Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sandhya Yadwadkar

Others


2  

Sandhya Yadwadkar

Others


मला मी उमजले

मला मी उमजले

6 mins 22 6 mins 22

दोन दिवस रात्री अडीच वाजेपर्यंत जागून बनवलेलं विवेकानंदाचं स्केच सहज म्हणून डायनिंग टेबलवर ठेवलं आणि माझं मलाच आश्चर्य वाटलं. अजूनही मला एव्हढं छान चित्र काढता येतं यावर माझाच विश्र्वास बसतं नव्हता.इतक्यात सुशांत चहा पिण्यासाठी किचनमध्ये आला.


'ओहो. काय सुंदर स्केच आहे.आॅसम.आई कोणी काढलं? तू?'

'मग तुला काय वाटलं? तुझी आई म्हणजे छुपा रुस्तम आहे.अरे दोन रात्री जागून तिनं पूर्ण केलंय हे चित्र.' आनंद किचनमध्ये येतायेता म्हणाला.त्याच्या डोळ्यातून माझं कौतुक ओसंडून वाहत होतं.


मला माझ्या मेंदूच्या रचनेचं खरोखर खूप कौतुक वाटलं.जवळजवळ २५-२६ वर्षांनी मी स्केच काढण्यासाठी पेन्सिल हातात धरली होती.शाळेत असताना मी ड्राॅइंगच्या दोन्ही परीक्षा ए ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले होते.तसचं आंतरराष्ट्रीय स्तरावर जपानने आयोजित केलेल्या 'स्त्रियांचे सण' या स्पर्धेत मला गोल्ड मेडल मिळालं होतं.मी वटपौर्णिमा या सणाचं चित्र काढलं होतं.पण ते सगळं शाळेत असताना.आता एव्हढी वर्षं उलटल्यानंतर सुध्दा आपली उपजत कला शाबूत असते ह्याचा प्रत्यय मला आला.आणि हे सगळं सध्याच्या लाॅकडाऊनच्या काळामध्ये.मी मला जणू काही नव्यानेच ओळखू लागले.


कोरोनाशी समर्थपणे लढा देण्यासाठी २२ मार्च , रविवारी जनता कर्फ्युचे मोदीजींनी आवाहन केले आणि लगेच सोमवारपासून महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा केली गेली.आणि देशभर १४ एप्रिल पर्यंत. त्यामुळे सगळीजणं घरी. मोलकरीण, पोळीवाली बाई सगळ्याजणी आपापल्या घरी. त्यामुळे सगळी कामं स्वतः करण्याशिवाय पर्याय नाही.मग घरातली सगळी जण एकत्र बसून कामाची विभागणी करायचं ठरवलं.किती दिवसांनी आम्ही चौघहीजण असे एकत्र हाॅलमध्ये सकाळच्या वेळी बसलो होतो. आठवावचं लागेल.सुशांत आणि सुमेधला दोन दोन खोल्यांचा केर काढायला सांगितलं. आनंद मुळातचं व्यवस्थित आहे.म्हणून मशीनच्या कपड्यांची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर टाकली. आॅफिसमध्ये सारखा ' टीमवर्क' चा उदोउदो करण्यात येतो.मी तो यशस्वीपणे अंमलात आणू शकले.सगळ्यांशी सुसंवाद साधून. अरे, म्हणजे नेतृत्त्वगुणही माझ्यात दडलेला होता की!.फक्त त्याला योग्य संधी हवी होती.


पाठदुखीमुळे ओणव्यानी किंवा वाकून फरशा पुसणं मला शक्य नव्हतं.मग विचार केला आपण घरीच माॅप बनवू. टाकाऊतून टिकाऊ. लगेच सुशांतचा जुना टी शर्ट घेतला.त्याचा व्यवस्थित चौकोन कापून घेतला.मध्यभागी वाटी ठेऊन गोलाकार झिरमिळ्या कापल्या.जुनी कपडे वाळत घालण्याची काठी घेतली आणि तिच्यावर तयार केलेलं कापड घट्ट बांधून कापड उलट केलं. वीस मिनिटांत माॅप तयार.काहीही पैसे खर्च न करता. माझ्या कामगिरीवर मीच बेहद्द खुश झाले. एरवी मी सरळ मार्केटमध्ये जाऊन तीन-चारशे रुपये जराही विचार न करता माॅपसाठी खर्च केले असते. म्हणजे वेळ आली तर मी काय काय करु शकते याची जाणीव मला झाली.


