पृथ्वीवर स्वर्ग शोधताना
पृथ्वीवर स्वर्ग शोधताना
सकाळी सकाळी सहा वाजता उठून स्वयंपाक घराची खिडकी उघडली तर खिडकीतून भोपळ्याचा आणि दोडक्याचा वेल माझ्याकडे अतिशय प्रसन्नतेने बघत होते. हिरवीगार रसरशीत पाने आणि बरेच फुटलेले नाजूक फांद्या यामुळे मांडव बहरुन आला होता.
कोरोनाचा काळ सुरू झाला ,घरात बसून वेळ जात नव्हता, तसा मनात विचार आला , अंगणात रिकाम्या जागेत काही तरी भाजी लावावी. मग काय, आमच्या अहोंनी हुकमाची अमंलबजावणी केली. बायकोचे ऐकणार नाही असा एक ही नवरा या भूतलावर नाही असो, थोडी मक्सरी.जी, सरकार म्हणत, इकडून तिकडून मेढ्या गोळा करून ,मांडवाची तयारी केली. स्वयंपाकच्या खिडकी लगतच भोपळा, दोडका,कारले आणि पडवळ यांच्या बियाची अाळी घातली मांडवावर उभ्या आडव्या कामट्या लावून मांडव मजबूत केला. हळूहळू वेली मांडवभर पसरल्या, बघता बघता महिना दोन महिन्यांतच मांडवावर हिरवागार गालिचा अंथरल्यासारखा दिसू लागला. स्वतःच्या दारातील भाजी तोडून ती बनवायची यात मजा काही औरच असते. सगळ्या वेलीची कोल्हापूरी मिसळ तयार झाली. आणि मांडव हिरव्या, पिवळ्या, पांढ-या रंगानी रंगून गेला. वाऱ्याच्या झुळकेवर डोलू लागली. त्यांचा सुंदर आणि रेखीव रंग ,गंध मनाला भुरळ घालतो.
सकाळच्या वेळी या मनाला भुरळ घालणारे वातावरण सुख आणि समाधान देऊन जाते. काम करण्यासाठी उत्साह आणि आनंद होतो.आळस कुठल्याकुठे पळून जातो. सूर्याचे आगमन होते, पिवळ्या, लालसर रंगाची उधळण करीत वरवर येत असतो, वाऱ्याची मंद झुळूक, विविध रंगीत पक्षांचा किलबिलाट या सुंदर वातावरणात मी रमून जाते. खिडकीत पक्षांसाठी मूठभर तांदूळ टाकते.हळूहळू एक एक पक्षी चोचीने दाणे टिपत माझ्या कडे बघून भुर्रकन उडून जातात. परत येतात,येणे-जाणे सुरुच असते.मांडवावरील पिवळ्या, पांढ-या फुलातील रसाचा स्वाद घेण्यासाठी विविध रंगीत फुलपाखरे भिरभिरत थैमान घालताना डोळ्याच पारणे फिटते.
मी गॅस वर चहाचे आधण ठेवता ठेवता, या माझ्या अबोल मित्र मैत्रिणीशी हितगुज करत असते. सकाळी रेडिओ एफ.एम.वर सुमधुर भक्तीगीते सुरू असतात.मन आनंदाने भरून जाते.एवढ्यात भोपळा आणि दोडका यांचा गोड वाद सुरू झाला, भोपळा कारल्याला कडू चवीचा आहेस आणि उगाच इकडून तिकडून मिरवत असते, सगळं तोंड कडू होते, कारले माझ्या कडे दीनवाणे पणे बघते, "बघ ना !मला कसे सारखे नावे ठेवत आहे."अशा फिर्यादी माझ्या कडे घेऊन येत असतात.भोपळा आपला रुबाब नेहमी सर्वांनवर दाखवत असतो.प्रत्येकाने त्याच्या मर्जीने वागावे असे त्याला वाटते. सकाळी या लटक्या तक्रारी आणि रुसवा ,फुगवा समजूतदारपणा ऐकण्यात कसा वेळ जातो हे कळत नाही. मी चहा पिताना दोडका मला म्हणतो, "ए, तू चहा जास्त पिऊ नको, तुला त्रास होतो आहे ना?" माझ्या काळजी आणि प्रेमा पोटी म्हणाला. दोडका म्हणतो,
