Sandhya Yadwadkar

Others

4  

Sandhya Yadwadkar

Others

आले देवाजीच्या मना

आले देवाजीच्या मना

14 mins
450


बबन...

मी बबन पोशीराम मोरे.वडापावची गाडी हाय माझी.मस्त चाललं होतं हे कोरोनाचं आभाळाएव्हढं संकट येन्याआदी.१५-२० वर्षं गाडी लावतोय. मोक्याची जागा हाय इथं ठाण्याच्या बाजारपेठेत. बबनचा वडा म्हणजे एकदम फेमस.एकदा आपल्याकडे कोणी वडापाव खाऊन गेला की तो कायम आपल्याकडेच येनार याची गॅरंटी हाय आपली.चव आणि साईजमध्ये कधी बदल नाय. आपलं काम एकदम चोख.एवढे वर्षं तेचतेच करुन आता हात बसलाय.पोटापान्यापुरतं मिळतंय. पोरंपन हुशार हाइत अभ्यासात.त्यांना प्रायवेट शाळेत घातलं.शिकवणी पन लावली हाय.पोरांना खूप शिकवनार मी.दोघंही मोठी हाफिसर व्हायला पाहिजेत.त्यासाठी तर एव्हढी मेहनत करतोय. सकाळी चार वाजताच दिस सुरु होतो माझा.बटाटे उकडवायचे.सगळा मसाला तयार करायचा.सगळं सामान गाडीवर घालून चटणी भाकर खाऊन बरोबर सातला धंदा चालू करतो.दुपारी बारा वाजता बंद करुन घरी येतो.जेवन करुन थोडा आराम करुन परत संध्याकाळची तयारी.पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत. कधीकधी पायात गोळे येतात. पावसात खूप तकलीफ होते.स्टो लवकर पेटत नाय,तेलात पानी उडत.खूप सांभाळावं लागतं. अधूनमधून पोलिस, म्युनसिपालटीवाले,एरियातले दादा सगळ्यांना सांभाळावं लागतं.पण आता सगळ्यांची सवय झाली हाय.


घरात आम्ही सहाजण.मी, रंजी,सागर,सारीका आणि म्हातारा,म्हातारी.चाळीतल्या दोन खोल्यांमधे रहातो समदे.सैपाकखोली अगदीच लहान हाय. त्यातच मोरी, स्वयंपाकाचा वटा, डबे,भांडी ठेवायची मांडणी, पान्याचा ड्रम,बेसीन सगळं तिथेच.दहा खोल्यांना मिळून तीन नळ हाईत.पाणी सकाळी आणि रात्री दोन तास येतं.तेव्हाच सगळं भरुन ठेवावं लागतं.पाण्यावरुन भांडणं नेहमींचीच.रंजी खूप मेहनती हाय. थोडी तापटपण हाय.एकदा डोस्क फिरलं की तोंडाचा पट्टा सुरु.पन घर एकदम स्वच्छ ठेवते. कामाला अगदी वाघ हाय.सासू सासऱ्याच आदळआपट करत,पन करते.मला चार बहिणी आणि मी एकटाच.बहिणींची लग्न झालीत. एकटा मुलगा असल्यानं आई वडील माझ्याचजवळ रहातात.गावाला थोडीफार शेती हाय पण चुलते ती बघतात. आई नानांचं आता वय झालंय.आता त्यानला कष्टाची शेतीची कामं होतं न्हाइत.म्हनून त्यांना माझ्याकडेच आणलं.ते काही रंजीला आवडलं नाय.पण म्हातारपणी आई वडिलांना मुलानेच बघाया हवं.मी काही रंजीच्या रागाची पर्वा करत नाय.


खोलीचं भाडं तीन हजार आन लाईट बील अलग. मुलांचा शाळेचा खर्च.आई नानांचं औषधपानी. गावच्या पाहुण्यांची वर्दळ. त्यामुळे हल्लीच्या महागाईमधे घर चालवताना जीव मेटाकुटीला येतो. दोन बहिणींची लग्न मीच केली.त्यामुळे सतत डोक्यावर कर्ज असतंच.घर संसार म्हटलं की चालायचंच.वडापावची गाडी चालते तोपर्यंत ठीक हाय.पण हातावर पोट.रोजचा खर्च भागतो.पण बचत काय बी होतं नाय.तरी रंजी तशी संसारी हाय.दुपारच्या येळात टिकल्यांची पाकीट ,केसांचे चाप,गळ्यातल्या माळा ओवायच्या अशी कामं करत असते.त्याचे पैसे मात्र ती बाजूला काढून ठेवते.कधी अडीअडचणीला कामाला येतात.


