धुंद पाऊस
धुंद पाऊस
ती त्याच्यासोबत फिरायला निघाली होती मस्त चारचाकी मधून..
ही काही त्यांची पहिली वेळ नव्हती फिरायला जायची...
पण आज काही वेगळेच वातावरण होते.
वैद्यकीय महाविद्यालयात चौथ्या वर्षाला होते दोघेजण आणि त्याच वर्षी भेट झाली होती त्यांची.
कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्या दोघांची जोडी तयार होईल पण म्हणतात ना सर्व काही लिखित असते कुठेतरी आणि तेच घडते..
आज वातावरण खूप छान होते. काळ्या ढगांनी गर्दी केली होती आणि पांढऱ्या ढगांना बाजूला सारून आपली जागा पटकावत होते. सूर्य लपंडाव खेळत होता आणि त्यामुळे थंडावा पसरला होता हवेमध्ये..
आपल्या जागेवरूनच ती प्रसन्न वारवरणाचा आनंद घेत होती आणि तो कार चालवत होता. हिरवीगार झाडे वाऱ्यावर डोलत होती, फुले सुंदर दिसत होती. रस्त्यावर फार वर्दळ नव्हती. तिने त्याच्या हातावर हात ठेवला आणि नजरेस नजर भिडली आणि क्षणात पावसाची रिमझिम चालू झाली..
तसं तिने पटकन कार थांबावायला सांगितली आणि पटकन बाहेर येऊन निसर्गाचा आनंद घेऊ लागली. दोन्ही हात हवेत पसरवून वाहत्या पावसाच्या सरी कवेत घेण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती.
उन्हाळ्या नंतरचा पहिलाच पाऊस असल्याने मातीचा छान सुगंध दरवळत होता आणि हा गंध प्रेमात रंग भरू लागला. तो कार मधून बसूनच तिला डोळेभरून बघत होता. कारण त्याच्याकडे खूप कमी वेळ होता तिला देण्यासाठी, भविष्य नव्हतं त्याच्या हातात आणि म्हणूनच तो तिच्यासाठी वर्तमान आनंदात जगण्याचा प्रयत्न करत होता..
ओलीचिंब मनसोक्त भिजून झाले आणि पाऊस ही थांबला होता तसं तिला इच्छा झाली गरमागरम आल्याची चहाची आणि मग त्याला जबरदस्तीने चहाच्या टपरीवर घेऊन गेली. दोन कटिंग सांगून तिथेच एका बाकावर दोघे ही बसले. पावसानंतर शांत झालेली तप्त धरती आता थंड भासत होती. चहा आला दोघेही चहा प्यायला घेणार तेवढ्यात तिने नजर चोरली कारण त्याची नजर कधीपासून तिच्यावर रोखली होती पावसात ओली झाल्याने तिला थंडी वाजत होती. त्याने तिला आपले जॅकेट काढून दिले आणि चहा प्यायला सुरुवात केली. सृष्टी सुखावली होती पावसाने त्यामुळे वातावरण आल्हाददायक होते. आता आली होती परतीच्या प्रवासाची वेळ कारण पाऊस पडल्यामुळे त्यांनी पुढील प्रवास रद्द केला आणि संध्याकाळदेखील होत आलेली..
ती परत येऊन कार मध्ये बसली आणि भयाण शांतता पसरली, आता विरहाचा क्षण जो जवळ येणार होता.म्हणतात ना कोणत्याही प्रवासात जाताना वेळ जात नाही आणि परत येताना वेळ कधी संपतो ते कळत नाही तसेच काहीसे दोघांचे झाले होते..
कार थांबली त्याने तिला हॉस्टेल च्या गेट वर सोडले त्याला तिला मिठी मारायची होती पण त्यांनी अजूनही आपल्या मर्यादा कधीच ओलांडल्या नव्हत्या..
तिची नजर विचारत होती, " कधी रे परत असा भेटशील मला, एकांतात तुझा हात हातात घेऊन तासनतास तुझ्या नजरेत मला हरवायचे आहे. आपण परत कधी भेटू रे आणि नाही भेटलो तर कसं जगायचं रे एकमेकांशिवाय सांग ना तू मला, मन नाही मानत आज.. "
त्याची नजर स्थिर आणि शांत जणूकाही सांगत होती, " प्रिये सत्य दोघांनाही ठाऊक आहे. भविष्य एकत्रित नाही माहिती असूनही आजचा प्रेमाचा क्षण जगून आनंद द्यायचा हे ठरवूनही हा विरह हे दुःख जाणवते आहे. मन किती वेडे असते,कितीदा समजावले तरी तिथेच अडकते पाण्यातील भोवऱ्याप्रमाणे..
दोघांनी पथ फिरवली, आपापले रस्ते निवडले व चालू लागले आणि..
परत जोरात पाऊस सुरु झाल, विरहाच्या वेदनात बरसू लागला, त्यांची ताटातूट बघून रडू लागला.
पण ते मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते. चुकूनही मागे नं फिरता आपल्या मार्गाला पोचले पण तो पाऊस मात्र कोसळत राहीला..
बेधुंद पावसात आठवणी बरसत राहिल्या..
