गोष्ट विठ्ठल आणि लहान नामाची
गोष्ट विठ्ठल आणि लहान नामाची
आज मंदिरात नैवेद्याच ताट घेऊन दामा सेठच्या ऐवजी नामदेव आला होता.
नामदेवाला आलेलं पाहून विठ्ठलही आनंदी झाला.
नैवेद्याचं ताट विठ्ठला समोर ठेवून नामदेवाने हात जोडून विठ्ठलाला नमस्कार केला.
विठ्ठलाच्या मुर्ती समोर उभा राहून नामदेव म्हणाला.
"विठ्ठला, उशीर झाला का रे यायला. आज ना बाबा कामानिमित्त बाहेरगावी गेले म्हणून मी आज तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आलो आहे. खाशील ना रे माझ्या हातून तू" - नामदेव.
"विठ्ठला, बोल ना रे, खाशील ना?" - नामदेव.
नामदेव अगदी प्रेमाने विठ्ठलाला विचारत होता.
तेव्हाढ्यातच नामदेवाची बहिण आक्का तिथे आली.
"नामा, ये नामा, कधी पासून वाट बघते आहे रे तुझी मी. चल ना जेवायला." -आक्का.
मंदिरात प्रवेश करून विठ्ठलाला हात जोडत आक्का म्हणाली.
"आक्का, बघ ना ग विठ्ठलाने अजून नैवेद्य खाल्लाच नाही आणि तो आलाही नाही." - थोड्या नाराजीच्या सुरातच नामदेव म्हणाला.
"अरे नामा, खाईल तो नैवेद्य. तु अगोदर चल बघू घरी. आई वाट पाहत थांबली आहे." - नामदेवाचा हात पकडत आक्का म्हणाली.
"अग, पण ". - नामदेव.
"पण नाही अन् काही नाही. चल लवकर". आक्का नामदेवाला ओढतच घेऊन गेली.
घरी आल्यावर नामदेव आणि आक्का जेवायला बसले , त्यांची आई त्यांना वाढत होती.
नेहमी बडबड करणारा नामदेव मात्र गुपचूप बसुन होता. त्याला तसं पाहून आई म्हणाली.
"काय रे नामा, काय झालं? असा गप्प का आहेस?" - आई.
"अगं आई, विठ्ठलाने त्याच्या समोर बसून नैवेद्य खाल्ला नाही ना म्हणून तो नाराज झाला आहे". आक्का थोडी हसत म्हणाली.
"नामा, असं काय करतोस बाळा तो देव आहे ना, जेव्हा त्याला भूक लागेल तेव्हा खाईल कि तो". - आई.
"आई, विठ्ठलाने तुम्हा सर्वांना दर्शन दिलं ना ग? पण मला अजून एकदाही त्याने दर्शन दिलेल नाही आणि आज मी त्याच्यासाठी नेलेला नैवेद्य सुद्धा त्याने खाल्ला नाही". - रडत रडतच नामदेव म्हणाला.
"असं नाही रडायचं बाळा". - नामदेवाला जवळ घेत पदराने त्याचे डोळे पुसत आई म्हणाली.
"आई, पुंडलिक दादा ला तर विठ्ठल रोज भेटायचा ना ग, त्याच्याशी खेळायचाही मग मला कधी दर्शन देईल ग तो". - नामदेव.
"देईल रे बाळा, देईल. लवकरच तुला देखील दर्शन देईल विठ्ठल". - आई नामदेवाला समजावत म्हणाली.
"नामा, तुझ्या बाबांना रात्री यायला उशीर होईल तर संध्याकाळी सुध्दा तुच नैवेद्य घेऊन जा तुझ्या विठ्ठलासाठी आणि विचार त्याला कि कधी दर्शन देणार आहेस म्हणुन. विठ्ठल बोलतोना तुझ्याशी रोज, हा." - आई.
"हम्म्म". - नामदेवाने मान डोलावली तशी आक्का हसली.
नंतर आईने हसत दोघांनाही स्वतःच्या हाताने जेवण भरवले.
आता नामदेव कधी एकदा संध्याकाळ होते याचीच वाट पाहत होता.
जशी संध्याकाळ झाली नामदेव आईकडे धावत गेला आणि म्हणाला.
"आई, झालं का ग नैवेद्याच ताट करून". - नामदेव जोरात श्वास घेत म्हणाला.
"अरे हो हो, नैवेद्य तयार आहे आणि बरं का नैवेद्याला विठ्ठलाच्या आवडीची खीर केली आहे आज". - नैवेद्याच ताट भरत आई म्हणाली.
"मग थोडी जास्तच खीर दे. आज मी आणि माझा विठ्ठल सोबतच खाऊ". - नामदेव खुश होत म्हणाला.
"बरं बाबा". - हसत आई म्हणाली.
"हे घे नामा, सावकाश जा आणि लवकर ये हं". - नैवेद्याच ताट नामदेवाकडे देत आई म्हणाली नामदेवाने होकारार्थी मान डोलावली.
नामदेव धावतच निघाला आणि तेव्हाच आक्का तिथे आली.
"आई, हा नामा कुठे गेला ग येव्हढ्या घाईत?" - नामदेवाला घाईत जाताना पाहून आक्का म्हणाली.
