कादंबरी आणि मी
कादंबरी आणि मी


"मे आय कम इन सर?" वाचनालयात प्रवेश करत मी समोर खुर्चीवर बसलेल्या एका (सद्)गृहस्थाला विचारल
"हो ये."
पेपर मधून डोकं वर काढत ते उदगारले.
"नाव काय तुझं? "
"बाबा! " मी नम्र स्वरात म्हटल
"काय हवय तुला?"
नाकाला लावलेला चश्मा सरकवत त्यांनी विचारले
"कादंबरी" मी म्हटलं
"अरे मुर्खा, इथे कादंबऱ्याच मिळतात. कळल का? पण तुला नेमकी कुठली देऊ?"
त्यांनी मला खडसावले तसा मी वितळलो आता कोणती कादंबरी मागावी हे ठरवलं नव्हतं थोडसं नमुनच मी म्हटलं
"देशपांड्याची दया उल्का"
तसा त्यांनी पारा चढवला
"अरे गधड्या उल्का देशपांड्याची नाही. ती वि. स. खांडेकरांची आहे. बस या खुर्चीवर बस. तू करतोस काय?" हातातला पेपर खाली ठेवत त्यांनी विचारल. .
"कविता" खुर्चीवर बसत मी ज़रा खालच्या आवाजात म्हटलं.
"आता ही कविता कोण?"
अहो कविता म्हणजे… म्हणजे मी कविता लिहितो."
"बरं शिकलायस किती?"
आपल्या टकलीवरून हात फिरवत त्यांनी विचारलं
"मी, बी. एस. सी. करतोय." रुमालानं घाम पुसत मी सांगितलं
"इंग्लीशला कोण आहे रे तुला?"
"प्रा. गायकवाड " मी उत्साही स्वरात म्हटलं
"काय रे तुमचा हा गायकवाड गुराकडे वगेरे असतो काय?"
"काय?" मी दबक्या अवाजाच राग व्यक्त केला.
"अरे मग तू येवढा घोड्यासारखा वाढलास, अन तुला साधं ए बी सी डी येत नाही. बी कुठं, एस कुठं, सी कुठं? म्हणे मी बी एस सी करतोय."
"अहो, म्हणजे मी बी. एस. सी. शिकतोय"
"अच्छा म्हणजे तुला मी बी ए सी पावडर तयार करतो. अस म्हणायचय का? मग सरळ-सरळ बी ए सी म्हण ना! बरं राहतोस कुठं?"
"चोंभा निमगावला, मळ्यात - बाभळीच्या झाडा लागत माझं घर आहे. उजव्या बाजूला एलेक्ट्रिक पोल अन डाव्या अंगावर संकरीत बाभळीचा मळा आमच्या त्या भागाला काटवन म्हणतात.
"अरे बास बास, तू तर सारं रामायण महाभारत मांडायला लागलास, बरं तुझं शिक्षण किती झालय?"
आता मात्र मला रागच आला वाटलं समोरची खुर्ची उचलून याचं टक्कल फोडून काढावं; पण गरज मला होती. मी सांगितलेलं माझं शिक्षण त्या नर्मदेच्या गुळगुळीत गोट्याला कळतच नव्हतं पण मला कादंबरी हवी होती. मी म्हटलं,
"मी विज्ञानच्या दुसऱ्या वर्षाला शिकतो"
"अरे ssss रे ss रे sss रे . काय घोड्या सारखा वाढलास अन गढ़वा सारखे बोलतोस . "
"पण झालं काय ?"
"अरे दूसरीत शिकायला तू काही कुकुलं बाळ नाहीस. म्हणे विज्ञानच्या दुसऱ्या वर्षात शिकतो, झाला असेल आठ दहा वेळेस नापास."
खदा-खदा हसत त्यांनी एक भलं मोठं रजिस्टर काढलं. अगदी त्यांच्या सारखच, पाने पलटत त्यांनी विचारले,
"तुला मराठी वाचता येते का?"
मला खूपच राग आला होता पण चेहऱ्यावर व्यक्त न करता मी म्हटलं
"हो येतं."
"बरं, तुला कादंबरी वाचावी असं का वाटतं?"
"कादंबरी वाचून खऱ्या जीवनाचा अर्थ कळतो."
"खरच तु एकदम बुद्धु आहेस. अगदी लेखका सारखा, अरे पुस्तकं वाचून जर खऱ्या जिवनाचा अर्थ कळला असता तर प्रसिध्द्द नाटककार अप्पासाहेब बेलवलकरांचा "नट सम्राट " झाला नसता."
पुस्तकाविषयी येवढी घृणा असलेल्या टकल्याला वाचनालयाचा प्रमुख कोणी केला हेच मला क्षणभर कळलच नाही .
"बरं इथं सही कर"
रजिस्टर माझ्या कडे देत ते म्हणाले. मी करुन रजिस्टर सरकवत म्हटलं
"लवकर दया मला उशीर होतोय"
"अरे! तू तर चक्क इंग्रजीत सही केलीस, ही घे पु.ल. देशपांड्याची 'असा मी असा मी ' आणि तिथं नोंद कर."
