madhavi nd

Others

3  

madhavi nd

Others

बंद पडलेले घड्याळ

बंद पडलेले घड्याळ

7 mins
352


आबा आरामखुर्चीत पडल्या पडल्या भिंतीवरच्या त्या जुन्या घडयाळाला पाहत होते, ते लहान होते तेंव्हापासून ते हे घड्याळ पाहत होते, त्यांच्या आजोबांनी कुठून तरी ते आणलं होतं, अगदी राणीच्या काळातील होते ते, म्हणजे इंग्रजांच्या काळातले त्याच्यावरची तारीख त्याच्या मागच्या साईडला होती आठ जून अठराशे नव्वद.... आबा मोठे झाले, त्यांचे लग्न झाले, तेंव्हाही ते चालू होते, आबांचे वडील दादासाहेब दर महिन्याला त्याची साफसफाई करत, त्याला तेल वैगरे लावत, आणि ते बेटे आरामात चालत राही, पण नंतर दादासाहेब गेल्यावर मात्र आबांना त्या घड्याळाकडे लक्ष देणे झाले नाही, पहिले पहिले काही दिवस त्यांनी साफसफाईचा खटाटोप केला, पण नंतर आज करू उद्या करू अस म्हणत म्हणत ते घड्याळ कधी फक्त भिंतीवरचे शोपीस बनून राहिले हेच कळले नाही, शिरीष त्यांच्या मुलाने खूप छान इलेक्ट्रॉनिक घड्याळ आणून हॉलच्या दर्शभागी लावले व ह्या घड्याळाला मस्तपैकी एक काचेचे फर्निचर बनवून त्यात बंदिस्त केले कायमचे.. एक अँटिक पीस बनून ते घड्याळ आता हॉलची शोभा वाढवत आहे... आबांना असा विचार करता करताच डुलकी लागली, ते तिथेच झोपी गेले... स्वप्नात त्यांना ते घड्याळ, जुना वाडा अस बरच काही दिसत होते... त्या स्वप्नातच कोणीतरी


 "आबा... आबा" अस कोणीतरी हाक मारत होते... झोप व जागेपणाच्या सीमारेषेवर ताटकळत आबांनी महत्तप्रयासाने डोळे उघडले... तर समोर घरातील काम करणारा नौकर उभा होता... आबांना त्याचे नाव आठवेना... 


 "काय बर ह्याचे नाव... ?" 


मग एकदम त्यांना नाव आठवले... अरे हा सुरेश, आपल्यासाठी शिरीषने त्याला नौकरीवर ठेवला आहे. आपले औषध पाणी, जेवणाच्या वेळा सार काही तोच बघतो... सुनबाई मोठ्या ऑफिसमध्ये कामाला त्याच येतात सात आठ वाजता, शिरीष नेहमीच टूर निमित्ताने बाहेरगावी, "हं" पण आला की पाच मिनिटांसाठी येऊन विचारपूस करून जातो, बाकी दोन्ही नातवंडे बाहेरगावी होस्टेलवर त्या कुठल्या महागड्या शाळेत घातलाय त्यांना, त्यामुळे वर्षातून एकदा दोनदाच दर्शन घडते त्यांचे विठुराया सारखे.... हे एवढे मोठे घर पण घरात माणस इनमीन तीन, बाकी सगळे नौकर, प्रत्येक कामाला... सौ तर कधीच वर गेल्या पण आमचा आत्मा हा देह काही सोडेना... असे विचार येत असतानाच सुरेश म्हणाला..


"आबा, चला जेवायची वेळ झाली"आबा हळूच उठत म्हणाले,


 "अस म्हणतोस, चल तर मग... सुनबाई आल्या का..?" सुरेश त्यांचा हात पकडत म्हणाला,


"नाही जी! अजून नाही आल्या" आबानी ऐकून मान हलवली व ते डायनिंग हॉल मधे गेले, तिथे लांबलचक टेबलवर फक्त त्यांचे एकट्याचे ताट वाढले होते, त्यांना एकदम एकटे एकटे वाटू लागले, जेवायची इच्छा होईना... पण गोळ्या घ्यायच्या म्हणून त्यांनी कसेतरी दोन घास चिवडले, मग गोळ्या घेऊन बाहेरच्या लॉन वर आले, हळूहळू शतपावली घालत असताना एकदम गाडीचे डोळे चकाकले, आबांनी तिकडे पाहिले, 


