ऋतुजा आठल्ये काठे

Others Inspirational

4.5  

ऋतुजा आठल्ये काठे

Others Inspirational

मी पाहिलेला संवाद

मी पाहिलेला संवाद

5 mins
1.5K


दक्षिण मुंबईत राहिल्यामुळे असेल कदाचित पण मला लहानपणापासून ऑटोरिक्षेचे आकर्षण होते आणि आहे आणि ऑटोरिक्षेच्या जोडीला टमटम वा टुकटुक रिक्षेचेसुद्धा मला तेवढेच अप्रुप वाटते. कदाचित थोडे जास्तच.


अगदी साध्या वीस मिनिटांच्या प्रवासापासून ते २४ तासांच्या एखाद्या मोठ्या प्रवासापर्यंत आपण सगळेच प्रवास करताना प्रवासात हरखून जातो. कोणाबरोबर असू तर त्या व्यक्तींशी संवाद साधतासाधता प्रवास करतो किंवा एकटेच असू तर पुस्तके, पेपर वा मोबाईल फोन ह्यांच्यानंतर किंवा ह्यांच्याशिवाय आपण आजूबाजूचे निरीक्षण खिडकीबाहेरचे निरीक्षण, आजूबाजूच्या लोकांबद्दलचे तर्कविर्तक नाहीतर मग अगदी आपल्याच विचारात मग्न. असे आपण प्रवास करताना एकावेळीच दोन प्रवास करीत असतो, बाह्यस्वरूपातील एक अॅक्च्युअल प्रवास आणि आपल्या अंर्तमनातील एक व्हर्च्युअल प्रवास. मला स्वतःला प्रवासात निरीक्षण करायला खूप आवडते जणू काही माझा छंदच आहे तो. सगळे प्रवासी जरी एकाच वाहनात असले तरी प्रत्येक प्रवासी हा वेगळा असतो. मग त्यांचे, त्यांच्या दिसण्या-वागण्या-बोलण्याचे निरीक्षण, त्यांचे व त्यांच्या बरोबरच्या व्यक्तींमधला संवाद अनुभवणे, जाणणे, त्यांच्यातील नात्यांचा तर्कविर्तक... अशा व इतर अनेक गोष्टींमध्ये मी प्रवास करताना रमते. बस, ट्रेनपेक्षा मला टमटम रिक्षेचा प्रवास जास्त आपलासा व जवळचा वाटतो. कारण बस, ट्रेनमध्ये इतर प्रवासी अगदी लांबलांब वाटतात पण तेच टमटम रिक्षेत अगदी जवळचे वाटतात. जणू एका घरातील कुटुंबाप्रमाणे... आणि खरेच की काही मिनिटांच्या त्या प्रवासात सगळे एका छताखाली कुटुंबाप्रमाणेच एकत्रही असतात की...


हल्लीच मी व माझ्या मुलाने अशाच टमटम रिक्षेच्या एका आनंदी प्रवासाचा अनुभव घेतला. आम्ही सुरवातीच्या स्टॉपलाच रिक्षा पकडली होती.  आमच्याबरोबर एका कोळिणीने रिक्षा पकडली होती. एखाद दुसऱ्या स्टॉपनंतरच एक तरूण, नवविवाहीत जोडपं रिक्षात चढलं. दोघेही दिसायला अगदी देखणे होते. ते दोघे रिक्षात चढल्यावर मी माझ्या मुलाला 

माझ्या मांडीवर घेतले. प्रथम ते दोघे माझ्याच बाजूला बसले. पण मग तिने आपल्या बोलक्या डोळ्यांनी कोळिणीसमोर बसण्यास नाराजी दर्शविली. मग त्याने हुशारीने जागा बदलली, दोघेही समोरच्या बाजूला बसले, कोळिणीच्या शेजारी तो बसला व ती अगदी माझ्यासमोर. ती माझ्या मुलाकडे बघून गोड हसली. माझ्या मुलाऐवजी मीच तिला हसून

(तिच्याएवढे गोड नसेल कदाचित) प्रतिउत्तर दिले. तर मग तो ही छान हसला. तिने खुणेनेच त्याला सांगितले की हा छोटा  मुलगा छान आहे. तो त्यावर छान हसला व ती खूप मोहक लाजली. मग त्याने जसे हळूच तिच्या खांद्यावरचे केस बाजूला सारून तिच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला तेव्हा ती अजूनच मोहरून गेली तिने आपली मान हलकीच त्याच्या खांद्यावर ठेवली. त्या दोघांच्या त्या प्रेमळ मूकसंवादाचा अनुभव मी मजेत लुटत होते. 