आता तर मी टाकाऊतून टिकाऊ बनवण्याचा चंगच बांधला.घरात एक पिशवीभर जुनी प्लास्टीकची फुले होती.सगळी बाहेर काढली.त्यांची रंगांप्रमाणे, आकाराप्रमाणे विभागणी केली.पाकळ्या वेगळ्या केल्या.घरात जुन्या बांगड्या,मोती असेही भरपूर होते.पाचसहा हॅंगीग कुंड्या होत्या.सगळ्या बाहेरुन स्वच्छ धुवून पुसून गेरुने रंगवल्या.त्यावर गोलाकार बांगड्या फेवीस्टीकने चिकटवून घेतल्या.आणि मग त्यामध्ये विविध रंगांच्या पाकळ्या आणि मोती चिकटवले.सगळ्या कुंड्यांचे रुपडं एका क्षणात बदललं.लगेच नव्या नवरीसारख्या त्या आकर्षक दिसू लागल्या.वेळेचा सदुपयोग आणि नवनिर्मितीचा आनंद घरबसल्या.बाॅक्स पलंगातील शिवणमशीनलाही म्हटलं हवा लावावी.मशीन बाहेर काढून आनंदच्या जुन्या पांढऱ्याशुभ्र शर्टांमधून चांगले लांबरुंद पाच सहा मास्क शिवले.जुन्या काॅटनच्या चार पाच चादरींचेही मास्क शिवून एका ओळखीच्या एनजीओंच्या प्रतिनिधीला दिले. तेव्हढाच समाजकार्यात माझा खारीचा वाटा. म्हणजे शिवणकलाही अद्याप शाबूत आहे तर.मुलांच्या जिन्सच्या वेगवेगळ्याआकाराच्या पिशव्या शिवल्या.

त्यावर टी-शर्टच्या पुढे असलेली डिझाईन्स कापून पॅचवर्क केलं.प्लास्टिकच्या पिशव्या बंद झाल्यापासून बाहेर जाण्यासाठी कापडी पिशव्याच लागतात.मजबूत, आकर्षक आणि उपयुक्त.शिवाय जुन्या कपड्यांचा योग्य उपयोग आणि पैशाची बचत.एका दगडात किती पक्षी मी मारले होते.


आता मोर्चा स्वयंपाकघराकडे वळवला.सगळी कपाट,ट्राॅलीचे खण, काचेची भांडी, फ्रिज, ओट्यावरच्या टाईल्स रोज एकेक करत शांतपणे माझ्या पध्दतीने स्वच्छ केले.इतके दिवस मी हे सगळं कामवाल्या बाईकडून अधूनमधून करुन घ्यायची.पण ती काय पाट्या टाकल्यासारखी उरका पाडायची.मी सारे आपलेपणाने केलं.नको असलेल्या वस्तूंना सरळ बाहेरचा रस्ता दाखवला. मोहावर मात करण्यातही मी यशस्वी झाले.नाहीतर किचन म्हणजे बायकांचा weak point.काहीही टाकायचं म्हटलं की कायम जीवावर येतं.राहू दे. लागेल कधीतरी म्हणून बारीकसारीक चमच्यापासून सगळं जीवापाड जपलं जातं.पण ह्यावेळी मी मन घट्ट करुन सगळ्या निरुपयोगी वस्तू काढून टाकल्या म्हणजे मला कठोरही होता येतं.मला माझ्याबद्दल लागलेला अजून एक नवीन शोध! किचन एकदम सुटसुटीत आणि चकचकीत केलं.  


