STORYMIRROR

Mayur Bhoir

Children Stories

3  

Mayur Bhoir

Children Stories

काजवे

काजवे

3 mins
261

   मी चौथी पास होऊन पाचवीत गेलो, प्राथमिक शाळेतून सरळगाव विभाग हायस्कूल मध्ये गेलो, प्राथमिक शाळेपेक्षा सगळंच वेगळं, हायस्कुलची इमारत खुप मोठी, प्रशस्थ मैदान, लांबलचक व्हरांडा, मोठमोठ्या वर्गखोल्या, विद्यार्थ्यांना बसायला बेंच, दप्तर ठेवण्यासाठी बेंचला खण, अनोळखी विद्यार्थी, अनोळखी शिक्षक, प्राथमिक शाळेत असताना वर्षभर एकच शिक्षक, सगळे विषय तेच शिकवायचे, हायस्कूल मध्ये प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक, हिंदी आणि इंग्रजी हे काही वेगळेच विषय, इंग्रजिच्या अक्षरांची वेगळीच तऱ्हा, आतापर्यंत रेषेच्या खाली शब्द लिहून वरच्या रेषेला चिकटवायचे तर इंग्रजीच्या अक्षरांना खालून आधार द्यावा लागतो हिंदी आणि इंग्रजी मधले शब्द कधी कोणाच्या तोंडून ऐकले नव्हते, असा सगळा अजब प्रकार, पण मजाही येत होती.

    पाचवी, सहावी करता करता आठवीत पोहोचलो. वर्गात लहान म्हणून पुढच्याच बेंचवर बसायचं, मी आणि माझा नेवालपाड्याचा मित्र हनुमंत झुंजारराव. आठवीला आम्हाला विज्ञान शिकवायला नवीन शिक्षक आले, त्यांचं नाव घाटगे सर, त्यांची शिकवण्याची एक लकब होती, तेच " याठिकाणी "हा शब्द खुप वेळा वापरायचे त्याची खुप गंम्मत वाटायची, काही दिवसांनी हा शब्द कितीवेळा बोलतात ते गंम्मत म्हणून मोजायचो, ते नवीन असल्यामुळे पहिल्या दिवशी त्यांनी त्यांची ओळख करून दिली, सर्वांची ओळख करून घेतली, ते किती कडक शिस्तीचे आहेत हे सांगितले, अभ्यास नाही केला तर कशी शिक्षा करणार हे आमच्या वर बिंबवले, शिकवत असताना कोणी काहीही बोललेलं त्यांना आवडत नाही, मस्ती केली तर फटके, पूर्ण लक्ष त्यांच्या शिकवण्याकडे असलं पाहिजे. हे सगळं ऐकून आमचे धाबे दनाणले, बेल झाल्यावर ते बाहेर पडले तेव्हा सगळे सुटले, गलबलाट सुरु झाला. मी नेहमीप्रमाणे मॉनेटर असल्यामुळे सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होतो, सगळे म्हणत होते की घाबरायचं काही काम नाही, सगळे नवीन शिक्षक आले की असच धमकावतात.

   दुसऱ्या दिवशी त्यांच्या विषयाची घंटा वाजली आणि त्यांची चाहूल लागताच संपूर्ण वर्गात शांतता पसरली. त्यांनी शिकवायला सुरुवात केली 2-3 मिनिटं झाली असतील, मला हनुमंत कोपराने खूणवायला लागला, मी त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हतो, म्हणून तो कानात कुजबुजयला लागला, शाई शाई, अरे शाई संपले, मी हळूच त्याच्याकडे बघितले तर तो त्याचा फाउंटन पेन उघडून माझ्याकडे शाई मागत होता. शिकवता शिकवता सर सगळयांकडे बघायचे मग पुन्हा फळ्यावर लिहायचे, ते फळ्यावर लिहीत असताना मी माझा फाउंटन पेन उघडला, त्याला शाई दिली नाही तर तो हमखास मार खाणार हे पक्क होतं, पुढच्याच बेंचवर असल्यामुळे लगेच मार खाण्याची बोहोनी होणार होती, त्यालाही घाई झाली होती, तो पुन्हा कुजबुजला दे लवकर, हे नक्कीच सरांनी ऐकलं असेल, सर फळ्यावर लिहीत असताना मी त्याच्या पेन मध्ये शाईचे थेंब टाकायला सुरुवात केली, सर फळ्याकडून एकाच पावलात आमच्यापर्यंत पोहोचले आणि फाट असा आवाज होताच हनुमंतचा गाल हनुमानासारखा लाल झालाय हे समजण्याच्या आतच तोच हात उलटा फिरून पुन्हा एकदा फाट असा आवाज माझ्या कानाखाली बसला, साऱ्या वर्गानी ऐकला.

    आतापर्यंत पावसाळ्यात घोर अंधाऱ्या रात्री काजवे चमकलेले बघितले होते, खुप मजा यायची बघायला, आईची एखादी बाम ची बाटली रिकामी झाली की काजवे पकडून बाटलीत ठेवायचो भरून, मजा यायची काजवे चमकताना बघायला. मराठीचा अभ्यास करताना डोळ्यापुढे काजवे चमकणे म्हणजे काय ते नीट समजले नव्हते, ते विज्ञानाच्या घाटगे सरांनी त्या दिवशी शिकवले. पण ह्यावेळी मजा नाही आली, काजव्यांच्या प्रकाशाने डोळे चमकण्या ऐवजी डोळ्यात अश्रू आले, त्यानंतर विज्ञानाच्या तासाला सगळयांचे पेन शाईने तट्ट भरलेले असायचे. एकमेकांना शाई देताना या प्रसंगाची आठवण येऊन हसू येते, बाकीच्या मुलांना इंग्रजी आणि गणिताच्या तासाला हे काजवे किती त्रास देत असतील याची कल्पना आली, कोणी माझी वही मागतली तर आकडूपणा न करता मदत करू लागलो.

   आजही मला तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो, ती शाई, तो हनुमंत, ते घाटगे सर आणि ते काजवे.....


Rate this content
Log in