हॉटेल महाराजा
हॉटेल महाराजा


हॉटेल अत्यंत मोक्याच्या ठिकाणी होते. पुण्यातल्या महर्षी कर्वे रोड आणि प्रभात रोड हे दोन रस्ते जिथे मिळतात बरोबर त्या फाटय़ावरच हॉटेल वसले होते. हॉटेल अगदीच प्रशस्त नसले तरी ३० जण एकाच वेळी आरामात बसून जेवतील असे साताठ टेबलांचे ते होते, पण एकंदर त्या हॉटेलची आंतर-बाह्य़ अवस्था बघितल्यावर तिथे संपूर्ण दिवसभरात जेमतेम ३० ग्राहक येत असावेत असे वाटत होते. आतासुद्धा दोन जणच बसलेले, तेही चहा पीत. डेक्कन कडून पुढे चालत आल्यानंतर एक बऱ्यापैकी आपल्या बजेटमध्ये जेवण मिळू शकेल असं एखादं हॉटेल मी शोधत होतो. इतकी हॉटेल्स पाहिल्यानंतर त्यातल्या त्यात हे एवढेच हॉटेल आपल्या बजेटमध्ये असल्याचे माझ्या निदर्शनात आले हॉटेल तनिष्का.. वाचून हसायलाच आले. मुंबईला माझ्या घराशेजारी याच नावाचे लेडीज ब्युटीपार्लर आहे. गावालासुद्धा एका हॉटेलचे नाव गंमत असे आहे. च्यायला! काय विचित्र लोक असतात. कसलीही नावे कशालाही देतात. ना संदर्भ ना अर्थजुळणी.
मुंबईवरून एका चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन डेक्कनला एका प्रोडय़ूसरबरोबर मीटिंग असल्याने आलो होतो; परंतु मीटिंग अचानक रद्द झाली होती. प्रोडय़ूसरना अचानक औरंगाबादला जावे लागले. सकाळपासून फक्त पोह्य़ांवर होत हॉटेलमध्ये आत बसताच त्याचा मालकवजा वेटर पाणी घेऊन ऑर्डर घ्यायला माझ्यापाशी आला. तहान प्रचंड लागल्यामुळे मी आधी घटाघटा पाणी संपवलं.
‘‘साहेब, काय आणू?’’ त्याने प्रश्न केला.
‘‘मला मेन्यू कार्ड द्या.’’
‘‘मेन्यू कार्ड तर नाहीये, पण चहा आणि जेवण फर्स्ट क्लास मिळतं इथे.’’
‘‘कशी प्लेट?’’
‘‘सत्तर रुपये. त्यात तीन चपात्या, दोन भाज्या आणि डाळ-भात ,पापड-लोणचं मिळेल.’’
‘‘ठीक आहे. आणा.’’
आता बसताच या हॉटेलमध्ये एवढा शुकशुकाट का असावा हे प्रकर्षांनं जाणवलं. हॉटेलची व्यवस्थित निगा राखली गेलीच नव्हती. रंगरंगोटी करूनच जवळजवळ तीन ते चार वर्षं झाल्याचं भासत होतं .भिंती धुरामुळे काळवंडल्या होत्या. पंख्यांचा गरागरा असा कर्कश आवाज येत होता. भिंतीवर जे एकमात्र फुलांचे पेंटिंग लावण्यात आलेले होते तेही आता फाटायला आले होते. सर्वात भिकार म्हणजे बाजूलाच असलेले स्वयंपाकघर. ते बंद दरवाजात नव्हतेच.त्यामुळे टेबलावर बसलेली माणसं अगदी सहजपणे स्वयंपाकघरातील घडामोडी पाहू शकत होते. एक बाई चपाती लाटत होती, तर दुसरी भाजी बनवत होती. त्यांच्याही चेहऱ्यावर ना तेज होते ना उत्साह.