असं माझं रहाटगाडगं चालू असताना कोरोनाच्या संकटामुळे ही टाळेबंदी सरकारनं जाहीर केली. रस्त्यावर खाण्याचे पदार्थ विकणाऱ्या गाड्या सगळ्यात आधी बंद केल्या.आता आली का पंचाईत? माझा वडापावाचा धंदा बंद. सुरवाती सुरवातीला घरात आराम कराया बेस वाटलं. घरी कधी बसायची सवयचं नाय. पहिल्यांदा वाटलं की एका महिन्यात सगळं ठीक होईल.महिनाभर धकवू कसंतरी.पण टाळेबंदी काही हटायची लक्षण दिसेना.घरात नुसतं रिकामं बसाया करमना. कंटाळा येऊ लागला.घरखर्च चालवायचा कसा? घरातलं धान्य,तेल साबण सगळं संपायला आलं.वान्याने उधारी द्यायचं बंद केलं.घरातली रोकड संपत आली.रंजीलाही काही काम मिळेनासं झालं.घर चालवायचं कसं.रोज सकाळच्या पारी रंजीची कटकट सुरु व्हायची.आज चायपत्ती संपली.साकर संपली. मी तरी कुठून पैसे आननार?मग आमचं झगडं व्हायला सुरुवात झाली.दोष कोनाचा नव्हता. पन सगळेजण एकमेकांवर चिडतं होते.बरं एव्हढ्याशा जागेत समदेच घरात.त्यात मरनाचा उन्हाळा. त्यामुळे आणखीनच चिडचिड व्हायची. जगनं मुश्कील होऊन गेलं.काय करावं काय बी सुचत नव्हतं. सगळीकडे अंधार वाटू लागला. चाळीतले बरेचसे लोक आपापल्या गावी निघून गेले होते.मीही तोच विचार करु लागलो.


रंजी....

खरं म्हणजे गावाला जायची कल्पना मीच धनीना सुचवली.आता इथं रहानं आन रोजचा दिस साजरा करनं मला मुश्कील व्हतं.घर म्हटलं की पन्नास गोष्टी हव्यात.पीठ, मीठ, स्वयंपाकाचं तेल, डोक्याला लावायचं तेल, भाजी, चहा, दुध, साखर, मसाला, कपड्यांचा,अंगाला लावायचा,भांडी घासायचा साबण,गॅस सिलिंडर एक ना दोन. बरं. प्रत्येक गोष्टीला पैसा हवा.आपल्याला कोन फुकट देनार? नाय म्हनायला रेशनच्या दुकानात वीस किलो तांदूळ आणि गहू भेटले दोन रुपये किलोने.पण बाकीचं काय?तरी बरं मी दुपारच्या रिकाम्या टाईमात टिकल्यांची पाकीट,केसांचे चाप, गळ्यातल्या माळा असं काही बाही करुन चार पैसे बाजूला टाकले होते तेच आता कामाला येत व्हते. पन ते तरी किती पुरनार? मला पन मिळणार कामं बंद झालं.यांची वडापावाची गाडी पन बंद.रोजचा खर्च भागवता भागवता नाकात दम येत व्हता.तरी बरं दोन्ही पोरं गुनाची.कसला पन हट्ट करत नव्हती जे काय खायला घालू ते गुमान खात व्हती.मलाच खूप वाईट वाटायचं.पण काहीच विलाज नव्हता.


