फादर्स डे
फादर्स डे
मी गाडीतून जात होते, सिग्नलजवळ गाडी थांबली, मी सहज गर्दीकडे पाहिले. गर्दीतून एक माणूस, ठिगळ लावलेले कपडे घातलेला... पाठीवर एक पोतं घेऊन रोड क्रॉस करत होता. तो अचानक थांबला अणि मागे वळून बघू लागला. मला वाटलं, अरे बापरे एक्सिडेंट झाला वाटतं. मीही त्या दिशेन बघू लागले आणि अचानक त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
समोरचा सिग्नल सुटला अणि गाड्या भरधाव धावू लागल्या. तो एकटा तिथे पुतळ्यासारखा उभा होता. त्याच्या डोळ्याची पापणीही हलत नव्हती. फक्त वाहत होते ते डोळ्यातले पाणी. जसे आपण शोचे पुतळे ठेवतो ना घरात, फक्त घागरीतून पाणी वाहत असतं आणि पूर्ण पुतळा निर्जीव असतो, त्याप्रमाणे...
हॉर्नचे कर्णकर्कश आवाज गुंजू लागले, गाड्या त्याच्या भोवतालून जाऊ लागल्या, लोक शिव्या देऊ लागले, तो रोडच्या बाजूला झाला आणि वर लागलेल्या पोस्टरकडे पाहू लागला. पाऊस सुरु झाला आणि त्याचे अश्रू दिसेनसे झाले. माझा सिग्नल सुरु झाला आणि मी निघतानिघता त्या पोस्टरकडे बघितलं.
एका १२-१३ वर्षांच्या मुलीचा, मुख्यमंत्री गळ्यात मेडल घालतानाचा फोटो होता आणि कुस्तीत राज्यात पहिली आल्याबद्दल अभिनंदन हे शब्द होते.
त्या माणसाच्या हातातला आणि फोटोमधल्या मुलीच्या हातातला धागा आणि त्यांचा चेहरा मिळताजुळता होता.
मी मनातच बोलले, "हॅप्पी फादर्स डे," कारण तो माझ्यासाठी मी अनुभवलेला खराखुरा फादर्स डे होता.