माझ्या मुलाचे रस्त्यावरील बाहेरच्या गोष्टींचे निरीक्षण चालू होते. मधेमधेे तो मला काही प्रश्न विचारून त्या दोघांच्या माझ्या निरीक्षणामध्ये मला डिस्टर्ब करीत होता... असो... मी इमानेइतबारे त्या दोघांना ऑड वाटणार नाही ह्याची काळजी घेऊन त्यांचे निरीक्षण करत होते. ते दोघे जेव्हा रिक्षेत चढले तेव्हाच मला त्यांच्याबद्दल एक अनामिक आकर्षण वाटले होते आणि नंतर त्यांच्या त्या प्रेमळ मूकसंवादामुळे एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती. रिक्षा अलिबागच्या रस्त्यावरून जात असल्यामुळे कुठून कुठून तरी समुद्राचा एखादा कोपरा, बोटी हयांचे सुंदर दर्शन प्रवासात होतच असते. तसे ते त्यावेळीही झाले... आणि त्या दोघांमधल्या तिने ते पाहिले आणि एखाद्या लहान मुलाला त्याचे आवडते खाणे किंवा खेळणे मिळाल्यावर जसा अतीव आनंद होतो तसाच तिला झाला व ह्याहीवेळी तिने त्याला खुणेनेच ते दृश्य दाखविण्याचा प्रयत्न केला. रिक्षा पुढे गेल्यामुळे तो काही समुद्राचा तो कोपरा बघू शकला नाही. मग तिने त्याला सांगितले तिने काय बघितले जे तो बघू शकला नाही. पण तिने हे सांगताना शब्दांचा वापर न करता खाणाखुणांनी

सांगितले आणि जशा तिने खाणाखुणा  केल्या  तसे  माझे लक्ष तिच्या केसांमागे लपल्या गेलेल्या कानातल्या हिअरिंग एडवर गेले. मला एकदम धस्स झाले आणि एक सर्वसामान्य विचार माझ्या मनात आला, एवढी छान मुलगी आणि त्या बिचारीचे हे असे... नंतर माझ्याच एका सुधारीत मनाने म्हटले, बिचारी का, तिला बिचारी म्हणायला मी कोण सुपीरियिर आहे का? नाही... ती फक्त वेगळी आहे. आपण सगळे जसे एकमेकांपेक्षा वेगळे असतो तशी तीही... ह्या माझ्या मनातील कोलाहलात तो सुद्धा कधी खाणाखुणांत बोलायला लागला हे मला समजलेच नाही. दोघेही खाणाखुणा व हातवारे करून खूप काही बोलत होते... गप्पाच मारत होते. हसत होते, एकमेकांना टाळ्या 

देत होते. तो तिला चिडवीत होता, मग ती लाडिक लाजत होती आणि तिच्या लाजण्याने माझ्या चेहऱ्यावर छान हसू येत होते. मला फक्त एकच भीती होती, माझ्या मुलाने त्यांच्या संभाषणाविषयी काही विचित्र प्रश्न विचारू नये... 


माझ्या मुलाचे जसे त्यांच्या संभाषणाकडे लक्ष गेले तसे लगेचच त्याने मला प्रश्नार्थक नजरेने विचारले, मी हळूच त्याला नंतर सांगते असे समजावले खरे पण मला उगाचच असे वाटले की त्या दोघांमधल्या त्याला माझ्या मुलाचा प्रश्न समजला होता. नंतर मग त्याने तिला रिक्षेबाहेरचे लांब कुठेतरी काहीतरी खुणेने दाखविले बहुतेक देऊळ होते. मला तरी त्यांच्या खाणाखुणा हातवारेवरून तसेच वाटले. मग तिने विचारले वाटते आपण कधी जायचे, त्यावर त्याने काही उत्तर दिले. खरेच त्या दोघांचा संवाद शब्दांशिवाय किती परिपूर्ण होता. कधीकधी वाटते आपण उगाच शब्दांनी संवाद साधतो... आणि मग खरेच शब्दांमुळे आपण संवाद साधत असतो की शब्दांमुळेच त्याचा विसंवाद होत असतो. जणू काही माझ्या मनात आलेल्या विसंवादाच्या विचाराचे पडसाद उमटावे तसे त्या दोघांच्यात लगेचच एक छोटासा वाद झाला. तिने अचानकपणे आपल्या पर्समधील फोन काढून त्यातील काही दाखवून एका हातानेच काहीतरी खाणाखुणा करून त्याला विचारू लागली. त्यावर त्याने जोरजोरात हातवारे करून नाराजी दर्शविली. तिनेही मग रागावून फोन पर्समध्ये टाकला व ती रिक्षेबाहेर बघू लागली. फोनवरील काही गोष्टीवर त्याची नाराजगी होती की प्रवासात फोन काढला म्हणून, कोण जाणे पण लगेचच दुसऱ्या मिनिटाला आपला राग बाजूला सारून त्याने आपला फोन काढला व सेल्फी घ्यायला सज्ज ठेवला. तिच्या खांद्यावर त्याने हलकेच टॅप केले, तसे तिने हळूच मागे बघितले तसे त्याने लगेच सेल्फी काढला. सेल्फी 'कोडॅक मूव्हमेंट' ठरला आणि दोघेही परत हसून एकमेकांशी बोलू लागले. आपल्या खास शब्दांशिवायच्या शैलीत संवाद साधू लागले. आपल्या काढलेल्या सेल्फीवरून दोघेही परत हसून एकमेकांशी बोलू लागले. आपल्या खास शब्दांशिवायच्या शैलीत संवाद साधू लागले. आपल्या काढलेल्या सेल्फीवरून दोघे त्यांचा फोटो कसा आला आहे ह्यावर हातवारे, हावभाव करून बोलू लागले.