समदी मानसं घरात असल्यामुळे आणखीनच रागराग व्हायचा. एव्हढीशी ती टीचभर जागा.त्यात सहा मानसं,सगळं सामान.घरावर पत्रे.उन्हापायी एव्हढे तापायचे की काही बोलायची सोय नाय. एरवी कसं आई नाना चाळीसमोरच्या मारुतीच्या मंदिरात जाऊन बसायचे.तिथं वडाच्या झाडाचा पार व्हता.सगळ्यांकडची म्हातारी माणसं तिथंच बसायची झाडाचा गारवा खात.गप्पागोष्टी,सुनेच्या चहाड्या सांगत बाया बापडे आपला जीव रमवायचे.पोरं बाहेर खेळायची. दिवसभर हे बाहेर असायचे गाडीवर.म्हंजे तशी मी एकटीच असायची घरात.मग चाळीतल्या आम्ही सगळ्या बायका वऱ्हाड्यांत बसायचो आपापली कामं करतं आणि इकडच्या तिकडच्या उठाठेवी,कुचाळक्या करत. कोनाचा नवरा काल दारु पिऊन आला, कोनाकडे काल रात्री झगडा झाला,कोनत्या पोरीचं कोनाशी लफड हाय.एक ना दोन. बायकांना काय शंभर ईषय बोलायला.चांगला येळ जायचा आणि कामपन व्हायची.आता समदी पंचाईत .मारुतीच्या मंदिराला टाळं मारलं.आन पोलीस वडाच्या पारावर पन कोनाला बसू देत नव्हते.पोरांना बाहेर खेळाया बंदी. हे पन दिसभर घरात.घरात असल्यामुळे दिवसभर टी.व्ही.चालू.त्यात नानांना ऐकू कमी येतं. त्यामुळे ते आवाज सारखा म्होटा करायला लावायचे. दिवसभर त्या कोरोनाच्या बातम्या.कान पार किटून जायचे.बरं स्वयंपाकखोलीत पंखा नव्हता.जेवन बनवताना गॅस विझतो म्हनून.माझा तर जीव नुसता कासावीस व्हायचा.दुपारीपन थोडबी आडवं व्हता येतं नव्हतं.सासऱ्यांसमोर कसं झोपनार?जीव अगदी कावून गेला होता.पैशाच्या काळजीनं आणि उन्हाळ्यानी.काय करावं? काय बी सुचत नव्हतं. शेवटी ईचार केला आणि ठरवलं की आपन आपल्या गावालाच जाऊ.पडीक का होईना पन आपलं स्वोताचं घर हाय.डोक्यावर छप्पर हाय. काहीतरी शेतीची काम करु.मिळतील चार पैसे. ढकलू कसेतरी दिवस.निदान थोडा मोकळेपना तरी भेटलं वावराया.


'अवं, ऐकता सा? आपन गावी जाऊन राहू.बस झालं इथं रहानं.रोज दिस उजाडला की मला धडकीच भरते.आज कसं जेवन बनवायचं? आता आपले पैसे पन संपत आले.मागे लिज्जत पापड लाटायचं काम करत व्हते तेव्हा थोडंसं सोनं मिळायचं बोनस म्हनून. त्यातूनच सोन्याचे दोन तीन डागं बनवले होते.ते पन इकून झाले.आता आपल्याकडे काय बी उरलेलं नाय.गावी जाऊन काहीतरी काम करु.तेवढाच पोटाला आधार.' 


'अग काय बोलतेस तू रं‌जे,?गावी कोन आपल्याला खायला घालनार?चुलत्याच घर हाय.पन चुलतीचा स्वभाव तुला माहित हाय. किती खाष्ट आहे ती. आपन सगळेजण तिकडे गेलो तर ती आपल्याला घरात पन घेनार नाय.आन असं पन गावातली मानसं मुंबई पुन्याच्या लोकांना गावात घेत नाहीत. बातम्या बघतो ना रोज आपन.आणि जायला तरी साधन काय हाय? बस नाय,ट्रेन नाय.सगळीकडं नाकाबंदी.गाडी करुन जायला पन आपल्यापाशी तेव्हढे पैसे न्हाइत.आता प्रायवेटवाले पण वाटेल तेव्हढं भाडं सांगतात.आपल्याला ते परवडणारं हाय का?तू गावी‌ जायचा ईचार डोक्यातून काढून टाक.'


'अवं, असं काय म्हनतासा?आता आपल्याला गावाला जान्या बिगर काय बी रस्ता नाय.माझं ऐका. आता ही टाळेबंदी कवा जानार?नंतर पन तुम्हांस्नी लगोलग थोडाच धंदा चालू कराया मिलनार हाय? अजून दोन महिने आपल्याला असेच काढाया लागतील.कसे काढनार आपन इतके दिवस इथं पैशाबिगर? गावी तुमचा चुलता ,माझा मामा हाय. आपली आक्की पन हाय.तुमीच तर तिचं लगीन लावून दिलतं दोन वर्सांपूर्वी.त्याच कर्ज अजून आपन फेडतोय.ती थोडीच आपल्या आई बापाला अन् भाऊभावजयीला,भाचवंडाना थोडे दिवस रहायला नाय म्हननार?बक्कळ शेती, गायगुरं हाईत तिच्या सासरी.खायप्यायला तर कमी न्हाय तिच्याकडं. माझं ऐका.आपन गावीच जाऊ या. आपल्या चाळीतली पाच सहा बिऱ्हाड तर खाली झाली.रखमा उद्या चालली बोरीबिस्तरा आवरुन. दोनतीन दिवसात सहदेवचं पन घर खाली होनार. गावी जानाऱ्या मानसांना काय येडं लागलंय? 


