निर्णय
निर्णय
वायफाय बंद करण्याआधी एकदा मेसेज चेक करावे म्हणून सिद्धांतने व्हॅटस अँप चालू केलं. त्याने सकाळी केलेल्या मेसेजला स्वराने पाच मिनिटांपूर्वीच रिप्लाय दिला होता. सिद्धांत झोपणारच होता पण स्वराचा रिप्लाय आलेला पाहून आपोआप त्याच्या हाताची बोटे चालू लागली आणि बोलता बोलता रात्रीचे दोन कधी वाजले त्याला कळलंच नाही. तसा तो रोज लवकरच झोपायचा. दहा साडेदहालाच..रात्रभर चॅट करायची त्याला फार सवय नव्हती. पण स्वरा रात्रीच ऑनलाईन यायची आणि तिच्याशी बोलायचं म्हणून काही तासांच्या झोपेची कुर्बानी देऊन तो तिच्याशी चॅट करायचा. त्याला जणू तिची सवयच झाली होती. तिला मेसेज केल्यावर तिचा रिप्लाय आला की नाही हे तो दर पाच दहा मिनिटांनी चेक करायचा.
तशी त्यांची ओळख काही नवीन नव्हती. सोशल मीडियाच्या नियमानुसार बरेच महिने बोलल्यावर ते एक दोनदा ठरवून भेटले होते. त्याला ती आवडायची पण तिच्या बाजूचं उत्तर त्याला नक्की माहीत नव्हतं. बरेच महिने झाले तरी तिला याबद्दल विचारायची त्याची काही हिम्मत झाली नाही. आणि अशा विषयावर मेसेजवर बोलावं असं त्याला अजिबात वाटत नव्हतं. म्हणूनच त्याने तिला परत एकदा भेटूया का म्हणून विचारलं. तीनेसुद्धा फार आढेवेढे घेतले नाही पण त्यांचा भेटायचा मुहूर्त बराचसा लांबला. दोन वेळा तिला शक्य झालं नाही आणि एकदा त्याला जमलं नाही.
ठरवल्यापासून साधारणतः पाच महिन्यांनी आज त्यांची भेट होणार होती. तशी भेटीची उत्सुकता सिद्धांतलाच जास्त होती. स्वरा आज काय होणार आहे याबाबत अगदीच अनभिज्ञ होती.सिद्धांत वेळेच्या आधीच तिथे पोहोचला. प्रयाग कॅफेमध्ये त्या दिवशी गर्दी जरा कमीच होती. पाऊस असल्यामुळे असेल कदाचित.. नाही तर इतर वेळी तिकडे कपल्सची गर्दीच जास्त असायची..कधी कधी तर टेबलसुद्धा मिळायचं नाही. पण आज कदाचित आपल्या मनासारखं होणार याची खात्री नियतीला त्याला द्यायची असावी.
सिद्धांत थोडा स्थिरावला असेल तेवढ्यात त्याला स्वरा आतमध्ये येताना दिसली. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि क्षणभर तो तिच्याकडे पाहतच राहिला. बाहेर पाऊस असल्याने ओले झालेले तिचे केस तीने एका बाजूला मोकळे सोडले होते. कानात कुर्त्याला मॅचिंग असलेले झुमके तिचं सौंदर्य आणखीनच खुलवत होते. ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टिक आणि काजळ लावलेले तिचे टपोरे डोळे… ती समोर येऊन उभी राहिली तेव्हा तो भानावर आला.
“एवढं काय बघतोय….”
”समोर उभी असलेली रतीची मूर्ती…” सिद्धांत नकळत म्हणाला.
”काय.????”
”अं… नाही काही नाही…बस ना….तू…”
”ह्या पावसाला सुद्धा आताच यायचं होतं….” उगाच कशावरून तरी बोलणं सुरू व्हावं म्हणून सिद्धांतने पावसाची मदत घेतली. कारण बऱ्याचदा असंच होतं ना…आपण चॅट वर खूप बोलतो पण तीच व्यक्ती समोर आली की आपल्या तोंडून एक अक्षर बाहेर पडत नाही.
”काय ऑर्डर करायचंय…”
”कर तुला काय करायचंय ते..मला चालेल…”
सिद्धांतला तिच्या आवडी माहीत असल्याने त्याने पटापट ऑर्डर देऊन टाकली आणि ऑर्डर येई पर्यंत अशाच हवापाण्याच्या गप्पा मारत बसले.
”स्वरा…”
”हा बोल ना…”
” तुला काही तरी सांगायचंय…बरेच दिवसांपासून माझ्या मनात आहे पण म्हटलं की आता तुला सांगायलाच
हवं..”
