आभार मानायचे राहून गेले
आभार मानायचे राहून गेले
मी चार ,साडे चार वर्षाची असेन माझी मोठी बहिण दिवाळीच्या सुट्टीत गावाला आलेली .माझी आई बहिण यांच्या मला शाळेत नेऊन देण्यासाठी चाललेल्या गोष्टी माझ्या कानावर आल्या. मी सकाळपासून लपून बसली. पण दुसऱ्या दिवशी माझ्यावर पहारा बसला आणि दुसऱ्या दिवशी मला शाळेत सोडलं गेलं . मी अगतिकपणे शाळेत जायला लागली. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षात मी पहिला वर्ग पास झाली .
माझी मोठी बहिण उन्हाळा,दिवाळीत यायची . मग गोंदियाला जायची त्यादिवशी आम्ही त्यांची परत येण्याची आतुरतेने वाट पाहत असू कारण आमच्यासाठी नविन कपडे येणार असत .आम्ही आठ बहिण भाऊ पण सगळयांसाठी ती कपडे घेऊन यायची.
माझी बहिण लग्नानंतर बारा वर्षानी गरोदर राहिली . डिलीव्हरीसाठी आमच्या गावाला आली . मला ती आपल्यासोबत झोपवायची. अक्रोड,बदाम वगैरे खायची ती मला पण द्यायची . तीचं आमच्या गावाला येणं म्हणजे आम्हाला दिवाळी दसरा . उन्हाळ्याचे दोन महिन्यांच्या सुट्टया आमच्याच घरी राहायची तीला कपड्यांबरोबर छान छान खाण्याचे पदार्थ बनविण्याचीही आवड होती.त्या दोन महिण्यात आम्हाला एवढे सुंदर पदार्थ खायला मिळत आम्हाला हे दिवस संपुच नयेत असं वाटायचं .
मग त्यांचा गावाला जायचा दिवस यायचा. खुप वाईट वाटायचं. घरून निघतांना ती आम्हाला पैसे दयायची. आम्ही सगळेच त्यांना सोडायला बसस्टॉपवर जायचो शेवटची बस सहा वाजेची राहायची. बस येऊच नये अशी मनात ईच्छा राहायची पण बस यायची आणि ती सगळयांसोबत गावाला जायची. आणि घरी आल्पावर एक दोन दिवस तरी उदासवाणी कळा यायचीं
दहावी झाल्यानंतर तर मी शिकायला तिच्याचकडे गेली . ती धिरगंभीर आणि शांत होती आणि तरीही आम्ही तीला खुप घाबरत होतो. मी दिसायला सुंदर होती माझ्या जिजाजीला वाटत होतं की हीला आर्टस घ्यायला लावायचं आणि छान घरी लग्न करून दयायचं पण तीनी सांगीतलं की माझ्या प्रत्येक बहीणीनी स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं . आणि मला बी. एस.सी. ला टाकलं . मी एम. एस. सी. बी. एड. झाली आणि तीला खुप आनंद झाला.
दरम्यान ती किडनीच्या आजारानी ग्रस्त होती . तीला तीचं मरण माहिती होतं. तरी शांतपणे आफ्ले सर्व कार्य शांतपणे करत होती . माझ्या भावाच्या लग्नाची खरेदी . त्याच्या लग्नकार्यात शांतपणे भाग घेत होती .आमच्या दोन बहिणीच्या लग्नासाठी नाकातले,कानातले अंगठया, सोफे सगळे करून ठेवले होते.
बाविस फरवरी एकोणीससे ब्यान्नऊ ला ती मरण पावली . त्पानंतर लगेचच माझ्या बहिणीला नोकरी लागली ,माझं लग्न झालं मला नोकरी लागली पण हे पाहायला ती न्हवती .
आजकालच्या मुलांचं मला भारी कौतुक वाटतं . त्यांच्या मनात काय आहे हे ते पटकन सांगुन टाकतात . आय लव्ह यू पप्पा . आय लव्ह यू मम्मा. पण आमच्या पिढीला व्यक्त व्हायला जमलंच नाही .पण वाटते आपणही व्यक्त व्हायला पाहीजे .जमेल तसं .
खुप धैर्य लागलं हे सगळं पचवायला . आमचं यश पाहायला ती नव्हती .बोलता आलं नाही कधी सांगताही आलं नाही आभार मानायचं नव्हतं कधीच ,तरी आभार मानायचं राहून गेलं .