'तू म्हनतेस ते समदं पटतंय मला.पन जानार कसं? आपल्या बरोबर आई नाना हायेत.त्यांना कसं न्यायच?'

'काय नाय.आपन सगळेजनं चालत जाऊ.पोचू तवा पोचू.अख्खी दुनिया चालत निघाली.आपनपन तसंच करु.'

'अग, जावळीच इथून आहे २८० कि.मी.त्याच्यापुढं आपलं सोनेगाव १०-१२ कि.मी.कशी चालणार म्हातारा म्हातारी आणि पोरं?'.

'चालतील दमादमानं. तुमी नानांना सांभाळा. म्यां म्हातारीकडं लक्ष ठेवते.पोरं आपल्या मागं येतील बराबर.आता दुसरा काय पन रस्ताच नाय तर काय करायचं?'

होय नाय करत शेवटी सगळे जण तयार झाले. प्रत्येकाचे दोन-दोन कापडाचे जोड, दोन-तीन चादरी अन् थोडं खायाचं सामान घेऊन गुरुवारी पहाटच्या पारीच आमची वरात निघाली गावाकडं पायी.


पोशीराम.....

आज बराबर धा दिस झालं चालाया सुरुवात करुन. अजून तर निम्म अंतर पन पार केलं नाय. कसं होनार आमचं.पायाच तर पार तुकडं पडायची येळ आली. हे मी म्हनरारं ऊन. त्यात प्लास्टीकची पायताण. पार भाजून निघलेत पाय. जरी पायी पंढरीची वाऱ्या केल्या असल्या तरी वारीचं येगळं असतं. वारीच्या दिसांत जमीन अशी तापलेली नसते. पावसानं गारवा असतो. समदे वारकरी बरोबर असतात.माऊलीच्या भेटीची आस असते. भजन, अभंग म्हनतं कधी पंढरी येते ते समजत बी नाय. पन हे असं मे महिन्यात एव्हढं पायी चालनं आम्हा म्हाताऱ्यांना कठिनचं हाय.पन बबनला तरी काय बोलनारं? त्याचा पन बिचाऱ्याचा नाविलाज हाय.तो काय मुद्दामशान करत न्हाय.आता ते कोरोना का फोरोना आलं अन् त्याचा धंदाच बंद झाला त्येला तो तरी काय करनार. नायतर एरवी आमचं सगळं नीट करतो. टाळेबंदी कधी उठनार कोणालाच माहित नाय.पैशाशिवाय मुंबईत रहान लै कठीन.गावी ठीक हाय. सोपान काय आपल्याला थोडे दिस रहाया मना नाय करनार.तसं पायलं तर सोपान रहातो ते घर दाजींचच, आमच्याच बापाच तर हाये.माझं बी मोडकळीस आलेलं घर हायेच की. थोडी डागडुजी करु आन राहू तिथंच. पन घरापर्यंत चालनार कसं? असं चालत राहिलो तर अजून पंधरा-वीस दिस नक्कीच लागतील.बरं खायलाप्याया पन नाय मिळत वेवस्थित. सगळीकडं बंद. बिस्कुट,बटर,खारी भेटली तर चाय संगती खाऊन दिस काढतोय. धा दिवस झाले अंगाला पानी नाय लागलं.घामाचीच आंगुळ चालली हाय. डोक्याचं निस्त डालं झालंय. केस पार तारवानी कडक झालेत.हिची अवस्था तर माझ्यापेक्षा बेकार. तिला एव्हढं चालायची बिलकूल आदत नाय.थोडी चालल्यावर तिला दम लागतो. थोडं थांबाया लागतं. मग रंजी चिडचिड करते. तिला हात धरुन ओढत नेते. तिचा जीव तो काय? कशी चालनार ती या लोकांसारखी पटापटा. पन ते काय बी समजून घेत न्हाइत. सारखा तिचा रागराग करतात. तिचे पाय आताच पुरीवानी सुजलेत. मला नाय वाटतं हिला एव्हढं चालनं झेपेल. पण आता उपाय तरी काय?असंच धकवाव लागनारं. घर येईस्तोपावत. रस्त्यात काय वाहन भेटलं तर देवच पावला. बरं. चालताना पन कितींदा पोलिस अडवत्यात.आमच्याकडं दुसरा विलाजच न्हाय तर आमी तरी काय करनार? इथं कोनाला हौस हाय उन्हात पाय पोळत चालायची?आता माऊलीपाशी एव्हढंच मागनं हाय की रस्त्यात कुनालापन आजारपन नको यायला.पोरं पन बिचारी पार खंगून गेलीत. पन तोंडातून हुं का चुं करत न्हाईत. बिचारी मुक्या जनावरांवानी पाय घासत चालतात. त्यांना तरी कुटं सवय हाय एव्हढं उन्हातान्हात चालायची? पन गुनाची हायेत लेकरं. माऊली कसलं संकट आनलसं रे बाबा आमच्यावर. आता तूच काय तो मार्ग दाखीव. आम्हांला चालायचं बळ दे. कुठंतरी चार घास गरम खायाला मिळूं दे. सारखी बिस्कुट खाऊन पोटाची पार वाट लागलीया. पोट नुसतं जड झालंय. पन पोटाला आधार म्हनून ढकलत रहायचं काहीबाही पोटात. भगवंता वाचवं रे बाबा अन् सुखरुप घरला पोचीव म्हंजे झालं.