सगळेजण घरीच असल्यामुळे प्रत्येकालाच नेहमीपेक्षा जास्त भूक लागत होती.बाहेरुन काहीच आणणं शक्य नव्हतं.मग म्हटलं चला आपलंच पाककौशल्य पणाला लावावं.सगळी फूड चॅनेल्स,यू ट्यूबवरच्या पाककृती पाहून झाल्या.मग त्यातल्या त्यात कमी कष्टाच्या,रुचकर, घरात असणाऱ्या पदार्थांपासून बनवता येतील अशा आणि कमी भांडी लागणाऱ्या नवनवीन पाककृती निवडून त्याचे प्रयोग सुरु केले.आणि त्यातही प्राविण्य मिळवलं...मला सगळं निगुतीने (आईच्या भाषेत)करता येत होतं हे मला समजून चुकलं होतं.


मला माझ्यात दडलेल्या सगळ्या सुप्त गुणांचा हळूहळू साक्षात्कार होत होता.हे असं एकाएकी कसं काय होऊ लागलं याचा शोध घ्यायचा मी प्रयत्न करु लागले.मी थोडीशी अंतर्मुख होऊन विचार करु लागले.जे काही मी हल्ली करत होते ते काही मी एकाएकी आत्मसात केलेलं नव्हतं .ते सगळे गुण माझ्यात उपजतच होते.फक्त ते जोपासायला माझ्याकडे वेळ नव्हता.किंबहुना हे सर्व आपल्याकडे आहे हे सुध्दा मी साफ विसरुन गेले होते.रोजचं आपलं जगणं किती साचेबद्ध आहे याची प्रकर्षाने जाणीव मला ह्या लाॅकडाऊनच्या काळात झाली.रोज घड्याळाच्या गजराने धडपडत उठायचं.यांत्रिकपणे घड्याळाच्या काट्यावर सगळी कामं उरकायची.रोज जीवघेण्या गर्दीतून स्वतःला सावरत प्रवास करुन वेळेत आॅफिस गाठायचं. आॅफिसमध्ये स्वतःला सिध्द करण्याची धडपड करायची.यश-अपयश मुखवटा धारण करुन पचवायचं.आॅफिस सुटलं की घरचा विचार सुरु. घरात काय संपलाय,काय आणायचं आहे,भाजी काय करायची?कोणाचा वाढदिवस आहे?कोण आजारी आहे? औषध आणायची आहेत का? एक ना दोन.शंभर विचार एकाच वेळी डोक्यात घुमत असतात.ते सारं विचार करणारी 'मी' मात्र प्रत्येक ठिकाणी गृहीतच धरलेली असते.माझं वेगळेपण, माझे खास गुण,माझ्या आवडीनिवडी यांना त्यात कुठेही स्थान नव्हतंआणि ह्या सगळ्याला कळत नकळत मी स्वतःच जबाबदार होते.ह्याची जाणीव मला होत होती.माझ्यातला हरवलेला आत्मविश्वास मला परत मिळाला होता.


आत्मविश्वासाने कोणतेही काम केल्यास यश नक्कीच मिळते. कारण आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा आपण एखादी क्रिया करतो, त्यातून एक वेगळी ऊर्जा उत्त्पन्न होत असते ही ऊर्जा आपल्या आत्मविश्वासाची असते. मन शांत व एकाग्र ठेवावे लागते .सुंदरता मनाची असते तशीच ती विचारांचीही असते.आपल्यातल्या कलाकौशल्यांची असते. वागण्यातली असते आणि आपल्या संस्कारांचीसुद्धा असते. मी कोण आहे, याचा शोध घेताना, जाणवलेल्या फरकांवर काम करणं म्हणजे स्वतःमधल्या ‘मी’ला बाहेर आणणं आहे.आणि त्याचं 'मी' ला बाहेर काढण्यात मला यश मिळालं होतं.


