Trupti Bhosale

Others

3  

Trupti Bhosale

Others

नैराश्य : शारीरिक आजार

नैराश्य : शारीरिक आजार

3 mins
274


     नैराश्य हा एवढे दिवस मानसिक समजला जाणारा आजार प्रत्यक्षात शारीरिक आहे. नैराश्य हा खरं तर शारीरिक आजार आहे. तो मनाचा म्हणून आपण त्याला मानसिक आजार म्हणतो. पण मनसुद्धा शरीरातच आहे त्यामुळे तोदेखील शरीराचाच आजार आहे. फरक इतकाच की तो सिटी स्कॅन, एमआरआयमध्ये दिसत नाही.

         आजचं राहणीमान, बदलती सामाजिक परिस्थिती, वाढती स्पर्धा, नातेसंबंध या सगळ्यामुळे लोकांचं जगणंच बदललं आहे. या स्पर्धेत टिकून राहताना बऱ्याचश्या गोष्टींचा परिणाम आपल्या जगण्यावर होतोय याची आपल्याला कल्पनाच नसते आणि ती असली तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हळूहळू याचं प्रमाण वाढून मग व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागतो.

        हल्ली फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट यासारख्या सोशल मीडियाच्या वापरामुळे जग जवळ येतंय असं एकीकडे म्हणत असतानाच दुसरीकडे त्याच्या आधीन जाण्याचे प्रमाणही वाढले आहेत. या आधीनतेमुळे लोकांना विविध मानसिक-शारीरिक आजारांना सामोरं जावं लागत आहे.

         नैराश्याचं एकमेव शास्त्रीय कारण मेंदूतील रसायनांचा असमतोल हे आहे. ज्या वेळी एखाद्या व्यक्तीचा अपेक्षाभंग होतो किंवा विशिष्ट गोष्टीमुळे तिच्या मनात असंतोष, असमाधान निर्माण होतं त्या वेळी त्या व्यक्तीच्या मेंदूतील रसायनं (hormones) कमी होतात. असमाधान वाढलं की रसायनांना गळती येते आणि अशा वेळी कमी गळती लागलेल्या रसायनांची कसर भरून काढण्यासाठी मेंदू अधिकाधिक प्रयत्न करत असतो. पण माणसाच्या मनात छोट्या-छोट्या गोष्टींमधून असमाधान, असंतोषाची भावना निर्माण होऊ लागते तसतसं मेंदू गळती लागलेल्या रसायनांची पूरक यंत्रणा सुरू ठेवू शकत नाही. माणसाचा मेंदू या सगळ्यात झटत असतो. त्या वेळी त्या व्यक्तीला ताणतणाव आहे, असं म्हटलं जातं.

         अपेक्षाभंग, असमाधान अशा भावना निर्माण झालेल्या काही व्यक्ती या सगळ्यावर मातही करतात. वैधव्य असलेल्या स्त्रिया, कर्जबाजारी शेतकरी, नापास झालेले विद्यार्थी असे सगळेच आत्महत्या करत नाहीत किंवा या सगळ्यांनाच नैराश्य येतंच असं नाही. नैराश्य येण्यामागचं कारण आपल्याच दृष्टिकोनात आहे. आपल्या वेदांमध्ये मनाला रथारूढ व्यक्ती, सप्तेंद्रिय घोडे, सारथी बुद्धिमत्ता, आणि अक्कलेला बुद्धिमत्तेच्या हातचे लगाम असं म्हटलं आहे. अपेक्षाभंग, असमाधान या सगळ्याकडे सकारात्मकतेने पाहिलं तर नैराश्य होण्याची शक्यता कमी असते. नकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीला लगेच नैराश्य येतं म्हणूनचं सकारात्मक विचार करणं महत्त्वाचं आहे. सकारात्मकता म्हणजे अतिमहत्त्वाकांक्षी नाही; तर परिस्थितीकडे तर्कशुद्ध पद्धतीने बघणे. ही सकारात्मकता मुलांना लहानपणीच शिकवायला पाहिजे. कारण हीच मुलं मोठी झाल्यावर सगळ्याच परिस्थितींकडे तर्कशुद्ध पद्धतीने बघून सारासार विचार करू शकतील. यामुळे त्यांना नैराश्य येण्याची शक्यता कमी असेल म्हणूनच दृष्टिकोन खूप महत्त्वाचा असतो. मुलं इतरांकडे बघून स्वत:शी तुलना करतात; मला काहीच मिळत नाही किंवा त्याला मिळतं पण मला मिळत नाही, असा विचार त्यांच्या मनात येतो पण हे स्वीकारणं महत्त्वाचं आहे हे त्यांना शिकवलं पाहिजे.

        प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात. कोणाचंही आयुष्य १०० टक्के परिपूर्ण असूच शकत नाही. प्रत्येक माणूस दहा टक्के सुख असेल आणि ९० टक्के दु:ख असेल तरी तो आनंदात राहू शकतो. तसंच ज्याच्या आयुष्यात ९० टक्के सुख आहे असं आपल्याला वाटतं; तोसुद्धा निराशेत गुरफटल्यासारखा वाटतो. म्हणजेच कितीही कठीण परिस्थिती असली तरीही उत्तरं शोधली पाहिजेत.

        एखाद्या माणसाला कर्करोग झाला आणि त्यानंतर त्याला उदास वाटायला लागलं की माझ्यामागे माझ्या मुलांचं कसं होणार, माझं कसं होणार अशी काळजी त्याला असते. घटस्फोट झाला, वैधव्य आलं, नोकरी गेली, कुटुंबातील सदस्याचा मृत्यू , अचानक नोकरीत बदली झाली आणि दुसऱ्या शहरात जावं लागलं तर त्यांच्या मुलांमध्ये नव्या जागी जाण्याची आणि जुने मित्र तुटण्याची भीती निर्माण होऊन नैराश्य येतं. बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे ते वाढत चाललं आहे. ही बदलती परिस्थिती आपल्यापुढे आव्हानं आहे. मानसिक-शारीरिक काळजीसाठी आपल्याकडे आरोग्य विमा काढता येत नाही. काम केलं नाही तर पैसे मिळत नाहीत. मग भूक भागणार नाही. इथे हे गणित शारीरिक-आर्थिक परिस्थितीशी जुळलं जातं; गरिबी आणि नैराश्य.

        ज्या ज्या गोष्टींमधून अपेक्षाभंग होऊ शकतो त्यातून नैराश्य येतं त्यात नातेसंबंध, ऑफिस, मित्र, शाळा, समाज असं सगळं आहे. याची सुरुवात लहानपणापासून व्हायला हवी. मुलांना नकार पचवता आला पाहिजे. मेंदूचं स्वास्थ्य राखण्यासाठी त्यातल्या विविध रसायनांचा समतोल राहणं महत्त्वाचं असतं. एकुणच काय की, नैराश्याकडे केवळ मानसिक आजार म्हणून न बघता शारीरिक आजार म्हणूनही गांभीर्याने बघायला हवं. सर्वबाजूंनी याचा अभ्यास केला, परिपूर्ण माहिती मिळाली तरच आपण नैराश्याचा प्रतिकार करू शकतो.


Rate this content
Log in