बबन....

आताशा खरंच देवाचा धावा केल्याविना काय बी दुसरा विलाज नाय असंच वाटतंय.चालाया सुरवात करुन धा दिस पार झालं पन अजून किती लांबचा पल्ला गाठायचा बाकी हाय.कवाकवा वाटतं उगाच रंजीचं ऐकलं आन हे पायी गावी जायचा घाट घातला.गुमान बसलो असतो ठाण्यात अर्धी भाकर खाऊन.थोडी अजून कळ काढली असती तर समदं ठीक झालं असतं.काय तरी सोय केली असती कुनीतरी.न्हाय तर सरकारनं.हे म्हंजे आगीतून उठून फुफाट्यात पडल्यावानी झालंय.आता पुढं पुढं चालत रहान्याबिगर काय बी विलाज न्हाय.पन एक डाव अस पन वाटतं की गावी जायला निघालो नसतो तर उपासमारीनं कायतरी कमीजास्त झालं असतं.कारन खरंच घरात कायच उरलं नव्हतं.थोडी आता तपलीक झेलली,एकदा गावी पोचलो की मग तरी मेहनत करुन चार घास खाऊ सुखाचं.पन ह्या उन्हानं पार दशा केली हाय समद्यांची.त्यात ते मास्क लावून चालून तर अगदी गुदमरल्यावानी होतयं.नऊ नाय वाजलं तर सूर्य अंगावर येतो.रस्ते तापाया सुरुवात व्हते.प्लास्टिकच्या चपला तापून पायाला चिकटतात.समद्यांचं पाय सोलून निगालेत.मधेमधे थांबनार तरी किती? एखादं सावलीचं झाड असलं तर बसायच्या आधी नीट पहावं लागतं.झाडाच्या भोवती म्होप लालमुंग्या असतात.जीवजिवाणू असतयं.त्यामुळं बसायची जागा पन नीट पारखून घ्यावी लागते. आधीच ह्यांच्या चालीनं चालून पार वैतागून गेलाय जीव.दोन म्हातारी आन दोन पोरं.बरं सारखं वरडून पन उपेग न्हाय.त्यानला खरंच चालाया खूप तरास होतोय.मला समजताय पन मी तरी काय करु?त्यादिवशी तर सागरनं तमाशा केला.भोकाड पसरत रस्त्यात फतकल मारुन बसला.अजिबात हालाया तयार नाय.'आता मी चालनारच नाय'.असं बोलला.त्याची समजूत घालता घालता नाकी नऊ आलं.सात वर्षांचं कवळं लेकरु पार सुकून गेलयं.खरा तो अजिबात हट्टी नाय.पन आता त्याच्यात काय ताकदच उरली न्हाय.शेवटी रंजीनी त्याला टेंगणावर मारला तवा कुठं भोकाड बंद झालं त्याच.मंग आई- नानांना दोन हाताला धरुन मलाच चालावं लागतंय.एक दोन दिस रातचं चालून पाह्यलं.पन रात्री मोकाट कुत्री लै अंगावर येतात.दिवसा उन्हाचा त्रास हाय पन भ्या तरी वाटतं न्हाय. कुनीकुनी आमच्यावानीच चालनारी मानसं भेटत्यात.तेवढीच सोबत.कुनी चांगली असतात.पन काहीजनं वंगाळबी असत्यात. त्या दिवशी चार-पाच अशीच जवान टारगट,पोरं सारीकाच्या आजूबाजूला उगाचच घोटाळत व्हती. सारीका आता अकरा वर्सांची हाय.गोरी,देखनी हाये. रंजीच्या ध्यानात आलं म्हनून बरं.आमी दोघांनी मिळून अस्सा दम भरला ना त्या पोरास्नी, पाय लावून पशार झाली.खूप लक्ष ठेवावं लागतं चौफेर.


