Trupti Bhosale

Others

3  

Trupti Bhosale

Others

धावणारी मुंबई

धावणारी मुंबई

4 mins
195


     ' मुंबई ' तसं ह्या विषयावर नेहमीच लिहिलं जातं, विविधांगी आणि विविध पद्धतीने मुंबई बद्दलची माहिती रोजच कुठून येतच असते त्यात मी त्या विषयावर चार ओळी लिहिणं म्हणजे समुद्रात खडेमिठाचे तुकडे फेकून मीच तो खारट केला म्हणण्यासारखं आहे. 


     माझ्या मते, जगात अशी मोजकीच शहरे आहेत, ज्यांना वर्तमानकाळात जगण्याचे धाडस आहे. त्यापकी मुंबई हे एक आहे. मुंबई मायानगरी आहे. या स्वप्ननगरीत सारेच आपलं नशीब आजमावण्यासाठी आले. 


     लहानपणापासून मुंबई बद्दल खूप काही ऐकून होते, इथे मोठमोठ्या इमारती असतात. इथं पाय ठेवला की पहिलीच गोष्ट समोर दिसते ती म्हणजे माणसांची गर्दी. ही समोर दिसणारी जिकडे तिकडे पसरलेली गर्दी म्हणजे गोष्ट नकारात्मक आहे की सकारात्मक ते ठरवता येत नाही, कारण ते ठरवायला इथे ह्या गर्दीतल्या कुणालाही वेळ नाही. इतक्या मोठ्या गर्दीच्या लोंढ्याला अजिबात क्षणाचीही उसंत कोणाला नाही. सर्व जण धावताहेत फक्त, कसल्यातरी मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताहेत. मोठी शहरं, मोठी माणसं म्हणजे त्यांची स्वप्नं मोठी असणार अन ती पुरी करण्यास ह्या माणसांना धावतच रहावं लागणार, आमच्या सारखी संथगती डुलत डुलत निघाली तर काम कसं चालेल?


     इथले सगळे लोक अंतर मोजतात तेही लोकल रेल्वेच्या वेगाने. म्हणजे शहराच्या एक भागातून दुसऱ्या भागात जायला माणसाला तितकाच वेळ लागतो जितका त्या लोकल ला! ती लोकल मुंबईच्या रक्तात भिनली आहे, जणू काही त्या लोकल शिवाय ह्यांची वेळही पुढे सरकू नये. कोपऱ्या कोपऱ्याने गाडीवर मिळणारा वडापाव इथे कधी कुणाला उपाशी ठेवत नसावा, एक खाल्ला की रात्री घरी पोहचून जेवण करेपर्यंत ह्यांच्या पोटाची विश्रांती.

  

     या शहराचा भौगोलिक आकार वेगळा आहे, इथली माणसं वेगळी आहेत.. संस्कृती तर त्याहुनही वेगळी आहे. आपला देश जर विविधतेने नटलेला आपण म्हणतो तर मुंबईला त्या विविधतेचं केंद्रबिंदू म्हटलं तर काहीच हरकत नाही. म्हणजे बघा ना, पार्ल्याची संस्कृती वेगळी, दादर-गिरगावची वेगळी, घाटकोपर-विक्रोळीची वेगळी. केवळ रेल्वे लाईन बदलली तरी माणसांचे स्वभाव बदलेले या शहरात दिसून येतात. प्रत्येकामध्ये आपापल्या भागाबद्दल एक सार्थ अभिमान दिसून येतो. तरी सुद्धा हे शहर देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येकाला आपलसं करतं. स्वप्न पाहायला भाग पाडतं. आपोआपचं त्या नवख्या माणसाला देखील या शहराचा अभिमान, कौतुक आणि अप्रुप वाटू लागतं. घरची ओढ कितीही असली तरी आपणही या विविधतेचं केंद्रबिंदू असलेल्या शहराचा भाग आहोत असं वाटू लागतो. कधी आपण मुंबईकर होऊन जातो ते आपल्यालाही कळत नाही. विविधअंगी-विविधढंगी मुंबई या मायानगरीत गुंतून जातो आणि शोधत राहतो न उमगलेल्या प्रश्नांची उत्तर.. 