एका क्षणी तर मला असे वाटले की, या हॉटेलमधून उठून निघून जावं.पण आधीच ऑर्डर दिल्यामुळं तसं करणं शक्य नव्हतं . शिवाय अगोदरच ते हॉटेल चालत नसल्यामुळे असे उठून मधून निघून गेल्यास त्यांना काय वाटेल, अशी काळजी मला वाटली. कीव आली त्यांची.
जेवणाची थाळी आली. पहिला घास खाऊन बघितला. भाजीत मीठ कमी होते आणि प्रचंड तिखट होती. एकंदर हॉटेलच्या भयाण अवस्थेवरून जेवणाच्या चवीची पूर्वकल्पना मला आली होतीच. मीठ मागवून घेतले. एकदाचे कसे तरी ते अन्न मी घशाच्या खाली ढकलले.
मनात आले, ‘‘साला, हे आपले हॉटेल असते तर किती चालवले असते आपण याला, कित्ती पैसा कमावला असता.’’ पण नशीब ज्याचे त्याचे! खरंच माणूस स्वप्नरंजनात किती रमतो ना? भूतकाळातील,वर्तमानातील अथवा भविष्यातील घडून गेलेल्या,घडत असलेल्या -घडणाऱ्या घटनांना स्वतःच्या सुख-दुःखाच्या हिशोबानं स्वप्नाच्या पाकात विरघळत जायचं. मग ती सकारात्मक स्वप्नरंजन असो वा नकारात्मक. स्वप्नरंजन हे किती व कोणत्या परीनं पेलायचं हे सर्वस्वी त्याच्या विचारसरणीवर अवलंबून असतं.मनात झटकन एक विचार आला. या हॉटेलवाल्याला श्रीमंत बनवण्याचा! आपण यावर काही करू शकत नसलो तरी याला काही आयडियाज द्यायला काय हरकत आहे.
त्या हॉटेलवाल्याची प्रथम विचारपूस केली. नाव, गाव इत्यादी.
‘‘दगडू पांडुरंग काळे. मूळचा सोलापूरचा.’’ तो उत्तरला.
‘‘सोलापूरचे? मग इथे पुण्यात कसे?’’ आश्चर्यानं मी विचारलं.
‘‘गावाकडं पाऊसपाणी नाही म्हणून एकाच्या ओळखीनं अठरा वर्षांपूर्वी इथं पुण्यात आलो. या हॉटेलचे मालक अरविंद गोखले. त्यांचा मुलगा अमेरिकेत नोकरीला होता. तो तिथंच स्थायिक झाला. इकडं वडिलांकडं काहीच लक्ष द्यायचा नाही. त्यामुळे ते एकदम एकाकी. त्यांना एकमात्र मी शेवटपर्यंत साथ दिली. त्यांच्या आजारपणात दिवसरात्र त्यांची सेवा केली. अलीकडेच चार वर्षांपूर्वी वृद्धापकाळाने ते गेले, परंतु जाताना हे हॉटेल माझ्या नावे केले.’’
तोपर्यंत हॉटेलमध्ये चहा पीत बसलेले इतर दोघेही निघून गेले.
‘‘काळेजी, तुम्हाला काही सुचवू? तुमच्या हॉटेलच्याच फायद्यासाठी.’’
‘‘हो नक्कीच.’’ मी त्यांना काही तरी नवीन सांगतोय हे त्यांना जाणवलं.
‘‘माफ करा, पण हॉटेल चालत नाही हे मला जाणवले आणि तुम्हालाही माहितीये. जास्त नाही तुम्हाला फक्त पंधरा हजार खर्च करावे लागतील. फक्त पंधरा हजार.’’
तेही लक्षपूर्वक ऐकत होते.
‘‘सगळय़ात आधी ‘तनिष्का’ हे हॉटेलचे नाव बदला. अहो, तनिष्का ही ब्युटीपार्लर्सची वगैरे नावे असतात. हॉटेलचे नाव राजहंस, महाराजा, राजकमल यापैकी एक ठेवा आणि सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे हॉटेलला दोन-तीन प्रकारचे रंग मारा आणि लाइट्स जरा बदला. यासाठी जास्तीत जास्त पाच हजार रुपये लागतील.’’
