STORYMIRROR

Mayur Bhoir

Children Stories Inspirational

4  

Mayur Bhoir

Children Stories Inspirational

चिखलात फुललेली सुंदर कमळे !

चिखलात फुललेली सुंदर कमळे !

3 mins
515

     सरळगाव विभाग हायस्कूल सरळगाव, मधील इयत्ता आठवीचे वर्ष होते, सहामाही परीक्षेनंतर शाळा सुरु झाली की शिक्षक पेपरांचे गठ्ठे आणायला सुरुवात करतात, दिवाळीत लावलेले दिवे विझून पेपरातले दिवे बघायची उत्सुकता आणि धाकधूक असते, आठवडा पंधरा दिवसात पूर्ण चित्र स्पष्ट झालेलं असतं, शिक्षकांनी या नाहीतर पुढच्या परीक्षांची आतापासून नीट तयारीला लागण्याची तंबी दिलेली असते आणि आम्ही येरे माझ्या मागल्या प्रमाणे अंगवळणी पडलेली वाट चालत राहतो.

   आपल्या निकालाचा शिक्षकांवरही कसा परिणाम झालेला असतो हे यावर्षी समजले. विज्ञानाचे घाटगे सर जीवशास्राचे पेपर घेऊन आले, पेपरांच्या गठ्ठ्याबरोबर बांबूची हिरवीगार पातळ छडी होती. त्याकाळात अशा लहान मोठया आकाराच्या छड्या दिसायच्या सरांच्या हातात. पेपर आणि छडी बघून सगळ्यांची धडधड शिगेला पोहोचली, सरांनी गठ्ठा सोडून एक पेपर बाहेर काढला आणि ते टेबल खुर्ची सोडून बेंचच्या रांगामधून एका हातात पेपर आणि एका हातात छडी घेऊन फिरू लागले, फिरता फिरता बोलत होते की हा पेपर सगळयांनी पहा, सगळे गर्भगळीत झालेले, हातात पेपर ज्याचा होता त्याला नक्कीच शून्य मार्क असणार आणि त्या हिरव्या छडीचा प्रसाद खावा लागणार, फक्त तो कोण? सर्वजण आपापल्या परीने तर्क करत होते, पण सरांनी तो पेपर पुन्हा टेबलावर उलटा ठेवला आणि म्हणाले आधी काही नमुने दाखवतो म्हणून एक पेपर काढला आणि वडवलीच्या वसंतचं नाव पुकारलं, इकडे ये, पेपर घेऊन जाग्यावर जाऊन उभा रहा, तो पेपर घेऊन जाग्यावर जाण्यासाठी वळल्याबरोबर पाठीत सपासप दोन बसल्या, हमखास वळ तर उठलेच असतील, तो कळवळत जागेवर जाऊन उभा राहिला, वर्गात भयाण शांतता... प्रत्येकाला आता आपलं काय असा प्रश्न आणि त्याच्या तीव्रतेप्रमाणे धड धड सुरु झाली, सरांनी वसंतला विचारले, किती मार्क मिळाले रे? तो रडवेल्या आवजात म्हणाला सर, "दोन". त्यानंतर एक दोन नमुने दाखवून छडीचा वापर करून सरांनी काही विनोदी उत्तरं त्यांना मोठ्याने वाचायला लावली, वातावरण थोडं हलक फुलकं झालं, सरांनी छडीचा कार्यक्रम आटोपता घेतला आणि टेबलवर उलटा ठेवलेला पेपर पुन्हा उचलून वर्गात फिरू लागले. म्हणाले हा पेपर सगळ्यांनी नीट पहा, पुन्हा धड धड, आता सरांनी माझं नाव पुकारून उभं राहायला सांगितले, मला खात्री होती की मी बऱ्यापैकी पेपर लिहिलाय पण ते घाटगे सर होते, आता हातात छडी नव्हती पण एकदा त्यांनी माझ्या डोळयांपुढे काजवे चमकवले होते. मला फक्त उभं केलं आणि सर हातातला पेपर सगळ्यांना दाखवायला लागले, पेपर कसा लिहावा हे सगळ्यांनी बघा, नुसती उत्तरं कशी लिहावीत हे नाही म्हणत मी, पेपर किती नीटनेटकेपणाने लिहिलाय ते पहा, सगळी उत्तरं बरोबर लिहिलीत पण पेपर तपासताना मला खुप समाधान मिळालंय, मी येताना टीचर रूम मध्ये सगळ्या शिक्षकांना हा पेपर दाखवला. पेपर कसा लिहावा हे शिकून घ्या ह्याच्याकडून. त्यानंतर सगळीकडे फिरून माझ्या पेपरची पाने उलटवून दाखवत होते, काढलेल्या आकृत्या किती सुबक आहेत, अक्षर किती सुंदर आहे, क्रमाने लिहिलेली उत्तरे, सोडलेला समास, पहिल्या प्रश्नाचे उत्तर लिहून झाल्यावर दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर लिहिण्या अगोदर मध्ये सोडलेली कोरी ओळ, अधोरेखित केलेले महत्वाचे शब्द, यामुळे पेपर सुबक दिसतोय.

     हे सगळं घाटगे सरांच्या तोंडून कौतुक ऐकणे म्हणजे मला काय वाटत असेल त्याची तुम्हीच कल्पना करू शकता. मग सरांनी सांगितले की 40 पैकी 40 मार्क मिळवलेत त्याने, हे ऐकून माझा आनंद गगनात मावेना.

   पुढे नववीत गेल्यावर त्याच सरांनी विचारले परीक्षेत तुमच्या वर्गातून पहिला कोण आला आहे?

मी उभा राहिलो, मला विचारलं कोणत्या गावातून येतोस तु?, मी म्हणालो "उंबरपाडा". मग म्हणाले पाचवी ते दहावी पर्यंतच्या सगळ्या वर्गात पहिले किंवा दुसरे आलेले विद्यार्थी उंबरपाडा ह्या गावातीलच आहेत, ह्या गावाला भेट दिलीच पाहिजे आणि ते खरोखरच कोठावदे सरांना घेऊन आमच्या उंबरपाड्याला आले, तेव्हा नळाच्या पाण्यामुळे गावात ठिकठिकाणी चिखल झालेला. काही ठिकाणी लांब उड्या मारून तर काही ठिकाणी पॅन्ट थोडी वर घेऊन त्यांना चालावे लागत होते, आज ती परिस्थिती नाही पण त्यावेळी गावात अस्वच्छता नसली तरी चिखल होता. घाटगे सर आणि कोठावदे सर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांबरोबर बोलले, विचारपूस केली. आमच्याकडे सरांसाठी साखरेचा चहा केलेला, त्यांनी तो आढेवेढे न घेता घेतला म्हणून मला विशेष आनंद झाला, त्यांनी घरीही माझं कौतुक केलं. शाळेत येऊन म्हणाले की गावात तर चिखल आहे पण गावकरी गुणी आहेत, त्याच गावात ही सुंदर कमळे फुलली आहेत.


Rate this content
Log in