माझ्या माहेरचा चौसोपी वाडा
माझ्या माहेरचा चौसोपी वाडा
पाच, सहा वर्षापूर्वी आम्ही सर्व बहिणी सहकुटंब माहेरी जमलेल्या ! माझ्या भावाच्या मनात आमच्या जुन्या घराच्या सपाट केलेल्या जागी मंदिर बांधायचा विचार होता म्हणून ती जागा पाहायला आम्हाला घेऊंन गेला... ती सपाट जागा पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि डोळे भरून आले.किती लहान असेन माहित नाही पण सुरूवातीचे जे काही बालपण आठवत असेल ते ओझरते बालपण...!
'उठा उठा हो सकळीक| वाचे स्मरावा गजमुख्| रूध्दी सिध्दीचा नायक| सुखदायक भक्तांशी||' माझ्या दादाजींचे आंधोळ उरकून तुळशीला पाणी घालाण्या साठी आलेले असतांना भुपाळीचे स्वर कानी पडले आणि पहाटेच्या साखर झोपेतून मला जाग आली. हळूच डोळे उघडले आळोखे पिळोखे देत नारळाच्या दोरीने विणलेल्या बाजेवर बसली....
माझ्या मोठया बहिणीच्या लग्नात गाडलेल्या सालईच्या डेरीला मस्त धुमारे फुटून त्याचे सुंदर वृक्षात रूपांतर झाले होते. त्या झाडावर शेकडोंच्या संख्येनी पोपट बसून किलबिलाट करत होती .पांढ़ऱ्या गुलाबाची वेल फुलांनी बहरुन आली होती ,पारिजातकाचा अंगणात सडा पडला होता . मोगऱ्याचा सुगंध वाऱ्यासोबत दरवळत होता .बोगनवेल आपली गर्द गुलाबी फुलं मिरवित दिमाखात उभी होती. गोठयात गाई वासरे बैल हंबरत होती.
माझ्या माहेरचा तो चौसोपी वाडा ! उन्हाळयात बैल बंडीनी झाडांच्या डहाळ्या आणल्या जायच्या . अंगणात मोठं मंडप टाकून त्यावर डहाळ्या टाकल्या जायच्या .सायंकाळी अंगणात सडा घालून त्यावर खाटा टाकल्या जायच्या . जेवण झाल्यानंतर गप्पा करत आजीच्या गोष्टी ऐकत तर कधी तारे मोजत निद्रेच्या स्वाधीन व्हायचो ते कळतही नसे.
उन्हाळयाच्या सुट्टीत आम्ही आठ बहिण भाऊ सहा चुलतभाऊ आणि आत्याकडे आलेले माझे मामेभाऊ एवढे सगळे लोक एका घरात राहत असू तसेच येणारे पाहुणे राऊळे! घर सदा भरलेले असायचे.
माझ्या त्या मोठया वाडयाला मोठा दिंडी दरवाजा असायचा त्याला डहेल म्हणत. एका बाजुला मोठा गाई ढोरांसाठी असलेला गोठा .त्यानंतर खुप मोठे अंगण . अंगणात तुळशी वृंदावन . आणि माझ्या काकांच्या हौशेनी बहरलेला बगीचा . काय नव्हतं त्यात पांढ़री शुभ्र फुलं लेऊन बहरलेली तघरी , बहरलेला पारिजात विविध प्रकारच्या बोगनवेली,विविधरंगी ,विविधढंगी गुलाबाची फुलं .पांढ़रीशुभ्र फुलं लेऊन बहरलेली .लांबदांडीचं लाल गुलाबी फुलं असलेली एक वेल असते तीला काय म्हणतात माहिती नाही पण आम्ही त्यांच्या वेण्या गुंफत असू . कृष्णकमळ रातराणी . फुलांनी ड्वरलेली . पांढ़ऱ्या गुलाबाची वेल मांडवावर अशी टाकली होती की,तीचं नाव तेच!केवडा,रातराणी,मदनमस्ताना शो ची एक ना अनेक झाड. माझ्या आईला व काकाला झाडाचं भारी वेड !
माझे वडील किर्तन करायचे दर कार्तिक महिन्यात दररोज पहाटे उठून आंघोळ करायची ,सगळयांनी काकड आरती करायची . कार्तिकी एकादशीला उपवास करायचा . रात्री भजनं व्हायची . पहाटे उठून आंघोळ करायची . काकडे पेटवून काकड आरती करून गावात दिंडी निघायची . घराघरांसमोर सडा रांगोळ्या टाकून पाट पाणी ठेऊन दिंडीचं स्वागत व्हायचं .नंतर घरी येऊन काल्याचं किर्तन व्हायचं .माझे वडील भावविभोर होऊन किर्तन करायचे . टाळ मृदुंगाच्या तालावर नाचायचो गुलाल ऊधळला जायचा आणि नंतर जेवणाच्या पंगती व्हायच्या मजा यायची. बाजुला मोठी वाडी होती. त्याच्यात आले,लसनाचे वाफे, कारल्याचे वेल,वालाचे वेल.
