ललित लेख
ललित लेख
समोर एक निर्वात पाकोळी आणि आपण भिरभिरत राहतो एखादया पाचोळ्यासारखे
शेवटी आयुष्य म्हणजे काय प्रिय?
ह्या ब्रम्हांडगोलात फिरणारे अनेक तारे त्यांना तरी
त्यांचं अस्तित्व कुठे ठाऊक असते कुठल्यातरी वैज्ञानिक गोष्टीने निर्माण झालेले ते ग्रह तारे, अस म्हणतात प्रिय त्या ग्रहांचा आपल्या जीवनाशी अतूट सबंध असतो, मग तुझं आणि माझं काय रे...?
प्रिय व्यक्तीचा किती आधार असतो हे सांगूनही समजणार नाही तो जर नसला तर आपण पांगळे होत जातो, कुणी तरी आपल्याला प्रिय आहे पण लौकिक दृष्टीने वेगळेपण जेव्हा जपावे लागते तेंव्हाची मनाची अवस्था कशी कोण शब्दात मांडू शकेल रे...?
प्रत्येक माणसाला स्वतःच एक वेगळे ठिकाण हवे असते जिथे मनाला रिक्त होण्यासाठी मुक्त अवकाश, पण ते अवकाश प्रत्येकाला कुठे मिळते ज्याला मिळते ते खरच भाग्यवान, आयुष्याच्या आर्त वळणावर अनेक पायवाटा आपल्या पावलाशी येवून भेटतात बऱ्याचश्या अगम्य अशा , अशाच त्या पायवाटेवर तुझी भेट झाली आणि एखाद्या चांदण चुऱ्या सारखी ती रात्र, ती पायवाट बैचेन करत गेली, न उमगणाऱ्या अनवट सुरावटी सारखी आयुष्याला बिलगून राहिली जणू अवघे ते निळे कुसंबी अवकाश माझ्या काळजात उतरून आले, खरच नियतीचा हिशोब वेगळाच असतो अनेक शक्यता अशक्यतेच्या पल्याड जाऊन अनामिक बंध अलगद तयार करण्यात त्या नियतीचा खरच मोठा हात आहे.
खरंतर लौकिक अर्थाने संसार होत आहेच पण बैचेन या मनाचा कुठला पथ असेल, आतून आतून व्याकुळ होवून कर्तव्य धर्माचे पालन होतेच, कोरड्या नातेसंबंधात कोण आणि किती काळ झोकून देणार, काळजाची स्पंदन भाषेशीवाय समजत नाहीत अन भरलेल्या संसारात सगळे असून रितेपणाचे जे आभाळ वाट्याला येते ना त्या आभाळाची व्यथा कोण जाणणार....?
तसे तर प्रिय, तुझा माझा रस्ता एक होणारा नाहीच पण त्या कवडश्या मधून झिरपलेल्या चांदण चुऱ्याची ती रात्र मनावर गोंदण बनून ठसून राहिली, त्या चांदण रात्रीने आपल्यावर घातलेली विश्वासाची शाल, आतुरता, एकमेकांना समजून घेण्याची ओढ...
एखाद्या निळ्या नितळ तळ्यात आपल्याच प्रतिबिंबाची सरमिसळ व्हावी तसे आपले नाते एकमेकांत मिसळून गेले.
तुला माहीत आहे प्रिय... चांदण्याना हात लावायला जावे आणि अख्खी पौर्णिमा दारात उभी राहावी यापेक्षा नियती तरी अधिक काय देणार रे? अनेक संवेदना मनाच्या डोहात अव्यक्त रुपात पहुडल्या असाव्यात पण त्यास तळ सापडू नये नुसते चाचपडत राहावे आणि एक सत्य ओठांच्या पाकळ्यात कायमच बंदिस्त राहत, ते चांदण प्रत्येकाच्या आयुष्यात भरभरून काही तरी देतच राहत पण ओंजळीत किती चांदण गोळा करायचे ते फक्त नियती ठरवत असते.
