Tejaswita Vengrlekar

Children Stories Inspirational

4.0  

Tejaswita Vengrlekar

Children Stories Inspirational

कष्टांची जाणीव

कष्टांची जाणीव

3 mins
298


 रोहन १४/१५ वर्षांचा एका शेतकरी कुटुंबातील मुलगा.आईवडिलांचा एकुलता एक आणि आळशी.आईवडील शेतात दिवसरात्र राब राब राबत,घाम गाळून कष्ट करत तेव्हा कुठे घरात चूल पेटायची. घरात एक म्हातारी,अंध आजी सुद्धा होती.तीच्या औषधपाण्याचा खर्चही असायचा.आईवडील स्वतः च्या शेतात काम करून इतरांच्या शेतातही राबायचे. रोहनला पण शेतातील कामे शिकून घेण्यास,काहीतरी छोटीमोठी कामे करण्यास प्रोत्साहन द्यायचे पण रोहन एवढा आळशी बनला होता की त्याला कसलेच काम करण्यात उत्साह वाटत नसायचा.

   लहानपणी आजीआजोबांनी त्याचे एकुलता एक म्हणून खूप लाड करून ठेवले होते. त्याला कसल्याच कामाची सवयच झाली नव्हती,त्यामुळे जसजसा मोठा होऊ लागला तसा त्याचा आळशीपणा सुद्धा वाढू लागला. आता त्याचा आळशीपणा हा आईवडिलांना डोकेदुखी होऊन बसला होता. अंध आजी धडपडत,कसेतरी घरातील छोटेमोठे काम जमेल तसे करायची पण रोहनला तिचीही दया यायची नाही.

    असेच दिवस ढकलत होते.आणि एके दिवशी अचानक गावातील एकाच्या नारळाच्या झाडावरून नारळ काढताना रोहनचे वडील झाडावरून खाली पडले आणि त्यांच्या पाठीच्या मणक्याचे हाड मोडले, ते आता जाग्यावरच खिळले होते. आईने स्वतः चे सौभाग्य लेणे गहाण ठेवून त्यांचा औषधोपचार केला.आतां घरातील कमावता माणूस अंथरुणावर खिळला होता.घरातील सर्व सामान विकून,गहाण ठेवून संसाराचा रहाटगाडा त्याची आई हाकत होती.आता सुद्धा तिने रोहनला हरप्रकारे समजावून बघितले पण त्याच्यात काहीच बदल होईना.

    आई बिचारी एकटीच उन्हापावसात लोकांची धुणीभांडी, शेतमजूरी करून कशीबशी चूल पेटवत होती.आणि अशातच गावात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू झाला.रोहनची आई सुद्धा आता या महामारीच्या विळख्यात सापडली. तिला भयंकर त्रास होऊ लागला.शेजारी पाजारी कोणीच आता दखल घेईनासे झाले. तिला गावाबाहेरच्या कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले. तिच्यावर गावच्या सरपंचांनी दया दाखवून औषधोपचार करण्याची तयारी दर्शविली. पण त्यांना रोहनच्या आळशी स्वभावाची चांगलीच कल्पना होति, त्यामुळे त्यांनी रोहनला आपल्या शेतात काम करण्यास येण्याची अट घातली.आई बरी झाल्यावर तिला २/३ महिने तरी कष्टाची कामे करता येणार नाहीत,तिला फारच अशक्तपणा आला असल्याचं डॉक्टरांनी सांगितले होत, त्यामुळे आता रोहनकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. कामाची तर त्याला मुळीच सवय नव्हती.पण आता कुटुंबातील सर्व सदस्यांची जबाबदार त्याव्यवरच येऊन पडल्याने त्याने नाईलाजानेच सरपंचांना शेतात राबण्यास तयार असल्याचा शब्द दिला.

   आता रोहन रोज पहाटे लवकर उठून घरातील छोटी मोठी कामे आटपून, सरपंचाच्या शेतात,गोठ्यात कामाला जाऊ लागला, घरची शेती सुद्धा कसू लागला. हळु हळु त्याला शेतातील सर्व कामे करण्याची सवय जडली.आता त्याला स्वतः लाच उत्साही,तरतरीत वाटायला लागले. आईबाबांना सुद्धा रोहनमध्ये झालेला बदल पाहून खूप आनंद झाला. रोहनने यावर्षी आपली सारी शेती स्वतः च्या कष्टानेच फुलवली होती. त्याला आता समाधानाची झोप आणि व्यवस्थित भूकही लागत होती. त्याच्या शेतात यावर्षी भरघोस पीक आले होते.त्याला स्वतः च्या मेहनतीचा अभिमान वाटत होता.आणी आजपर्यंत आईवडिलांनी किती कष्ट सोसले याची सुद्धा त्याला कल्पना आली होती.

   आपण यापूर्वीच जर आईबाबांना कामात हातभार लावला असता तर आपल्या वडिलांवर अशी वेळ आली नसती.आईच मंगळसूत्र गहाण पडलं नसतं. घरातील एकेक वस्तू विकावी लागली नसती,हे त्याला आता समजत होत. सरपंच पण रोहनच्या कामावर खूप खुश होते. त्यांनी रोहनची मेहनत,त्याची जिद्द,कष्ट जवळून पाहिले होते,त्यांनी त्याला त्याच्या कामाचा योग्य मोबदला दिला.रोहनने कष्टाने पिकवलेल्या शेतातून आलेले पीक बाजारात चांगल्या भावाने खरेदी केले गेले.त्याला भरपूर फायदा सुद्धा झाला.रोहनने आपल्या कष्टाच्या कमाईतून आईचे मंगळसूत्र सोडवून आणले.आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. बाबा सुद्धा रोहनच्या या कृतीमुळे खूप सुखावले. आजीने त्याला भरभरून आशीर्वाद दिले.

  आळशी रोहनला त्याच्या कष्टाचे असे गोड,सुखदायी फळ मिळाले होते. कष्टाची,श्रमाची खरी जाणीव आणि किंमत त्याला समजली होती.


Rate this content
Log in