मी कशीबशी नोंद करून एकदाचा मोकळा झालो. त्या टकलूच्या नादात मला घरी जायला भरपूर उशीर झाला होता. वडील रागवतील म्हणून मी सायकलचा दुसरा गीअर टाकला, तशी माझी सह्याद्री कळ्या डांबरीवर उड्या मारू लागली. सूर्याने कधीच दरी जवळ केली होती. तो पौर्णिमेचा दिवस होता. पण घरी गेल्यावर माझी अमावस्याच होणार होती. डोक्यातले विचार, सायकलचा वेग अन उगवत्या रात्रीचा अंधार तिन्हीचा जणू मिलाफा झाला होता. चंद्रांने डोकं वर उचललं तसं सह्याद्रीनं नगर- बीड सोडून शिराळ पकडला. दगड धोंड्याच्या त्या रस्त्याने चालताना तिनं आणखीच उड्या मारायला सुरुवात केली. मला तर शिवाजी महराजांच्या घोड्यावर बसल्या सारखेच वाटू लागले, अन पुढच्याच क्षणाला तिनं एक उंच उडी मरून रात्रीच्या कुशीत झोपलेल्य कुत्र्याला चेंगरले तसं ते कुत्र क्वाइ क्वाइ करत फेगडत पळालं. तशी सह्याद्री आणखीनच घाबरली. अन एका उडित रोडची खदानी जवळ केली. माझा एक पाय वर अन दुसरा सह्याद्रीखाली गुंतला. तिचं मागचे चाक आणखी फिरतच होतं.
कसा बसा मी रात्रीच्या आठला सह्याद्रीसह मजबूत घरी परतलो.
"कुठं गेला हुतास इतका यळ? काल्याज तर चारलाच सुटलं आसल ना?"
आई ने सरपनाची काडी चुलीत सरकवत विचारल
"मी कादंबरी _____"
"आरं माझ्या कर्मा." आईने पिठाचा हात कपाळावर मारत म्हटलं, "ओ sss ऐकलत का? तरी म्या सांगत व्हते माटरीक पातूर शिक्षाण बास म्हुन .पर ऐकतय कोण म्हावं . आता बसा तुमी रूमन्यावर हात ठिवुन अन हेव फिरल तिकडं कोणाच्या कादंबरी संग sss. "
"आरं पर म्या म्हंतु काय झालं?"
"काय झालं, सांगत नव्हते? म्हनं प्वॉर माटरीक झालं आता त्याला कलेजाला पाठवायचा. चांगल म्हणत व्हते , म्हया भावाची पोर उजवायला आली करू दोनाच चार तर म्हनं पोरगं हाय यवड्या लवकर कशाला? आता उद्या ह्याने कादंबरी घरात घातली म्हंजी काय करायच?"
आईने करपलेली भाकर टोपल्यात टाकत आवाज चढ़वला .
"काय रं ही कादंबरीची काय भानगड हाय?" अंगातला शर्ट खुटिला अडकवत वडीलांनी विचारलं
"अहो कादंबरी म्हण्जे ती देशपाड्याची -----"
"आरं काय देशपाड्याची म्हुन सांगतो. तुला कलेजात अभ्यासाला पाठीवला की पोरी पहायला अन तेबी बामनाच्या."
"अहो ब्राम्हण नाही, लेखक आहेत ते."
"लेखक असाल म्हुन काय त्याच्या पोरी बरं फिरायचे?"
"मग काय त्याची बायको हे?" वडीलांनी एक पिचकारी मारत म्हटलं.
"या बया म्हंजी आता हेव तरण्या ताठ्या पोरी सोडून लोकांच्या बायका पहात फिरतो व्हय?"आईने पिठाचा डबा झाकत म्हटलं .
"काय लावलय मुलगी, बायको मला सरांनी संगीतलं होतं पु.ल. देशपांड्याची कादंबरी ______"
"कादंबरी sss कादंबरीsss कादंबरी आरं पार यडं केलं ना तिनं तुला." वडिलांनी एक फोक जवळ घेतला
"म्हंजी आता तुव्हं मास्तर तुला हे धंदे शिकिवतं व्हय कलेजात, लॉकाच्या बायका पहायला, ते काय नाय उद्या पासनं तुव्ह काल्याज बंद, त्यो चाबूक घीउनशनी आवतावर व्हयचं."
पिठाचा हात धूत आई म्हणाली. "अन तुमाला सांगते घाबडं लईच आतराब व्हयला लागलय तवा म्या म्हायेरी जाते अन मह्या भावाला ईचरती."
आता खरोखरच माझं डोकं तापलं, वाटलं या साऱ्यांना त्या वाचनालयात नेऊन त्या टाकल्या जवळ उभं करावं मग बोला म्हणावं हवं ते, खरच किती अडाणी आहेत ही. साधी कादंबरी कळत नाही .
"अन ह्याबाक तुह्या त्या कादंबरीला इसर आता. तुव्हं लगीन करतो आम्ही." आईने चांगलाच दम भरला.
"आई अरे कादंबरी म्हण्जे मुलगी नाही, एखाद्या लेखकाने लिहिलेल्या कथात्मक पुस्तकाला कादंबरी म्हणतात. कळल का?"
तेंव्हा मात्र दोघांचीही हसून-हसूनपार बोबडी वळाली. मग आई जवळ आली आणि माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली .
"माव्हा गुणाचा रे राजा .........."