प्रेम पत्र
प्रेम पत्र


अनिता ,
तू म्हणशील हा वेडा आहे की काय? याला पत्र लिहायचे कोणी शिकवले नसेल किंवा माझ्यावर चांगले संस्कार करायला घरचे विसरले की काय अशी कल्पनाही तुझ्या मनात आली असेल.
खरं तर पात्राच्या सुरूवतीला प्रिय लिहिण्याची आपली संस्कृती आहे. पण मी सरळ अनिता अशी सुरुवात केली.
पण खरं सांगायच तर तुला प्रिय म्हणू की नको हा एक यक्ष प्रश्नच होता, कारण ह्रुदयात प्रेम असले तरी तुला प्रिय म्हणण्याचा आधिकार मला आता राहिला नाही.
तू म्हणशील हे सगळे सांगायला पत्र लिहायची काय गरज आहे सरळ फोन केला असता, आणि आता पत्र लिहायची पध्द्दत तरी कुठे राहीली आहे? जग वाऱ्याच्या वेगाने धावते आहे आणि हा वेड्या सारखा पत्र लिहीत बसला आहे.
पण खरं सांगू मनात आलेल्या सगळया कल्पना माणसाला प्रत्यक्ष बोलता येत नाहीत. त्या कागदावरच छान दिसतात.
खरं तर तुला कधीच पत्र लिहिणार नव्हतो पण काल तू पुन्हा भेटलीस अन घड्याळाचे काटे उलटे फिरू लागले. आठवला तो नऊ वर्षापूर्वीचा काळ. तू म्हणशील वेडा आहेस का? नऊ वर्षापूर्वी मी तुला ओळखत पण नव्हते. खरं आहे तुझ, नऊ वर्षापूर्वी तू मला ओळखत नव्हतीस पण मी तुला ओळखत होतो. एकतर्फी प्रेमात दोघांनी एकमेकांना ओळखणे आवश्यक नसते.
किती सुंदर दिसायचीस तेंव्हा तू अगदी स्वप्नातल्या परी सारखी. तुला एकदाच पाहिलं होत पण नंतर तू रोज स्वप्नात येऊ लागली होतीस. प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा स्वप्नात तुला भेटायला फार मजा यायची. जीन्स टॉप वर किती सुंदर दिसायचीस तू. तुझ्या सोबत बागेत फिरताना किती भारावून जायचो मी. तू लट्केच लाजायचीस, माझ्या मिठितून सुटण्याचा प्रयत्न करायचीस. आठवते का काही? नाही आठवत ना?जास्त विचार करत बसू नकोस, हे सगळे माझ्या स्वप्नात घडत होत.
तू मला आवडली होतीस म्हणून तुला लग्नाची मागणी घातली होती. पण माझा विचित्र चेहरा आणि फटकळ स्वभाव तुला आवडला नसावा. तू मला नाही म्हणालीस. माझ एकतर्फी प्रेम अंकुरित होण्या आधीच कोलमडलं. नंतरच्या किती रात्री मला वेड लाऊन जायच्या. तू एक ना एक दिवस नक्की हो म्हणशील या खुळ्या कल्पनेत. कासव चालीने दिवस गेले आणि तुझ लग्नही झाले. वेळ निघून गेली आणि त्या जुन्या आठवणी ह्रुदयाच्या कप्प्यात बंद झाल्या.
काल तू पुन्हा भेटलीस आणि सगळया आठवणी जाग्या झाल्या. वाटलं ह्रुदयात साचलेले सारे गढूळ ओकून टाकावे तुझ्या समोर पण तुझ्या गळ्यातल्या मंगळसूत्राने अडवले, मनात आलेले राहून गेले. तुझ्या वरचा माझा आधिकार केव्हाच संपलाय हे लक्षात आले आणि नाही बोललो तुझ्याशी.
पण ह्रुदयात साचलेले विचार आतल्या आत दंगा करू लागले म्हणुन हे पत्र लिहायला घेतले आहे वेळ मिळाला तर नक्की वाच.
जाता जाता तुझ्या सुखी संसाराला आणि भावी आयुष्याला उदंड अशा शुभेच्छा. तू नेहमी सुखात रहावं तुझ्या चेहऱ्यावर नेहमी हासू दिसावे ही सदिच्छा.
तू माझी नसली तरी फक्त तुझाच
आनंद