"सुनबाई, आल्या वाटत.. आजकाल ह्या बऱ्याच उशिरा येत आहेत घरी, पहिले निदान सात किंवा आठच्या ठोक्याला येत असत, पण प्रोमोशन झाल्यापासून दर दोन दिवसाला उशिरा येत आहेत, हुशार आहेत सुनबाई, गोल्ड मेडिलिस्ट" आबांच्या मनात सुनबाई बद्दल अपार माया व अभिमान दाटून आला...


" काय करता आबा, जेवण झाले का.."सुनबाईने आत येता येता विचारले


"हो, आत्ताच झाले, तुम्हाला बराच उशीर झाला, दहाचा ठोका पडला इतक्यात.."


"हो आबा, मिटिंग व डिनर होते त्यामुळे उशीर झाला, बर तुम्ही पण झोपा आता, गारठा वाढला आहे, उगाच थंडीत फिरू नका" अस म्हणत सुनबाई आत गेल्या, 


"आजकाल फार चालवत पण नाही, पहिले एका तासात सात आठ किलोमीटर चालून यायचो... शेतात किती चकरा व्हायच्या, सात आठ पोळी शिवाय जेवण व्हायचे नाही, आता एक पोळी पण जड वाटते, चालायचंच वयोमानानुसार बदल व्हायचाच.." 

अस मनाशी म्हणत आबा पुन्हा आत आले, सुरेशने त्यांना बेडरूममध्ये सोडले...


"आता झोपा आबा, उगाच विचार करत बसू नका" सुरेश त्यांच्या अंगावर पांघरूण घालत म्हणाला


"हो रे... पण झोप तरी कुठे येते एवढया लवकर.." सुरेश काही बोलला नाही, त्याने छोटा झिरो लाईट लावला व तो गेला...


दूर कुठूनतरी भजनाचा आवाज येत होता, तो ऐकत ऐकत आबांचा डोळा लागला... स्वप्नामध्ये आबा कुठल्यातरी देवळात हातात चिपळ्या घेऊन उभे होते... अचानक घशाला कोरड पडली म्हणून आबांना जाग आली, त्यांनी उठून शेजारच्या टेबलवरून जगमधले पाणी ओतून घेतले... ते पुन्हा पांघरुणात शिरले, पण झोप येईना त्यांना काही बाही आठवू लागले, लग्न झाले तेंव्हा शिरीषची आई फार तर सतरा वर्षाची असेल... नाजूक, शेलटा बांधा, बघायला गेलो तेंव्हाच ती खूप आवडली होती.. लग्न करेन तर हिच्याशीच असे घरी सांगितले, ती कोकणस्थ म्हणून आईचा थोडा विरोध होता, पण आपला हट्ट म्हणून ती शांत बसली, ही लग्न करून आली, व आपल्यातील एक कधी झाली ते कळलंच नाही, आपले रीतिरिवाज, सण, वार

निगुतीने केले, आईचा तापट स्वभाव, बाबांची वेगळी तऱ्हा सार सार हसतमुखाने निभावल, शिरिषचे लग्न झाले, पहिल्या नातवाचे तोंड बघितले व सोन्याची फुल अंगावर उधळून घेतली व अनंताच्या प्रवासास मला एकट्याला सोडून गेली..." नंतरच्या स्वप्नात शिरिषची आई पैठणी घालून मिरवताना दिसत होती....


"आबा... ओ आबा, उठा आता आठ वाजले"


सुरेश हाका मारत होता, आबा डोळे चोळत उठून बसले...