रखरखीत चैत्रातला लालबुंद गुलमोहर, वसंतातील फुललेला पळस आणि शिशिराचे चांदणे किती भावोत्कट असते ना आयुष्याचे हे देखणेपण, आपण ही असोशीने जपतच असतो हे देखणेपण एखाद्या पाऱ्यासारखे निसटून जाऊ नये म्हणून जीवापाड प्रयत्न करतो पण ते हळूहळू निसटतच जाते आणि पावसाळ्यात कधी कधी कोरडे घन दाटून राहतात ना तसेच एखाद्या संध्याकाळी चुकार एखादा पक्षी चुपचाप बसतो एखाद्या डहाळीवर तसेच मन पण चुपचाप होत जाते आयुष्याच्या मध्यान्ही... ही हुरहूर हे जगणं भावविश्व समृद्ध तर करत गेली
पण त्यासाठी काही पायवाटेवरचे काटे पण सोबत घ्यावे लागले, प्रिय तुला कधी एकट वाटत का? वाटत असणारच, तू कितीही व्यस्त असलास तरी हे एकटेपण कधीं ना कधी जाणवतच असणार, काही वेळेस शब्दांच्या कुबड्या पण कुचकामी होत जातात आणि मौनच आपला सोबती होवून आसपास वावरत असते.
आपण कुणाच्या तरी जवळ आहोत ही भावना आयुष्य समृद्ध करायला पुरेशी असते, तेंव्हा लौकिक अलौकिक पणाच्या साऱ्या सीमारेषा धूसर होत जातात, हे उत्कट निखळ नाते अनोळखी पणाच्या कित्येक वाटा ओलांडून एक विश्वास तेथे पेरत जातो, अनावर भावनांचा प्रवास म्हणून एकत्र येणे साहजिक आहे, पण फक्त एकत्र येणे म्हणजे प्रेम असे असेल तर तो निव्वळ मनाला फसवण्याचा खेळ आहे, जगात ज्यावर जीव लावावा अशी जर व्यक्ती सापडली तर आयुष्य एक सुरेल सुरावट होत जाते, ज्यावर प्रेम आहे त्याचे देखील निस्सीम भावना जर असेल तर ठीक नाहीतर दडपणाने प्रेम म्हणजे फक्त एक शोपीस बनून राहते.
आज मुक्तपणे तुझ्याशी बोलायचे ठरवले होते, जे लिहले ते तर तुला समजलेच पण जे नाही लिहू शकले ते पण तुला समजले असणारच म्हणा..
तसे आता आपण एकमेकांना बरेच ओळखू लागलो आहोत....
तसा तर फार थोडा सहवास दोघांना लाभला पण धुक्यातील ह्या पायवाटेवर आपली पावलं सोबतच असणार ही खात्री मात्र आता आहे, तुझ्या स्पर्शाचे सारे अदृश्य ठसे प्रत्येक ऋतुबरोबर आहेतच...
पुन्हा एकदा साऱ्याच आठवांची गोळाबेरीज केली असता तुझे पारडे जडच वाटले, या आठवणीच दहिवर सकाळच्या दवा बरोबर ओल करत जात आणि त्या दवाच्या चकाकणाऱ्या रांगोळीत मन रेंगाळत राहते..
ह्या स्वप्नाच्या लयीत बेभान होत जावे, विचार करण्यातच जर हे क्षण जाऊ लागले तर आयुष्य असेच निघून जाईल, ह्या आयुष्याच्या सोपनावर एक पायरी तुझी माझी असावी जिथे काही क्षण तरी आयुष्याचे सोबत नांदावेत.
जीवनातल्या या चैतन्यदायी वाटेवर प्रत्येक क्षणावर प्रेम करतो म्हणून नियतीने पण काही चांदण्याच्या ओंजळी आपल्या पायवाटेवर रित्या केल्या आहेत...
हा चांदणचुरा ही पायवाट प्रत्येकाच्या नशिबात असतेच फक्त वाट एवढीच बघायची असते की नियती आपणास कधी त्या पायवाटेवर आणून सोडते आणि आपण तो चांदणचुरा आपल्या ओंजळीत किती सामावून घेतो ते...
बाकी प्रिय तो चांदणचुरा कुणाला दाहक वाटतो तर कुणाला शीतल हे तर आपापल्या संवेदनेवर अवलंबून असते ना...