"मी थंड आणि शांत आहे. माझा उपयोग तुला जास्त होतो ना?" कारले लगेच मध्येच त्याला गप्प बसवत ,"शहाणा आहेस, मी जरी कडू चवीचा असले तरी मी बहुगुणी आहे.चवीपेक्षा गुण महत्त्वाचे.पडवळ तर काय नुसताच लांब लचक वाढते अजगरासारखे."पडवळ असू दे, म्हणून ठेंगा दाखवते. "भोपळा आडवा तिडवा कसाही सुटतो." भोपळ्याचा स्वाभिमान दुखावला गेला. फणकऱ्याने मला म्हणतो ,"तू रोज एक ग्लास भोपळ्याचे ज्यूस घेत जा आणि तुझ्या नवऱ्याला मुलांना पण दे."मी हो अशी मान डोलावली."तुला काहीच होणार नाही. निरोगी आणि सुदृढ परिवार होईल."मी स्मित हास्य करीत ऐकत ऐकत मी काम करीत होते.एवढ्यात पडवळ पुढे येऊन म्हणाले, "ए ,तू खरं खरं सांग, तुला जास्त कोण आवडते?"माझी पंचायत झाली.मला काय बोलवे सुचेना. आदल्या दिवशीच पडवळ तोडून आणले होते तेच चिरत होते. मी शांत आहे बघून एकच गोंधळ उडाला. "तुला कोण आवडते ते सांग?"नुसता कल्ला केला. मी सर्वांचे स्वागत करत म्हणाले, "मला तुम्ही सर्वचजण खूप खूप आवडता.कारण तुमच्या मुळेच माझा परिवार निरोगी आणि सुदृढ आहे.मी तुम्हाला वेगवेगळ्या पध्दतीने बनविते त्यामुळे मुलेही आवडीने जेवतात.तुमचे आकार ,रंग, गंध वेगवेगळे असले तरी तुमच्या मध्ये पौष्टिकता आहे.जी आम्हांला उपयोगी आहे." कारले मस्करी करत मला म्हणते कसे, "तू मुलांचे लाड खूप करतेस जास्त करून त्या अथर्व चे तो तुझं ऐकत पण नाही, अपूर्व बिचारा जे असेल ते खातो समजूतदारपणा आहे त्याच्या जवळ. दोडका म्हणतो," स्वत: च्या आवडी बाजूला ठेवतेस."तसं काहीच नाही, मला सगळेच आवडतात,गोड आणि सुंदर मुल आहेत माझी. सगळ्याच वेलीनी होकार दिला आणि वाऱ्यावर मनसोक्तपणे डुलायला लागलेल्या.
हाड ,ह्रदय, हिमोग्लोबिन, स्मरणशक्ती, पीत्त, उष्णता यावर तुम्ही गुणकारी आहात.म्हणूनच तुमची निवड केली.माझ्या अहोंना ही तुम्ही आवडता. कारल्याची भाजी जरी कडवट असली तरी उपयुक्त आहे. कारण सत्य हे नेहमी कडूच असते.औषधही कडवटच असते म्हणूनच ती रोग बरा करतात.हा संवाद पक्षीपण येताजाता ऐकत मध्येच काहीतरी डिवचून वाकुल्या दाखवत निघून जात.हे सगळे हितगुज गप्पा करत करत कुकर झाला, कणीक तिबूंन पोळी झाली, पडवळाची भाजी ,कोशिंबीर झाली, आमटीला वरणा(पावटा)होता.फोडणी करताच घमघमाट सुटला.हॉलच्या उत्तरे कडेला वरणा लावला आहे.इतक्या वेळ आमचे बोलणे निमुटपणे ऐकत होता. थोडा हिरमुसला होऊन मोठ्यानं मला ऐकू येईल अशा पद्धतीने पण जरा लाडीकपणे म्हणाला," मला या सर्वांपासून एकट्याला बाजूला ठेवले आहे.रोज सकाळी सकाळी तू त्यांच्याशी बोलतेस मी तुझी वाट पाहत इथे एकटाच.गट्टी फू.जा मी नाही बोलणार."मी दादापुता करीत वरण्याला समजावले.
मी दारात तुळस, जास्वंद, गुलाब, चाफा, लिली ,अनंत,अळू, आंबा, लिंबू इत्यादी झाडे लावली आहेत. यांच्याशी बोलताना त्यांच्या पानावरून, फुलावरुन हात फिरवताना मनात विचार येतो , किती निरागस आणि निष्पाप असतात, ही झाडवेली . मी पणा नाही, समाजकारण राजकारण नाही, गरीबीची लाज नाही, श्रीमंतीचा माज नाही.माणसासारखे हेवेदावे नाहीत कोर्टकचेरी नाही किती छान आहे त्यांचे जीवन फक्त तक्रार न करता देत राहणे.माणसाच्या तालावर नाचतात.तो जसे ठेवले तसेच राहतात.नेहमी हसतमुख आणि आनंद देत टवटवीत असतात.हेच गुण माणसाजवळ असते तर......... सर्वांना समान न्याय समान वागणूक.खरोखरच निसर्ग सर्वात मोठा किमयागार आहे.या निसर्गाच्या सान्निध्यात राहून थोडेसे गुण माणसाजवळ असते,तर पृथ्वी वर स्वर्ग झाला असता.निसर्गही आपला समतोल राखून ठेवतो. निसर्ग नियमांचे उल्लंघन करत नाही.