आयुष्यात पहिल्यांदाच एव्हढा निवांतपणा अनुभवायला मिळत होता.इतरवेळी कधीही रजा घेतली तर ती बहुतेक वेळा मुलांच्या परीक्षा, आजारपण, कुठलातरी समारंभ, बाहेर फिरायला जाणं यासाठीच असते.या व्यतिरिक्त घरी मुद्दाम बसलेलं कधीच आठवतं नाही.घड्याळाची कटकट नाही.कामवाल्या बायकांची वाट बघणं नाही. मनाप्रमाणे कामं करायची.छंद जोपासायचे.कामात बदल म्हणजेच विश्रांती.त्यातून आवडीची काम करता आली तर जराही थकवा जाणवत नाही.उलट आणखी उत्साह अंगात संचारतो.हे सगळं मी अनुभवत होते.आनंदी राहून कुठलेही काम केले की दमणूक होत नाही हे खूप वेळा वाचलेलं मी प्रत्यक्षात आणलं होतं.आहे त्या परिस्थितीशी सामावून घेणं, आवडीनिवडी बाजूला सारुन जे आहे त्याचा आस्वादही मला घेता येऊ लागला होता.आनंदी रहाणं महत्त्वाचं.मग तो कशात आहे हे आपणच शोधायचं.घरासमोरील झाडं निरीक्षण करणं खूप आनंददायी आहे हेही मला उमगले. त्यांच्या हिरवेपणाच्या विविध छटा,त्यांच्या पानांची सळसळ,सूर्यप्रकाशाच्या प्रखरतेनुसार त्यांचं बदलणारं रुप,पक्ष्यांची किलबिल, जी आजपर्यंत गाड्यांच्या कर्णकर्कक्ष भोंग्यांमुळे कधीच ऐकू येत नव्हती,कोकीळेची कुहुकुहु,अमलताशाच्या सोनेरी फुलांच्या सड्यांनी भरुन जाणारे पिवळेजर्द रस्ते, रसरसून फुललेला गुलमोहर,पानोपान झाकणारा पांगारा.कितीकिती म्हणून निसर्ग दोन्ही करांनी भरभरून आपल्या ओंजळीत टाकत होता.पण माझेच हात इतके वर्षं आखडलेले होते.निसर्गचक्र तेच होतं,मीही तीच होते.बदलला होता फक्त दृष्टीकोन.हे सगळं आपण इतके दिवस आपल्या हातून निसटू दिलं ह्याचचं खूप वाईट वाटतं होतं. पण गेलं त्याचं दुःख करायचं नाही आणि कायम वर्तमानातच जगायचं या तत्वज्ञानानुसार हल्ली मी रोज नव्याने जगत होते. 


हा जो लाॅकडाऊन घोषित केला आहे त्याच कारण खूप वेदनादायक आहे.एव्हढ्याशा अदृश्य कोरोना नामक विषाणूने संपूर्ण भूतलावर वैश्विक महामारीचे संकट पसरवले आहे.प्रगत,अतिप्रगतअशा सगळ्या देशांना वेठीस धरलं आहे.ह्या कारणास्तव आयुष्यात पुन्हा कधीच लाॅकडाऊनची गरज न पडो.परंतु मला असं आवर्जून, अगदी मनापासून वाटतं की स्वघोषित लाॅकडाऊनचे पालन प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी आठ दिवसांसाठी करावं. घरातील सर्व सदस्यांनी घरातच रहावे.सगळ्या नोकरमंडळीना भरपगारी रजा द्यावी.घड्याळाचं कुठल्याही प्रकारचं बंधन न पाळता आयुष्याकडे नव्या नजरेने पहावं.आत्मपरीक्षण करावं.'मी' कोण आहे?माझ्या जीवनाचं ध्येय काय?मी ध्येयापर्यंत पोहोचण्याचा रास्त मार्ग निवडला आहे का?माझ्यात काय त्रुटी आहेत?माझी बलस्थानं कोणती? मी बलस्थानांचा योग्य वापर करुन घेतो आहे का?आणि मग बघा आयुष्य कसं फुलपाखरी होऊन जातं ते!आत्मोन्नती,'स्व' ची खऱ्या अर्थाने ओळख,आपल्यामधील सुप्त गुणांचा विकास फक्त आत्मनिरीक्षणानेच साध्य होतो.मग अगदी ठामपणे म्हणता येते आनंदी जीवनाचा गुरुमंत्र म्हणजे "मी मला ओळखणे".


Rate this content
Log in