नाश्ता वैगरे करून आबा बाहेर हॉल मध्ये आले व त्यांचे लक्ष त्या जुन्या घड्याळाकडे गेले... त्यांना काय वाटले कुणास ठाऊक, त्यांनी ते घड्याळ सुरेश कडून काढून घेतले व आपल्या बेडरूममध्ये नेले, मग सुरेशकडून स्क्रू ड्रायव्हर, एक फडके, तेल असे सर्व मागवले व ते घड्याळ साफ करण्याच्या उद्योगाला लागले, घड्याळ साफ करता करता त्यांना वडील कसे घड्याळ साफ करायचे ते आठवले, त्यांनी त्याप्रमाणे ते साफ केले, मनासारखी साफसफाई झाल्यावर आता त्यांनी ते चालू करून पाहिले पण ते चालू होईना, त्यांनी सुरेशला बोलावले, त्याच्याकडून पण ते चालू होतं नव्हते, आता त्यांना ते घड्याळ चालू केल्याशिवाय स्वस्थ बसवेना...

त्यांनी सुरेशला सोबत घेतले व जुन्या बाजारात गेले, त्यांना तो जुना घड्याळ नीट करणारा रहीम चाचा आठवला...एकदा लहानपणी हे घड्याळ असेच बंद पडले होते, तेव्हा त्यांच्या वडिलांनी रहीम चाचाना बोलावले होते, चाचानी त्या घडाळ्याशी खटपट करून अर्ध्या तासात नीट केले होते, त्यानंतर ते बेटे कधी बंद पडले नव्हते, बस त्याला वेळच्यावेळी तेल पाणी केले की काम झाले...त्यांची गाडी अख्ख्या जुन्या बाजारात फिरून थकून गेली पण त्यांना रहीम चाचाचे दुकान सापडेना, सुरेश वैतागून गेला, 


"आबा चला आता घरी, अहो ते रहीमचाचा गेले असतील अल्ला घरी, आणि सर्वच तर बदललं आहे इथले, तुम्हाला नीट पत्ता पण नाही माहीत, कस काय सापडणार त्यांचे घर, दुकान तुम्हाला..?"


आबा नुसते ऐकून घेत होते, पण त्यांची नजर त्या लिंबाच्या झाडाला शोधत होती, त्या लिंबाच्या झाडाखालीच तर चाचाचे हिरव्या रंगानी रंगवलेले दुकान होते.., आबाना एवढीच खूण माहीत होती... आता संध्याकाळचे चार वाजायला आले होते, आता आबा पण कंटाळले, सतत दोन तास ते दुकान हुडकत फिरत होते, त्यांनी गाडी घराकडे घ्यायला सांगितली, व बाजारातून बाहेर पडतानाच त्यांना एक हिरव्या रंगाचे दुकान दिसले, त्यांनी गाडी थांबवली, सुरेश दुकानात गेला, तो वापस येत असताना त्याच्यासोबत एक जाळीची टोपी घातलेला, मध्यमवयीन माणूस येत होता, त्या माणसाने जवळ येऊन कुर्निसात केला, व म्हणाला,


"बोलो चाचा, क्या हुवा..? क्या दुरुस्त करना है..? मै रहीम चाचा का लडका सुलेमान.. अब्बू का इंतेकाल होके चार पांच साल हो गये..."


आबा त्याच्या चेहऱ्यात रहीम चाचाला बघू लागले, मग सुरेशने त्याला ते घड्याळ दाखवले... सुलेमानने ते घड्याळ उलटे पुलटे करून पाहिले व म्हणाला,


"बहोत पुरानी चीज है, दुरुस्त करने के लिये टाइम लगेगा, एक दो दिन लगेंगे, ठीक है ना..?


आबांनी मान डोलावली, व ते घराकडे निघाले.

घरी आल्यावर रात्री सुनबाई ओरडली, 


"अस कस तुम्ही घड्याळ कुणाला देऊन टाकले..? किती अँटिक पीस आहे ते, आजकाल किती फसवणूक करतात माहीत आहे का..?"


शिरीष पण फोन करून ओरडला, पण आबांचा त्या सुलेमान वर विश्वास होता, रहीम चाचाचा लडका अस काही करणार नाही, अस त्यांना आतून वाटत होते, दोन दिवसांनी आबा सुलेमानच्या दुकानात सकाळीच गेले, सुलेमान त्या घड्याळाचीच दुरुस्ती करत होता, त्यांना पाहताच तो म्हणाला,


"अरे..! आबा आप क्यूँ आये..? मै आनेवाला था आपके मकान पर.. घडी लेकर... आप जावो.. इसको अभी थोडा देर लगेगा.." 