प्रवासातील काही मिनिटांच्या त्यांच्या त्या खास बोलण्याच्या शैलीच्या प्रेमातच जणू मी पडले. त्यांचे ते आपल्या शब्दांच्या बोलण्यातील भावांपेक्षा जास्त वेगाने स्पष्ट होणाऱ्या भावांमुळे की काय की, त्यांच्या हातवारे व हावभावांमुळे होणाऱ्या संवेदनशील संवादामुळे माहिती नाही पण मला ही त्यांची ती भाषा शिकायची इच्छा झाली आणि शिकल्यावर त्याचा वापरही करायची इच्छा झाली. माझ्या विचाराच्या नादात कधी आमचे डेस्टिनेशन आले कळलेच नाही. रिक्षेचा शेवटचा स्टॉप होता. ते दोघेही आमच्याबरोबर उतरले. मला उत्सुकता होती त्यांचा व्यवहार इतरांशी शब्दांशिवाय कसा चालतो हे जाणून घ्यायची. म्हणून मी मुद्दामच त्यांच्यानंतर पैसे द्यायचे ठरवून त्यांच्या मागे उभी राहिले. त्याने शंभरची नोट रिक्षेवाल्याच्या पुढे केली. रिक्षावाला नेहमीच्या उर्मट स्वरात म्हणाला “सुट्टे नाहीत. मला वाटले ह्याला समजले असेल का? आणि तेवढ्यात त्या दोघांमधला तो स्पष्ट आणि व्यवस्थित बोलला“अहो काका, माझ्याकडेसुद्धा सुट्टे नाही आहेत... मला आश्चर्याचा धक्का बसला... इतके आश्चर्य. वाटले की, त्या दोघांमधला तो, मला, “ताई, तुमच्याकडे सुट्टे आहेत का? विचारत होता ते ही लक्षात आले नाही.


माझ्या मुलानेच माझा हात हलवून मला खुणावले तेव्हा मला कळले, त्या दोघांमधला तो माझ्याशी शब्दांनी संवाद साधत होता, त्याने परत तेच विचारले. मी हो म्हणून त्याला सुट्टे दिले. त्याने छानसे हसून मनापासून थँक्यू म्हटले. मला तेव्हा जाणवले की त्याच्या कानात तर हिअरिंग एड नाहीच आहे. जाताना माझ्या मुलाच्या खांद्यावर हसून टॅप करून तो तिचा हात पकडून आपल्या मार्गाला लागलासुद्धा आणि मी मागं त्याच्याकडे आदराने एकटक बघत बसले. आपण किती जजमेंटल असतो ना, मला वाटले होते दोघेही एकसारखेच वेगळे आहेत... पण तसे नव्हते... खऱ्या अर्थाने त्या दोघांमधला तो तिला वेगळे मानतच नव्हता. तेच त्याचं तिच्यासाठीचं खरं प्रेम होतं. माझ्या मूलाने जो बराच वेळ त्याने त्याच्या पोटात दाबून ठेवलेला प्रश्न विचारलाच, “आई, ते दोघे असे का बोलत होते? त्यावेळी त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी आनंदाने तयार होते. मला आधी प्रश्नच होता की त्याला कसे समजावू, की असे बोलणारी माणसे आपल्यासारखीच असतात, फक्त वेगळी असतात जसे आपण सगळे एकमेकांपासून असतो तशीच... आणि त्यांच्यातल्या हातवाऱ्यांचा व हावभावांचा संवाद हा शाब्दिक संवादापेक्षा किती संवेदनशील असतो, ते ही कसे समजावू? पण त्या दोघांमधला तो च्या उदाहरणाने मला ते आता चांगलेच समजावता येणार होते आणि ह्याचाच आनंद मला झाला होता.


अशाप्रकारे टमटम रिक्षेच्या त्या काही मिनिटांच्या प्रवासात मी अनुभवलेल्या त्या शब्दांशिवायच्या संवादाने मला आयुष्य आनंदाने व प्रेमाने जगण्याचा एक वेगळाच मंत्र

मिळाला होता...


Rate this content
Log in

More marathi story from ऋतुजा आठल्ये काठे