कोचई जीला अळू म्हणतात त्यांची झाडं ओळी करून लावलेली ,मुंगण्याचं म्हणजे शेवग्याचं झाड. त्याची त्या शेंगांची भाजी एवढी चवदार लागायची की अख्खं गाव शेंगा न्यायला यायचं . मोठया वाडीत कोचई म्हणजे अळूच्या पानांच्या पंचवीस तीस मोठया मोठया ओळी ! कोणीही या आणि पानं घेऊन जा . सीताफळाच्या झाडाचे घराला एका बाजूला कुंपण.मागच्या अंगणात चिंचेची मोठी मोठी झाडं, त्याच भागात आणि समोरही अडुळसा च्या छोट्या झुडपांचे कुंपण.बासाची झाडं.सगळयात शेवटी मोठी विहिर. उन्हाळयात विहिरीचं पाणी आटत होतं म्हणून सर्वच बहिण भाऊ चार वाजेपासून विहिरीवर पाणी भरायला जायचो.
आमचं घर म्हणजे जंगी राजवाडाच ! सुरूवातीला मोठा ओपन स्पेस आपण ज्याला गॅलरी म्हणतो . तो पण त्याची कल्पना होऊ शकत नाही एवढा... हॉलच्या भिंतीवर माझ्या काकांनी केलेली सुंदर पेन्टींग! त्याच्यामुळे हॉलला अनोखं सौंदर्य लाभलेलं . एका बाजूच्या भिंतीवर ज्ञानेश्वरी मधील उद्बोधक वचन लिहिलेले ' अगा वेदवदू जरी झाला, माते नेणता वाया गेला, कणू सांडूनी उपनिला, कोंडा जैसा| '
समोर मोठा तक्तपोष . वर सागाची पाटण ठोकलेली . साईडनं काढलेला जिना तेथून वर जायला पायऱ्या . वर मोठया ,मोठया धान्य साठवायच्या ढोल्या. धानापासून ते तुरीपर्यंत ,जवसापासून ते तिळापर्यंत धान्य त्यात साठवलं जायचं डाव्या बाजूला काकासाठी एक घर. त्यानंतर झोपायची खोली, डाव्या बाजुला मोठं देवघर उन्हाळ्याच्या दिवसात थंडीसाठी झोपायची हक्काची जागा. कारण त्यावेळी पंखे ,कुलर नसायचे पण ए. सी ला लाजवेल अशी थंड जागा ! त्यानंतर ऐसपैस जेवणाची खोली, डाव्या बाजुला वर्षभराचं धान्य साठून राहिल एवढं कोठी घर, त्यातच वर्षभरासाठी साठवलेले कांदेसुद्धा राहायचे. उजव्या बाजुला स्टोअररूम जिच्यात शेतीचे पूर्ण सामान घमेले ,पावडे कुदळ ,दोरे ,दावणी,पोते,कुक्कुस,ढेप बरंच काही सामान राहायचं.
त्यानंतर मग स्वयंपाक घर . तीथे लाकडाच्या पाट्या टाकून केलेली कपाटं त्यावर मातीची भांड़ी छान रचलली कारण तेव्हाचा स्वयंपाक मातीच्या भांडयातच व्हायचा आणि जेवण कास्याच्या ताटात . चुलीवरचा स्वयंपाक आणि जेवण कास्याच्या ताटात. पुरुष मंडळी आणि बच्चे कंपनी आधि जेवायला बसत आणि बाया वाढायच्या नंतर आई,काकु माझी बहिण वगैरे महिला मंडळी .पण जेवण करायच्या आधी हरिपाठ आणि आरती करायला लागायची. त्याआधी संध्याकाळचं जेवण मिळायचं नाही. माझे वडील आणि काका यांना तबला पेटी वाजवता यायची मग आम्ही सगळी मंडली तबला पेटीच्या तालावर नाचत नाचत अंगणात हरिपाठ करायचो . मोहोल्ल्यातले ही लोकं यायचे हरिपाठ आरती करायला ....!
पसायदान झाल्यानंतर प्रसाद घेऊन सगळयांना नमस्कार करून मग जेवण्याच्या पंगती! स्वयंपाकघराच्या डाव्या बाजुला लांब मोकळी जागा होती तीथे ढेकणी होती ढेकणी म्हणजे धान दळून झाल्या नंतर कांडायचा काम करणारा आडवा मुसळ . माझ्या वडिलांनी दगडाचा मोठा जाता आणला होता. जात्यावर धान दळून झाल्यावर कांड़ीवर आम्ही मुलं एक पाय मागे आणि एक पाय समोर करून कुदत होतो. वर हात धरायला दोर बांधलेला असायचा छान मजा यायची. मागे न्हाणीघर, आंघोळीसाठी पाणी तापवायसाठी चुल, सकाळचा स्वयंपाक सुध्दा त्या चुलीवरच व्हायचा . मागचं मोठं अंगण माझी आई लख्ख सारवून ठेवायची.
उन्हाळ्याच्या दिवसात रेडिओवरच्चा बातम्या ऐकत,बालविहार ऐकत माझी आई बहिण स्वयंपाक करायची. आणि आम्ही बच्चेकंपनी गावठी आंब्याचा रस करायरायसाठी आंबे गुलवायचो. त्यासोबत कधी शेवया तर कधी ज्वारी आणि तांदळाचं पीठ उकळून केलेल्या मऊ,मऊ माकोन्या पोळ्या खायसाठी कंदिल किंवा गॅसच्या उजेडात मोकळ्या आभाळात पंगत बसायची .
गेले ते दिवस, उरल्या त्या आठवणी! आता आम्ही सर्व सुखसोयींनी युक्त अशा घरात राहतो. पंखा, कुलर,ए. सी. हाताहाताशी नळ, मनोरंजनाची साधनं पण पण हातांनी बनविलेले बाण, खेळलेल्या रामलीला आणि तो चौसोपी वाडा याची सर कशालाच नाही. त्या आठबणी डोळ्यासमोरून हलत नाही.