"अगं, गेलाय तो त्याच्या विठ्ठलाकडे नैवेद्य घेऊन". - आई हसत म्हणाली तेव्हा आक्का ही हसली.
"कसं होईल ग आई ह्याच". - आक्काही हसत म्हणाली आणि आईने देखील मान डोलावली.
नामदेव मंदिरात जाऊन विठ्ठला समोर उभा राहिला.
"विठ्ठला, बघ मी आलो". - नामदेव.
"आणि बघ तरी, आज नैवेद्यात काय आणलय तुझ्यासाठी".
- नैवेद्याच ताट विठ्ठला समोर ठेवत नामदेव म्हणाला.
"तुझी आवडती खीर आहे रे विठ्ठला. आता लवकर ये बघू खीर खायला मला परत पण जायचं आहे". - नामदेव.
"ऐकतोयस ना रे विठ्ठला?" - नामदेव.
विठ्ठल काही उत्तर देत नाही.
"विठ्ठला, आज तुला हि खीर खावीच लागेल तेही माझ्यासमोर बसून आणि जर तू खीर नाही खाल्लीस तर मी सुध्दा काहीही खाणार नाही". - विठ्ठला समोर खाली बसत आपले गाल फुगवून नामदेव म्हणाला.
"नामा, असं का बरं करतोयस, मी खाईन रे खीर पण तु आधी घरी जा बघू. आई काळजी करत असेल नामा". - विठ्ठल समजावत म्हणाला.
"नाही विठ्ठला, आज मी तुझं दर्शन घेतल्या शिवाय इथून जाणारच नाही आहे". - नामदेव दोन्ही हातांची घडी घालत म्हणाला.
"विठ्ठला, आई म्हणत होती तु खुप सुंदर दिसतोस. मला तुला बघायचं आहे रे विठ्ठला, एकदा मला दर्शन दे". - विनवणी करत नामदेव म्हणाला.
"नामा, असा हट्ट करणं बर नव्हे". - विठ्ठल.
नामदेव उठतो आणि विठ्ठलाच्या पायाजवळ जाऊन गुडघ्यांवर बसतो.
विठ्ठलाच नाव घेत नामदेव आपलं डोकं विठ्ठलाच्या पायावर मारतो.
"विठ्ठल"
"विठ्ठल"
"विठ्ठल"
"अरे नामा, हे काय करतोयस, थांब. ऐक माझं, मला असं मुर्तीरुपातून बाहेर नाही येता येणार. सोड बरं हा हट्ट". - नामदेवाला समजावत विठ्ठल म्हणाला.
नामदेव काही थांबत नाही.
"विठ्ठल"
"विठ्ठल"
"विठ्ठल"
विठ्ठलाला नामदेवाची अशी अवस्था पाहावत नाही आणि तो मुर्ती रूपातून बाहेर येतो.
"नामा, उठ बघू". - नामदेवाचा हात पकडून त्याला उठवत विठ्ठल म्हणाला.
विठ्ठलाला समोर पाहून नामदेवाने विठ्ठलाला आनंदाने मिठीच मारली आणि म्हणाला.
"विठ्ठला, आलास तू" - नामदेव.
"मग काय, तुझ्या हट्टापायी यावचं लागलं मला. पण नामा, असं कोणी करत का? सांग बरं मला". - विठ्ठल.
"विठ्ठला, मग मी काय करायचं होतं, तु मला दर्शनच देत नव्हतास म्हणून मी असं केलं. पण किती उशीर केलास रे मला दर्शन द्यायला विठ्ठला". - विठ्ठलाकडे बघत नामदेव म्हणाला.
"नामा, तुला दर्शन दिलं नाही म्हणून काय झालं मी सदैव तुझ्या सोबतच तर होतो ना. तुझ्याशी बोलत सुद्धा होतो". - विठ्ठल.
"हो विठ्ठला, पण मला तुला भेटायचं होतं. तुझ हे सुंदर रुप बघायचं होतं". - विठ्ठलाच्या चेहऱ्याकडे पाहत नामदेव म्हणाला.
"विठ्ठला, खरंच किती गोड दिसतोस रे तू. तुला असंच बघत राहावं अस वाटतंय". - विठ्ठलाच्या हनूवटीला हात लावून नामदेव म्हणाला.
नामदेवाच बोलनं ऐकून विठ्ठल हसला.
"विठ्ठला, चल मग खातोयस ना आताा खीर?" - खीर कडे बोट दाखवत नामदेव म्हणाला.
"हो, खातो. पण मला तु तुझ्या हाताने खीर भरवणार आहेस ना?" - नामदेवाकडे पाहत विठ्ठल म्हणाला.
"हो चल". - विठ्ठलाचा हात पकडत नामदेव म्हणाला.
विठ्ठलाला एका पाटावर बसवून नामदेव स्वतः त्याच्यासमोर बसला आणि नैवेद्याच ताट हातात घेऊन विठ्ठलाला आनंदाने खीर भरवू लागला.
कधी नामदेव विठ्ठलाला खीर भरवत होता तर कधी विठ्ठल आपल्या लहानग्या भक्ताला स्वतःच्या हाताने खीर भरवत होता.
