Tejaswita Vengrlekar

Children Stories

4.0  

Tejaswita Vengrlekar

Children Stories

एकजूट

एकजूट

2 mins
316


   विलवडे नावाचे कोकणातील एक छोटे गाव होते. गावातील लोक शेती करून आपला उदरनिर्वाह चालवत असत.गाव जरी छोटा असला तरी शेती,बागायती आणि बारमाही पाणी यामुळे समृद्ध होता.गावातून वाहणाऱ्या नदीला बारमाही पाणी असायचे. नदीवर खूप जुना असा एक लाकडी साकव होता.नदीच्या दुसऱ्या बाजूला लोकांची खूप शेती आणि बागायती होती.त्यामुळे या साकवा वरूनच लोक पलीकडे ये जा करीत असत.आता हा साकव खूप जुना झाला असल्याने तो जीर्ण झाला होता.कधीही तुटेल अशी त्याची अवस्था झाली होती. गावातील लोक तात्पुरती डागडुजी करून त्याला जीवदान देत असत.

    गावातील ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामसभेत या साकवाचा,त्याच्या दुरूस्तीचा विषय मांडला होता.प्रस्तावही मंजूर झाले होते पण तरीही या साकवाचे काम मात्र काही सुरू होईना.

   या वर्षी पाऊस भरपूर झाला,आणि सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला,सर्वत्र घराघरात पाणी साचले,लोकांचे अन्नधान्य, कपडालत्ता, भांडीकुंडी सर्व काही पुराच्या पाण्यात वाहून गेले. नदीच्या पलीकडे असलेली शेतीवाडी सुद्धा पाण्यात वाहून गेली.दोन दिवसांनी जेव्हा पुराचे पाणी ओसरले तेव्हा लोक आपापल्या घरातील वाहून गेलेल्या वस्तूंची जमवाजमव करू लागले.त्यांनी पाहिले तर नदीवरील साकव पूर्णतः गायब झाला होता.आता लोकांसमोर नवीनच समस्या उभी राहिली. पलिकडच्या वाडीशी, शेतीशी पूर्ण संपर्क तुटला होता. उपजीविकेचे साधन असणारी शेती,बागायती तर नदीच्या पलीकडे होती. त्यामुळेच आता हातावर हात घेऊन बसण्यात आणि शासकीय कामावर अवलंबून राहून काहीच होणार नाही हे लोकांच्या लक्षात आले. सर्व गावकऱ्यांनी मिळून एक बैठक घेतली आणि नदीतील पाणी पंप लावून उपसून ते जमिनीत साठवावे आणि सर्वांनी श्रमदानाने नदीवर नवीन लाकडी साकव बांधायचे ठरले.

   सर्व तरुण मंडळी या कामाला उत्स्फूर्तपणे तयार झाली. प्रत्यकाने एकत्र येऊन लागणाऱ्या सामानाची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. गावातील सुतार लोकांनी स साकवासाठी लागणाऱ्या लाकडी फळ्या बनवून दिल्या.इतर तरुणांनी जंगलातून वाळलेली झाडे तोडून आणि लागणाऱ्या साहित्याची तरतूद केली. सर्वांनी थोडीफार आर्थिक सोय करून,एकमेकांच्या साहाय्याने नदीवर लवकरात लवकर नवीन साकव बांधून पूर्ण केला.आता लोकांना नदीच्या पलीकडे जाऊन आपल्या शेतीवाडीवर लक्ष ठेवणे सोपे झाले. जीर्ण झालेल्या साकवाला लोकांच्या एकोप्यामुळे नवे रूप मिळाले आणि सर्व गावकऱ्यांचा उपजीविकेचा प्रश्नही मार्गी लागला.हे एवढे मोठे काम काही एकट्या दुकट्याला शक्य झाले नसते,आणि सरकारी मदत मिळेल याची आशा ठेवली असती तर आणि किती कालावधी लोटला असता हेही माहीत नाही.परंतु सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत,सहकार्याने, एकीने काम केले म्हणून आज गावकऱ्यांना आपले जीवन पुन्हा आनंदाने जगणे सोपे झाले होते.

  खरंच एकीत किती शक्ती असते,आणि एकीच्या बळामुळे कितीही मोठ्या प्रसंगावर मात करता येते आणि आपला विकास साधता येतो हे गावकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले.कोणतेही सार्वजनिक काम करताना एकजूट महत्वाची असते हेच खरं.


Rate this content
Log in