एक पत्र लेकीला
एक पत्र लेकीला
माझी लाडकी लेक
मोबाईलवर रोज बोलणं होत ,व्हिडीओ कॉल होतो आनंद चेहऱ्यावर दिसतो , पण तुझी कमी कायम आम्हाला जाणवते . तू दूर गेलीस आणि या घराच घरपण जणू हरवलं , हसत , खेळत घर अबोल झालं.
आज तुझ्या बडेला यायची खूप इच्छा होती पण नाही जमलं त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस .
आज तू असतीस तर हे घर आता आनंदाने गुंजल असतं ,मज्जा मस्ती ने घर दुमदुमल असतं आज हे सगळं आठवून मन भरून आलं आणि अलगद पाणी डोळ्यांतुन वाहू लागलं ,
दादा , पप्पा सगळेच तुला खूप मिस करतात बोलून दाखवत नाहीत पण त्यांच्या मनातील घालमेल मला जाणवते.
खर सांगायचं झालं तर तुझ्यासोबतच मी नव्याने जगत होती अस वाटतं होतं ,तू गेली आणि माझं जगणं हरवलं की काय अस वाटू लागलं ,तुझ्या हट्टामुळे बाजारात जाणं ,दोघी माय लेकी शॉपिंग करणं ,येताना पाणीपुरी , कधी सँडविच ,डोसा खाणं हे सगळं जणू आठवणीतच राहून गेलं .
पहिल्यासारख बाजारात जाणं होत नाही कारण आता सोबत कोणी नसतं आणि गेली तरी तो उत्साह नसतो जो पहिले होता , पाणीपुरी वैगरे तर खूप दूरची गोष्ट , आणि खरं सांगू तेव्हा तुझी खूप कमी भासते
जेव्हा मी आजारी पडते मदत करणार ,काळजी घेणार कोणी नसतं तेव्हा तुझी कमी भासते
माझ्याशी गप्पा मारणार ,घरात घरभर फिरणार बडबड करणार सारख आवाज देणार कोणी नसतं तेव्हा तुझी कमी भासते.
तू गेल्यापासून कोणतेच वेगळे पदार्थ घरात बनत नाही आणि मी बनवत नाही कारण आवडीने खाणार कोणी नसतं आणि बनवणारी तू नसते तेव्हा तुझी कमी भासते.
आणि ही कमी तुझ्याशिवाय कोणीच पूर्ण करू शकत नाही.
पण असो तू शिकण्यासाठी दूर गेलीस हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे , इतकं शिक आणि इतकी मोठी हो की आम्हला गर्वाने सांगता यावं की ही आमची लेक आहे .
तो दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस असेल.
आम्हला कायम तुझा अभिमान आहे आणि तू आमचा विश्वास आहेस.
कोणतीही खंत मनात न ठेवता बिनधास्त जग , स्वतःची काळजी घे , आणि उंच भरारी घे.
तुला खूप यश मिळो ,उदंड , निरोगी आयुष्य लाभो हेच आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत
Love you so much dear
तुझी
मम्मी