त्यांनाही हे पटत असल्याचे त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावावरून जाणवत होते.
मी पुढे बोलू लागलो.
‘‘किचन चारचौघात कधीच उघडे नसावे. तुम्ही जागेच्या अभावामुळे मधे भिंत टाकू शकत नसला तरी एक कलर केलेले प्लायवूड लावा. हॉटेलमध्ये पाच ते दहा मेनू वाढवा. जसे वडापाव, वडाउसळ, दहीवडा, मिसळपाव असे कमीत कमी एकाच पदार्थापासून तयार होणारे मेन्यू वाढवा. एक वेटर ठेवा. वेटरचा पोशाख हॉटेलला साजेशा अशा रंगाची हाफ शर्ट-पँट, डोक्यावर गांधी टोपी असावी आणि वेटरच्या पायांत चपला नसाव्यात.’’
‘‘स्वच्छतेवर विशेष लक्ष द्या. संपूर्ण हॉटेल दररोज काही तासांनी साफ करत जा आणि टेबल नवीन घेणे शक्य नसले तरी सध्याच असलेल्या टेबलांना पॉलिश करा आणि प्रत्येक टेबलावर रंगीत नक्षीदार कपडा टाका. यासाठी सहा हजार रुपये लागतील. आता सर्व मिळून अकरा हजार रुपये झाले.
उरलेल्या चार हजारांत तीन-चार निसर्गाची पेंटिंग्ज आणि एक साईबाबांची मोठी फ्रेम लावा. नवीन फुलदाण्या आणा आणि मेन्यूकार्ड्स बनवा. आता बघा, तुमचं हॉटेल हाऊसफुल चालेल.’’
हे सगळे त्यांना सांगितल्यावर त्यांचा चेहरा इतक्या आनंदाने खुलला, की त्यांनी मला कडकडून मिठीच मारली. नवीन काही तरी गवसल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. ‘मी हे सगळे नक्की करणारच’ असे वचन त्यांनी मला दिले.
त्या जेवणाच्या थाळीचे सत्तर रुपये ते घेत नसतानाही मी त्यांच्या खिशात ठेवले.
त्यांना म्हणालो, ‘‘बरोब्बर एका वर्षांने मी इथे येईल, तेव्हा जर हॉटेल चालले नाही तर मला पायातल्या चपलेने मारा आणि जर हॉटेल तुफान चालले तर तिजोरीतून काढून पंचवीस हजार रुपये तुम्ही मला द्यायचे.’’
हा सौदा त्यांनी गडागडा हसत मान्य केला.
तिथून निघताना त्यांनी मला एकच प्रश्न विचारला.
‘‘तुमचेसुद्धा मुंबईत हॉटेल आहे?’’
‘‘नाही. मी फक्त एक लेखक आहे.’’ मी उत्तरलो.
बरोबर एका वर्षांने पुण्याला जाण्याचा माझा योग आला. काम होताच मी त्या हॉटेलमध्ये गेलो, तर त्याचा संपूर्ण चेहरामोहराच बदलला होता. हॉटेलवर मोठी पाटी होती.
‘हॉटेल महाराजा’
लोकांची भरपूर गर्दी हॉटेलमध्ये दिसत होती. काही लोक तर बाहेर वेटिंगवर होते.
हॉटेल वर्षभरातच दुपटीने वाढले होते. कदाचित बाजूची जागासुद्धा त्यांनी विकत घेतली होती. हॉटेलच्या समोरच्या जागेवरही टेबल टाकण्यात आले होते.
जवळजवळ आठ ते दहा वेटर कामाला होते.
मला पाहताच काळेजी आनंदाने चिंब झाले. आत जाताच त्यांनी मला कडाडून मिठी मारली आणि माझ्या हातात एक बंडल ठेवले.
‘‘पन्नास हजार रुपयांचे