” बोल ना…माझ्या सोबत बोलताना एवढा विचार कधी पासून करायला लागलास तू???”
” आज जे बोलायचंय ते तुझ्या किंवा माझ्या बद्दल नाही तर आपल्याबद्दल आहे..”
” म्हणजे…”
” स्वरा..मला आवडतेस तू…”
” हे तू मला आधी सुद्धा सांगितलं आहे सिद्धांत….आणि तुला याचं उत्तर सुद्धा माहीत आहे..”
” हो मला माहितीये की यावर आपण आधी सुद्धा बोललोय पण यावर आता जरा गांभीर्याने विचार करणं जास्त महत्वाचं आहे…”
” का..??? काय झालं असं…”
” हे बघ स्वरा..हे असं किती दिवस आपण निनावी नातं ठेवणार आहोत..ते नात्याला काही नाव नसावे वगैरे सगळं सिनेमात बघायला, ऐकायला छान वाटतं पण ते प्रत्यक्षात मात्र आणता येत नाही…मला असं अजिबात म्हणायचं नाहिये की माझा तुझ्यावर विश्वास नाही किंवा आपण आताच रिलेशनमध्ये यावं..पण काही तरी पक्कं ठरवायलाच हवं ना..”
” सिद्धांत..मी तुला सांगितलं होतं ना की मला रिलेशनमध्ये अजिबात यायचं नाहीये..जसं चाललंय तसं चालू दे म्हणून आणि तेव्हा तू ही म्हणाला होतास की ठीक आहे.”
” हो..म्हणालो होतो मी पण आता सध्या माझ्या कडून नाही सांभाळलं जात आहे हे..सवय होतेय मला तुझी..आणि ती अजून व्हायच्या आधीच मला स्वतःला क्लिअर करायचंय…”
” हे बघ..प्रेमपेक्षा फ्रेंडशीपला जास्त महत्व आहे माझ्यालेखी…आणि मला या सगळ्यामध्ये पडून आपली फ्रेंडशिप नाही तोडायची आहे. मला तू एक चांगला मित्र म्हणून आयुष्यभर हवा आहेस…”
” तो मी असणारच आहे ना..असं थोडीच आहे की रिलेशनमध्ये आल्यावर नवं नातं निर्माण झाल्यामुळे आपल्यातली मैत्री तुटेल…”
” हो..पण कदाचित नातं बदलल्यावर मी आता तुझ्याशी जसं सगळं शेअर करते कदाचित सगळं नाही करु शकणार…त्या नात्याचं ओझं होऊ शकतं माझ्यावर…”
” अच्छा…”
” आपण मित्रच राहूया ना…”
” सॉरी स्वरा..पण आपण मित्र म्हणून तरी नाही राहू शकत पुढे..कारण कसं आहे मला आधीच तुझी सवय झालीये, आणि ती अजून व्हायच्या आधी मी यातून बाहेर पडलेलं बरं..मी उगाच काहीतरी अपेक्षा करत राहीन आणि मग न जाणो नकळत मी स्वतःच दुखावला जाईन. तसं मी तुला म्हणू शकलो असतो की आपण मित्र राहू…मी परत हा विषय कधी काढणार नाही…जसं चाललंय तसं चालू दे पुढे….पण मी स्वतःशी खोटं नाही बोलू शकत..आज जे बोलणं झालंय आपलं त्या नंतर आपलं आता असलेलं नातंही पुढे तसंच राहील असं नाही वाटत मला. अपंग झालेल्या नात्याला मैत्रीच्या कितीही कुबड्या लावल्या तरी ते कमकुवतच असतं.. त्यामुळे वेळीच थांबलेलं बरं..न जाणो आता मी स्वतःला सावरु शकेन..पुढे तेही कठीण होऊन बसेल. पाणी डोक्यावरून जायच्या आधीच वर आलेलं बरं…”
सिद्धांताच्या बोलण्यावर स्वरा काहीच म्हणाली नाही. कुठे तरी तिला सुद्धा त्याचं म्हणणं पटत होतं.त्याने घेतलेल्या निर्णयाला तिची मूक संमती होती. त्या नंतर त्याच्यात जास्त बोलणं झालंच नाही. निघताना एकदा तिने त्याला घट्ट मिठी मारली…कदाचित शेवटची..
घरी पोचल्यावर तिने सिद्धांतला तो पोहोचला की नाही हे विचारण्यासाठी व्हॅटस अँप उघडलं..सिद्धांतचा डीपी, लास्ट सीन काहीच दिसत नव्हतं..तिने तरीसुद्धा मेसेज केला. पण तो डिलिव्हर झालाच नाही..अगदी शेवटपर्यंत…