आबा काही न बोलता तिथे बसून राहिले, सुलेमानची घड्याळाची दुरुस्ती बघत.. सुरेश एक दोनदा म्हणाला पण,


"आबा, चला घरी, ह्याला टाइम लागलं, दुरुस्त व्हायला, बाई ओरडतील माझ्यावर"


पण आबा तिथेच बसले, सुलेमान हसून त्याला म्हणाला,


"ये बुढे लोग जिद्दी होते है.. ये नही आयेगे, जबतक घडी ठीक नही हो जाती, ये यही बैठेगें, तुम बाजार का चक्कर लगाके आवो, तबतक मै घडी ठीक करता हुं"


सुलेमानच्या बीबीने आबांना चहा आणून दिला, सुलेमानचा पोरगा लाजत लाजत जवळ येऊन गेला, आबांना खूप छान वाटले, तेवढ्यात सुलेमान त्यांना म्हणाला, 


"देखो आबा, तुम्हारी घडी कैसे मख्खन की माफिक चालू हो गई.. बस इसको महिने मे एकबार तेल पाणी डालते रेहना, कभी बंद नही पडेगी... संभालके रखना, बहुत पुरानी चीज है, बाजार मै दिखती नही ऐसी चीज अब.."


आबा त्या घड्याळाकडे मन भरून पाहू लागले, त्यांनी सुलेमानला काही न विचारता एक चेक काढला व त्यावर पंचवीस हजाराचा आकडा टाकला व त्याला दिला, ते बघताच सुलेमानचे डोळे फिरले.. 


"ए क्या करताय आबा, इतना पैसा... अरे नही बाबा, इतना नही होता घडी ठीक करने का.."


आबा उठता उठता म्हणाले, 


"तुम्हे नही पता.. मुझे तुमने कितनी खुशीया दी है... रखो ये चेक... बच्चे के नाम जमा करवा देना.. एक दादा ने अपने पोते को छोटी दुवा दी है ऐसा समझो.."


सुरेशला हे बघून चक्कर यायची बाकी होती, तो काही बोलला नाही, त्याने चुपचाप घड्याळ उचलले व गाडीत ठेवले, सुलेमानचे डोळे भरून आले, तो गाडीपर्यंत आला व त्यांचे दोन्ही हात हातात धरून म्हणाला,


"आबा क्या बोलू समझ नही आता.."


आबांनी त्याच्या पाठीवर थोपटले व ते घरी आले, घरी आल्यावर त्यांनी ते घड्याळ आपल्या खोलीत ठेवून घेतले... सुरेशने घरी सगळा किस्सा सांगितला, सुनबाई व शिरीष काही बोलले नाहीत, कारण पैसा आबांचा होता... आबा त्यादिवशी खूप खुश होते, त्यांनी सर्व नातेवाईकांना फोन केले, नातवंडांना फोन केला, सर्वांशी हसून बोलले, सुरेशला त्यांनी हजार रुपये दिले, सर्वांना आश्चर्य वाटले... त्या दिवशी आबा रात्रभर घड्याळाची टिकटिक ऐकत शांतपणे झोपले, शिरिषची आई गेल्यापासून पहिल्यांदा त्यांना खोलीत सोबत मिळाली होती... स्वप्नात शिरिषची आई लग्न झाल्यावर त्या घड्याळाकडे पाहत म्हणाली होती...


"अय्या... किती सुंदर घड्याळ आहे ..!"


सकाळी सुरेश उठवायला आला, त्याने त्यांना हाका मारल्या, आबा उठले नाहीत आबांच्या चेहऱ्यावर एक हसू होते... घड्याळाची टिकटिक ऐकत आबा अनंताच्या प्रवासास निघून गेले होते... सुलेमानला हे कळाले तेंव्हा त्याचे डोळे पाण्याने गच्च भरले व त्याचे हात आबांच्या शांतीसाठी अल्लाकडे दुवा मागण्यासाठी उठले...


Rate this content
Log in