आज बराबर पंधरा दिस झालं पायी चालाया सुरु करुन.कसं दिस काढतोय ते आमचं आम्हालाच माहिती.आंगोळ नाय,धड झोप नाय.जीवाला शांती नाय.सदा मन धास्तावलेलं.आता कुठं शिरवळ ७ किमी दाखवतयं.म्हंजे सोनेगावं अजून १०० किमी. दूर हाय.पन आज खूप दिसांनी नशिबानं हात दिला. शिरवळच्या अलिकडं रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मठ हाय.तिथं एक बोर्ड दिसला.त्यावर लिहिलं व्हतं की गरीबांसाठी तिथं चहा,नाष्टा,आणि दोन वेळेचं जेवण मोफत मिळेल.माझ्या जीवात जीव आला. आज तरी सगळ्यानला प्वाटभर जेवायला मिळलं. आम्ही सगळेजण मठाकडं जाऊ लागलो.तिथं बाहेर पान्याचं टाकं बी व्हतं.आम्ही आधी समद्यांनी हातपाय तोंड स्वच्छ धुवून काढलं.इतकं बेस वाटलं. सगळा थकवा निघून गेला.मग जेवनाच्या लाईनीत उभारलो.चपाती भाजी,डाळभात प्वाटभर होतं. मनात मनात मठवाल्या लोकांचे खूप आभार मानले.मठाच्या थोडं पुढं दोन तीन बाकडी होती. तिथं तास दोन तास बसून मग चालायला सुरुवात करु असा ईचार केला.खूप दिसांनी थोडीतरी ठीक जागा भेटली बूड टेकाया.आई- नाना तिथंच आडवे झाले.लगेच त्यांचा डोळा लागला.


रंजी.....

आई-नानांच्या पाठोपाठ पोरं बी पसरली.एक मिनटात पार गपगार झाली.तवा माझ्या डोस्क्यात एक भारी ईचार आला.मी यास्नी म्हनलं,'अवं ऐकतासा?'

'हां.तुजच ऐकून इथपावत पोचलोय.बोल काय म्हनायचं हाय तुला?'

'अवं,म्या काय म्हनती आपन ना म्हाताऱ्यांना हितचं सोडून देवू.किती हळूहळू चालतात दोगबी. अशा पावलांनं आनी पंधरा दिस लागतील गावी पोचाया.'

'अग, तुज काय टकुर फिरलयं काय?' यांचा आवाज एकदम वाढला.


म्यां हातानचं हळू बोलायचा इशारा केला आन माझं घोडं दामटवलं.' आता तुमीच बघा.त्या दिवशी सागरने कसं केलं.असं जर आपन म्हाताऱ्यांच्या नादी लागत राहिलो ना तर आपलं पोरं हातच जाईल.किती बारीक झालाय तो.आपलेआपन असलो तर भराभरा चालू.पटकन गाव गाठू. म्हाताऱ्यांची काय आता वयं झालीत.त्यांचं काय कमीजास्त झालं तर काय जास्त फरक पडनार न्हाय.पन आपल्याला अन् पोरांनला काय झालं तर कोनत्या भावात पडलं तेचा जरा थंड्या दिमागानं इचार करा.मंग बघा माझं समद बोलनं तुम्हांसनी पटलं.'

'अग,पन असंकसं आई बापाला सोडून निघून जायाच?आई बाप हायेत ते माझं.किती कष्ट केलेत आम्हांसनी मोठं कराया.मला नाय हे पटत.म्यां एकलाच पोरगा हाय त्यांचा.लोक काय म्हनतील?'


