माझे गाव... एक आठवण
माझे गाव... एक आठवण
माझे गाव म्हटलं की जुन्या आठवणी नवीन होतात.
माझ्या गावातील एक सदगृहस्थ, गुरुजी, आदर्श व्यक्ती, संगीत तज्ञ, व्याख्याते असे बहू आयांमी रावजी चे व्यक्तिमत्व होते. ते त्यांच्या घरा समोरील मोकळ्या जागेत हात बगीचा लावीत. स्वतः कुदळीने सारे आवार खोदून काढीत. उन्हाळा आला की त्यांचे सकाळी एक कप चहा घेतला की हेचं कामं करायचे. रोज रोज थोडे थोडे खणत. असे दोन तीन महिने चाले. रस्त्यावरील जाणारे येणारे लोकं त्यांना म्हणत... काहो गुरुजी! तुम्ही काय वाघिणीचं दूध प्यालेत कां? एवढे कष्ट करता!घाम जाई पर्यंत! तुमचं कामं फक्त शिकवणं! असायला पाहिजे! पण तुम्ही शाळा, शिकवणी, संगीत शिकवणी, रात्री भजन... एवढे सारे करून सकाळी हे कष्टाचं कामं कां करता!अहो पांडोबा!विठोबा, कृष्णराव!मला हे कामं आवडते! म्हणुन मी हे करतो. पाऊस आला की तूर, भेंड्या, दोडके, भोपळे, कोहळा,कापूस, मका, अंबाडी, मूग हे सगळं थोडं थोडं पीक आलं ना की.... मला खूप समाधान होतं. तसेच हे सर्व आम्ही घरचे तर खातोच पण लोकांनाही वाटतो!त्यातुन पण आम्हा दोघांना फार समाधान मिळते. मी खुदाई करून बी लावतो. घरची लक्ष्मी शारदा,त्या पिकातील तण काढते. किती वेळा तिला विंचू चावला.. खुरपणी करताना... पण ती बिनधास्त आपले कामं करते, घरचही कामं तीच करते! इतक्या मोठया घराचं सारवण, सडा, रांगोळी, कपडे, धुणे,विहिरीचे पाणी काढणे.. कितीतरी कामे ती स्वखुशीने करते!
तिला शिलाई कामं सुद्धा येते. मुलांचे, माझे कपडे तीच शिवते. दोघेही आम्ही आमचा वेळ कारणी आणि कामी लावतो.. हेचं आमच्या जीवनाचं ध्येय समजा!त्यात काही मोठेसे आम्हाला तरी वाटत नाही. इतक्यात "गुरुजी हमको अर्जी लिखाके देव जी!"असा आवाज ऐकला आणि रावजी बैठकीकडे आले. एक भंगी अर्ज लिहून मागत होता. त्याला बैठकीत बस, मी आलोच असे सांगून... रावजी हातपाय धुण्यास गेले. भंग्याच्या हातातील कागद वाचून टाक दौत घेण्यास रावजी आत गेले. आणि भंगी ला पण आत बैठकीत बसण्यास सांगितले. तो भंगी बिचारा मी बाहेर खाली बसतो म्हणाला पण गुरुजी ने बोलावलं म्हणुन दारातील पाय पुसायच्या पोत्यावर बसला. लक्ष्मी ने नेहमी प्रमाणे एक कपबशीत चहा आणला. त्याला दिला. त्यांची ती आदरांतिथ्या ची पद्धतच होती. कोणीही येवो. चहा तर द्यायचाच!
बाहेरून पांडोबा, विठोबा बघत होतेच. आपसात कुजबुजत होते.. भंगी ला आत बसवलं गुरुजींनी!अरेरे! आणि चहा पण दिला कपबशीत!भंगी ने गुरुजींनी लिहून दिलेला कागद घेतला आणि निघाला.
पांडोबा, विठोबा आत आले.... त्यांची रास्त शंका गुऊजींना विचारली!म्हणाले तुम्ही भंग्याला लागले. त्याला चहा पण दिला त्याला! तुम्हाला चालतं! तुम्हाला बाट नाही होतं! शिवाशिव पाळत नाही तुम्ही? एकामागे एक प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती.... त्यावर शांतपणे रावजी म्हणाले "बसा!मित्रांनो '!... आहो मी सर्वांना माणूस म्हणुन बघतो. तो कुठले कामं करतो हे पाहत नाही. मी प्रत्येकाचा आदर करतो. आज त्याला मान दिला तर उद्या तो आपल्याला मानानेच बोलेल. प्रेम द्यावे आणि प्रेम घ्यावे सुद्धा. माझी देवा पेक्षा माणुसकीवर श्रद्धा आहे.माणसातच मी देव पाहतो.
माझ्या गावात एक मठ आहे. त्यातील मठाधीपती ना भेटण्याचा योग आला. रावजी सांगत होते. आमच्या शाळेतील चार मास्तर लोकांना घेऊन मठाधीपती च्या दर्शनाला गेलो. पण मलाच दर्शन लाभ झाला. बाकीच्यांना अस्पृश्य म्हणुन दर्शन लाभ झाला नाही. मला वाईट वाटले. पुन्हा मी मठात गेलो नाही.
असे लोकं आणि लोकांना समजावून सुसंस्कृत करणारे शिक्षक.
एक श्रावण महिन्यात गावात यात्रा असते. काठीची यात्रा म्हणतात त्याला. ती काठी जाड आणि खूप लांब असते. तीला मठातून वाजत गाजत बालाजी मंदिरात म्हणजे माहेरी आणतात. ती तेथे एक महिना राहते. त्या प्रित्यर्थ ती काठीची यात्रा असते. दर सोमवारी ती भरते. खेडयापाड्यातील लोकं त्या यात्रेत येतात. आणि मनसोक्त खरेदी करतात. मुलांना खेळणी, आकाश पाळणे, घोड रपेट... असा विरंगुळा मनोरंजन असते.
एक रेल्वे स्टेशनं आहे. येथून अचलपूर मूर्तिजापूर गाडी जाते. तिला शकुंतला असे नाव होते. दोन बस स्टॅन्ड आहे. एक नवे, एक जुने, आमराई, पानाचे मळे, बगीचे हे सर्व गावाची समृद्धी म्हणवी लागेल. समजूतदार लोकांचे गाव.. असं आमच्या गावाला पुरस्कार मिळाला आहे. सेवाभावी लोकांमुळे आमचे गाव चारी दिशेला नाव मिळवून आहे.
माझ्या गावात चार शाळा, एक कॉलेज आहे. शाळेतील शिक्षक मनःपूर्वक ज्ञानार्जन करतात. शाळेचा निकाल 100%लागतो. निकाला मुळे माझ्या गावची शाळा आजूबाजूच्या परिसरात नावाजलेली आहे. शाळेतील कित्येक मुले उच्च पदस्त आहे. शाळेला भेट द्यायला आवर्जून येतात. त्याचं प्रमाणे कॉलेज सुद्धा प्रसिद्ध आहे. माझ्या गावाची शान म्हणजे तेथील संस्कारी लोकं, नावाजलेल्या शाळा, कॉलेज, स्वच्छ दवाखाने, स्वच्छ रस्ते, लोकं हितकारक शिक्षण संस्था, वाहती निर्मळ शरनिरा नदी...बोरळ गणपती,राम, महादेव, अन्नपूर्णा असे मोठे देवालये... जे माझ्या गावाचं वैभव आहे. त्यामुळेच गावाला समृद्धी, सुख मिळत आहे.