     तसं इथे तर सगळंच अजब आहे हो, म्हणजे रेल्वेचे एकामागून एक डबे असावेत तश्या खोल्यांनी बनलेल्या चाळी आणि त्याच प्रकारच्या निवासी इमारती. अगदी इवल्या इवल्या जागा, त्यात ही माणसं मोठ्ठाली स्वप्नं पाहत आरामात झोपतात, तेही अगदी सुखात. दादरच्या पुढे उड्डाणपुलावरून जाताना समोर दिसणाऱ्या उंच उंच भव्य इमारती पाहिल्या की खात्री पटते,मुंबई ने त्या छोट्या छोट्या खुराड्यांत राहून पाहिलेली, किंबहुना अनेकांनी पूर्ण केलेली हीच अशीच ती स्वप्नं आहेत बहुदा. जुनाट चाळीतल्या कोपऱ्यात झोपून अनेकांनी मोठी साम्राज्ये उभारली, ती ही मुंबईची ओळख.


     मुंबईबद्दल आणि तिथल्या माणसांबद्दल लिहिण्यासारखं खूप काही आहे. मुळात मुंबई आणि तिथली माणसं ह्या काही दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, तिथली न थकणारी न थांबणारी माणसं म्हणजे मुंबई, तीच तिथला जीव, भलेही गर्दीत जीव घुसमटल्या सारखा होत असेल, पण ही गर्दीच तर मुंबई आहे, घोळक्यात राहूनही आपली ओळख जपणं हेच तर इथलं जीवन. अख्ख्या देशभरातून आलेली विविध रंगरूपाची यंत्रासारखी माणसं, त्यांना इथली लोकल चाके देते, गती देते, धावायला शिकवते. माधव ज्युलियन यांनी सांगितलेली थांबला तो संपला वगैरे ओळ खरी कुणी केली तर मुंबईने. 


     इथं आयुष्य धकाधकीचे वगैरे असं का नाही, मुंबई मध्ये कधीही न राहिलेल्यांना ते तसं वाटतं पण मुंबईत राहिलेला माणूस कधीचं असं म्हणत नाही, तो वाट पाहतो फक्त लोकलची आणि गर्दीत ढकलून चढून निघून जातो, ह्याला मुंबईत धकाधकी म्हणत नाहीत.

     

     मुंबई जगायला शिकवते असं कुणी म्हणालं ते उगीच नाही, इथे गिचमीडित गल्ल्या, झोपड्या आहेत, पण थोडी मान उंच केली तर मोकळा अथांग समुद्रही आहे. दिवसभर धावपळ करून ही माणसं रात्री समुद्राच्या किनारी जाऊन बसतात, सगळ्या धावपळीच्या आयुष्याला, त्रासांना, गर्दीला एक क्षणात पाठ करून समुद्राकडे बघत आनंदानं आपली संध्याकाळ घालवतात, जणू काही ह्यांच्या पाठी असलेल्या धावपळी जगण्याचं ह्यांना काही देणंघेणंचं नाही. अथांग समुद्रासारखी स्वप्नं डोक्यात घालून ही माणसं परत जातात आणि पुन्हा सकाळी त्या स्वप्नांच्या मागे धावायला लागतात. 


     इथे सगळं खरंच अजब आहे, ह्याला अगदी थोडक्यात सांगणं शक्य नाही, मुंबई शब्दात सांगता येणं अवघड आहे, मुंबई कळायची म्हणजे इथं येऊन जगलं पाहिजे, दादरच्या पुलावर धावलं पाहिजे, लोकलच्या गर्दीत रेटून उभं राहिलं पाहिजे, वडापाव खाऊन दिवस ढकलायला पाहिजे, घामाच्या धारांत न्हाऊन निघालं पाहिजे.


     ह्या स्वप्नांच्या शहरात आता स्पर्धा वाढली असून परिस्थिती बदलत चालली आहे. त्यामुळे मुंबई आता ताण आणि तणावाचे केंद्र बनत चालले आहे.


     माझ्यासाठी मुंबई ही धावणाऱ्यांची आहे, थांबला की धक्के पडणार, तुम्हाला धावावेच लागणार आणि तसंही या धकाधकीच्या आयुष्यात थांबायला वेळ कुणाकडे आहे? 


      मुंबई बद्दल बोलायला गेलं की दिवस कमी पडतील पण मी ह्यावर जास्त लिहायला नको, जास्त लिहिलं तर ते वाचायला वेळ मुंबईकरांना असेल का अशी शंका मला आहे.


Rate this content
Log in