'लोकांच मरु द्या तिकडं.आता आपलं एव्हढं हाल चाललतं तर आले का कोनी लोक आपल्या मदतीला? शेवटी परत्येकाला सोताच रस्ता शोधाया लागतो.त्या माकडीणीची गोस्ट ठाव हाय ना? नाकातोंडात पानी जाया लागल्यावर पिल्लाला पान्यात टाकून दिलंच ना?अव,ही जनरीत हाये. परत्येक मानूस शेवटी स्वार्थीच असतो.बरं इथं त्यांची खायापियाची झाक सोय हाय.मठातली मानसं पन चांगली दिसतात.त्यांची काय बी आबाळ होनार न्हाय.माझं ऐका.आज आपन पहाटं पहाटं त्ये गाढ झोपले की निघून जाऊ.थोडं शांत राहून इचार करा.अशी संधी परत भेटनार नाय.'


म्यां चढवलेली पट्टी फिट बसली.रातचं जेवन झाल्यावर धनी सोताहून मला बोललं की उद्या पहाटं आपन चौघं निघून जाऊ.

ठरल्यापरमानं अगदी पहाटचं सागरला कडेवर घेऊन आई- नानांच्या कापडांची पिशवी त्यांच्या डोक्याशी ठेवून आम्ही चौघं निघालो.सारीका रस्त्यात सारखी इचारत व्हती की आजा आजी आपल्याबरोबर का न्हाय आले.तिला थाप मारुन दिली की ते दोघंबी लै दमलेत.थोडे दिसांनी येतील म्हनून.अख्खा रस्ता धनी एकदम गप व्हते.त्यांनला वाईट वाटतं व्हतं.मलाबी काय खुशी होत नव्हती असं म्हाताऱ्यांना सोडून देन्यात.पन करनार काय? काइ येळेला मन घट करावचं लागतं.बरं आपन काय त्यांची खायप्यायची नीट वेवस्था करुनशान मंगच त्यांना सोडलं.मला तर वाटतयं की म्यां काय पन चुकीचं केलं न्हाय.मजलदरमजल करत आम्ही ७-८ दिसं चालत व्हतो.सोनेगावाला पोचेपावत खूप तरास झाला.एकदा मधेच पाऊस लागला.समदे कपडे भिजून गेले.तसेच अंगावर वाळवलं.शेवटी एकदाच गाव आलं.आमी ठाण्याहून आलो म्हनून आम्हांला लगेच गावात घेतलं न्हाय.आमची तपासनी केली.दोन दिस तिथल्या शाळेतच आम्हांस्नी ठेवलं.तिथंअसताना सोपानकाकांला अॅक्सिडेंट झाल्याचं समजलं.बैलानं शिंगं मारली पोटात.तालुक्याला दवाखान्यात ठेवलं होतं. दोन दिसांनी आम्हांस्नी घरला जायाला सांगितलं.आता आक्कीच्याच घरचा रस्ता पकडला.

आक्की....


'अरं,बबन तुमीच एकलं? आई-नाना कुठं हायेत?' बबनला भाहेर वोट्यापाशीच थांबवत मी इचारलं.

'अगं,काय सांगू आक्के तुला.टाळेबंदीनं धंदा बंद झाला.घरातलं किडूकमिडूक बी संपलं.म्हनून इकडंच,गावी,यायचं ठरीवलं.पंधरावीस दिस आमी पायी चालतोय एव्हढ्या ऊन्हातून.आई नानांला ऊन सहन झालं नाय.त्ये दोघंबी रस्त्यातच गेलं.' बबन म्हटंला.रंजीनं लगेच गळा काढून डोळ्याला पदर लावला.

'अरं वा रे वा!! नाटकं कराया तुम्हां दोघांस्नी बी लई झाक जमतंय.आई-नाना गेले म्हनतोस,मंग माझ्या घरी काय त्यांची भूतं आली हायेत होय?'

'काय? आई नाना तुझ्या घरी आलेत? कवा?' बबन कावराबावरा होत म्हनाला.

'झाले पाच सहा दिसं.खोट वाटतं असेल तर थांब. म्यां त्यांस्नी बोलावते.' म्यां म्हनलं.'आये,नाना जरा भाहेर या.कोन आलाय बघा.'

आई नानांला पाहून बबन आणि रंजी मनातून चांगलेच चरकले.त्या दोघांचेबी चेहरे पडले.

'चांगलं पांग फेडलेसं रे पोरा.आम्हां म्हाताऱ्यांना वाऱ्यावर सोडून बायका पोरांना घेऊन एकलाच निघतांना लाज नाय वाटली तुला?पोरगा हायेस का कोन? एव्हढं बाईलयेडं वागनं चांगलं न्हाय. बायकोचं ऐकून आई बापाला सोडलसं?कुठं फेडशील हे पाप? अन् वरती आमी मेलो म्हणून सांगून मोकळा झालास?शरम वाटते तुला माझं प्वारं म्हनून सांगायला.' आई रडत रडत बोलली.


