूप पावसाळे पाहिले आहेत बरं मी'. अर्थातच त्यांना यातून किती अनुभव त्यांच्या गाठिशी आहे हे दर्शवायचे होते. पण मला उगाच एक प्रश्न सतावत असे की यांनी फक्त पावसाळेच का पाहिले? अजूनही दोन ऋतू असतात की. 'उन्हाळा' आणि 'हिवाळा'. त्यांचा उल्लेख का नाही करत कोणी? आज मात्र या प्रश्नाचे उत्तर उलगडत होते. कारण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो नेहमीच कोणत्या तरी आठवणींत घेऊन जातो. आजही नेमके तेच झाले. शाळेत असतानाचा पाऊस आठवला. तेव्हाचे रेनकोट, काळ्या छत्र्या... लांब दांडा असलेल्या, गमबूट आणि सँडल्स. त्यावेळी फार व्हरायटी नसायची. पण तेव्हा त्याची गरजही भासत नसे. खूप साधे आणि वास्तव जगातच वावरणारे असे ते आयुष्य. खूप हेवा वाटत होता त्या दिवसांचा. आत्ताचे आयुष्य सुख देणारे नाही असे मी मुळीच म्हणणार नाही. पण तेव्हाच्या जीवनशैलीतील समाधान पुन्हा मिळणे नाही.
पावसाची सर कमी अधिक होत होती. हलकेच येणाऱ्या वाऱ्याने माझ्या मनासोबतच मी वाचत असलेले पानही कधीच हरवले होते. चहादेखील संपत आला होता. पण माझ्या विचारांना वेगळीच गती मिळाली होती. दररोजच्या विचारांपासून फारच वेगळे होते ते. कदाचित स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न सुरू होता माझा. पावसाच्या थेंबांनी जसे हळूहळू बाहेर सर्व स्वच्छ दिसू लागले होते तितकाच स्वच्छ भूतकाळ माझ्या डोळ्यांसमोर तरंगत होता... अशाच बऱ्याचशा आठवणी घेऊन.
दरवर्षी पाऊस पडत असतो. तरी त्यावर प्रेम करणारे पाऊसवेडे त्याची वाट पाहत असताना पाहिलेत मी. तसेच त्याची चाहूल लागताच कवींना कवितेच्या ओळी सुचल्याशिवाय राहात नाही. (मीदेखील त्याला अपवाद नाही.) हे असेच हरवून टाकण्याचे सामर्थ्य फक्त पावसातच आहे. तोच जपून ठेवतो बरे-वाईट अनुभव आणि आठवण करून देत राहतो पुढच्या पावसाळ्यांमध्ये. त्या प्रश्नाचे उत्तर आज इतक्या वर्षांनी मला उलगडल्याचे समाधान अनुभवत असतानाच आत्ताच्या जगाने साद घातली. मोबाईलवर कोणीतरी फॉरवरर्डेड मेसेज पाठवून पिंग केले नि माझी साधना भंग पावली.
पाऊस आता पुरता थांबला होता आणि सगळेच खूप शांत झाले होते. अगदी माझे विचारही. पुस्तक उचलून मी माझे हरवलेले पान शोधू लागले...