'भरुन पावलो रे बाबा तुला जल्म देऊन.चार पोरींच्या पाठी झालास म्हनून लाडात वाढिवला त्याची चांगली परतफेड केलीस रे पोरा.बायको म्हटंली म्हनून आम्हां म्हाताऱ्यांना घेऊन पायी निघालास.तवा जरातरी इचार केलास का की कसं चालतील ही म्हातारी खोडं.आमची फरफट करत चालवलसं.आन मठ काय दिसला तर आम्हांसनी तिथंच सोडलसं?तुला काय वाटलं आमी तिथचं मरुन जाऊ?तुला कितीही वाटलं की आम्ही मरावं तरी आमचं मरन तू नाय आमची विठू माऊली ठरवनार.'नाना डोळ्यातलं पानी लपवत बोलतं होते. 'तू आम्हांस्नी सोडून पहाटचं निघून गेलास.सकाळी उठून पाहिलं तवां ध्यानातं आलं.खूप वाईट वाटलं. तुझ्या आईच्या तर डोळ्यातलं पानी थांबतच नव्हतं.काय करावं काय बी सुचत नव्हतं.आम्ही घाबरलो.दगडावानी बसून राहिलो. त्या मठातली मानसं. कोनाची कोन? पन बिचारी देवासारखी धावून आली.आम्हांसनी धीर दिला.काय बी काळजी करु नका म्हटले.टाळेबंदीमुळे मठात राहू देता येणार नाही.पण इथं बाकड्यावर बसा म्हनले. काय वेवस्था करता आली तर पाहू.असंबी आश्र्वासन दिलं.कोनी न्हाइ त्येचा देवच असतो.दोन दिसं काढलं बाकड्यावर.तिसऱ्या दिवशी नाष्टा घ्याया लाईनीत उभारलो.त्या दिवशी आपल्या गावच्या सरपंचातर्फे सगळी खान्याची वेवस्था होती. सरपंच त्या मठाचे उपाध्यक्ष हाईत.मला त्यांनी लाईनीत उभा असल्याचं पाहिलं.त्यानंला धक्काच बसला.माझा हात धरुन बशिवलं.सगळं हातात आनून दिलं.ते मोठी गाडी घेऊन आले होते.मला म्हनलं की काय बी काळजी करु नका.सांजच्याला आपल्या गाडीतूनच सोडतो तुम्हांसनी घरला.माजा जीव भरुन आला.म्यां मनात माऊलीचं आभार मानलं.एव्हढ्या वाऱ्या केल्या,एकादशीचे उपास केले ते काय वाया नाय गेलं.सरपंचाच्या रुपात माझी माऊलीच उभी राहिली.


ठरल्यापरमानं आम्ही सांच्याला सहा वाजता निघालो.वाटेत त्यांनीच सोपानाला लागल्यानं तो तालुक्यातल्या दवाखान्यात भरती असल्याचं सांगितलं.म्हनून मंग आक्कीकडचं मुक्काम करायचा असं ठरविलं.गावात गेल्यावर आम्हांसनी तपासलं.पन समद ठीकठाक व्हतं म्हनून घरला जायला परवानगी दिली.आमी गाडीमधून घरला आलो आन तुमी आईबापाच्या मरनावर टपलात म्हनून इथपोवत पायी चालत आलात.आईबापाचं नेहमी आशीर्वाद घ्यावं, तळतळाट न्हाइ घेऊ.' नाना दम लागेस्तोवर बोलतं व्हते.

हे समदं बोलनं दारात उभं राहून चाललं व्हतं.लगेच समदी आजूबाजूची मानसं जमा झाली.चुलती, रंजीचं मामा आलं.बबननं काय केलं ते समद्यांस्नी समजलं.जो तो चकीतच झाला.पोराचं आन सुनेचं कारनामे पाहूनशान.समदे एका दमात बोलले की आईबापाला अर्ध्या रस्त्यात सोडून देनाऱ्या नालायक,उलट्या काळजाच्या पोराला आन त्याच्या कुटुंबाला आमच्या गावात थारा नाय.


म्या आई नानांना घरात नेलं अन् घराचा दरवाजा बंद केला.बाकीची समदी लोकं आपापल्या घरला निघून गेली. पडलेल्या चेहऱ्यानं, तोंड झाकत बबननं पाठ फिरवली आन तो आपल्या बायका पोरानला घेऊन परत पायी चालू लागला.


Rate this content
Log in