छ. शिवाजी महाराजांना पत्र
छ. शिवाजी महाराजांना पत्र


राजं या अर्धमेल्या मावळ्याचा तुमास्नी मानाचा मुजरा...! व्हय राज म्या अर्धमेला मावळाच म्हणलो. त्येला कारण बी तसंच हाय. आताच्या काळात, तुमी तव्हा तयार केलेल्या मावळ्यावानी मावळं न्हाय राहिली. कारण तुमास्नी आता हे लोक देव म्हणत्यात आणि सौताला तुमचं भक्त म्हणवून घेत्यात बगा. या करंट्यांनी तुमच्या नावानं इथ नुस्ता उन्माद मांडलाय. मला तर आसं वाटाय लागलंय तुमी आमास्नी दिलेल्या इचार पुढं नेण्यापरस इथं दुसरंच कायतरी घडाया लागलय बगा.
आवं राजं तुमी मुठभर मावळ्यांना जात - पात - धर्म इसरुन त्यास्नी एकत्र करुन स्वराज्याचं तोरण बांधलसा. तुमी कधी बी भेदभाव केला नायसा. अन म्हणूनच म्या म्हणतुय की तुमचं राज्य धर्मनिरपेक्ष राज्य हुतं. पर आजच्या वक्ताला हे कुणालाबी ठाव न्हाय. आज तुमच्यावर सरळ सरळ एका *जातीचा* शिक्का मारून तुमी फकस्त जातीसाठी लढला असा खोटा इतिहास सांगणारे लयी लफंगे पसरल्यात.
अन् याचमुळं आज हिंदू - मुस्लिम द्वेष टोकाला गेलाया बगा.
महाराज इथल्या लोकांनी तुमास्नी डोस्क्यात कमी आन् डोसक्यावर जास्त घेतलय. कारण तुमचं इचार कुणीबी समजून घ्यायला तयार न्हाय. आव ही आजची तरुण (टवाळकी) पोरं तुमची जयंती, राज्याभिषेक आला की तुमचा इचार पसरवायचं सोडून वाट्टल तसा धिंगाणा घालत्यात. ही कार्टी तुमच्या जयंतीला तेन तोंडात मावा, कपाळी शिवगंध लावुन आन् त्या गाडीच्या पुंगळ्या काढून उगाचच रॅली काढत्याती. आन् यापेक्षा भयानक गोष्ट म्हंजे बेधुंदपणे डी जे च्या तालावर ठेका धरत्यात.
परं राज दुर्दैव हे की यातल्या एकालाबी तुमचं इचार नीट ठावं नसत्यात.
जव्हां तुमी स्वराज्य हुभारलसां तव्हा म्हणला हुता की, "शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालासुद्धा आपल्या सैन्याचा धक्का लागता कामा नये." आवं पर आज या तुमच्या राज्यात शेतकरी बाप त्याच्या न्याय-हक्कांसाठी अजूनपण लढतोय. महाराज तुमी पर स्त्री ला मातेसमान वागवायचात. जर कुणी एखांदा स्त्री च्या वाटला गेला तर तुमी त्याची गय करत नव्हतासा याचं पुरावं बी हायतं. पर आता मात्र स्त्रीवर हल्ली सारखचं अत्याचार हुत्यात पर आज कुणीबी त्यावर ठोस निर्णय घेत नाय बगा.
महाराज इथल्या हर एक घरात "राजे तुम्ही पुन्हा जन्माला या" अशा घोषणा दिल्या जात्यात पर जिच्या पोटी शिवबा जन्माला यायला पायजेल त्या जिजाऊ ला मात्र गर्भातच मारुन टाकलं जातयं इतक नीच आणि क्रुर कृत्यं तुमच्या या राज्यात व्हताना बगवत न्हाय. दुर्दैवाची गोष्ट येवढीच हाय या सगळ्या अन्यायाविरुद्ध दुसरा एखांदा शिवाजी तयार व्हाय लागला कि त्येला मात्र कायमचच संपवलं जातय, तुमचा इचार घेऊन चालणाऱ्या आन् समाजात बदल करणाऱ्यास्नी बी हे समाजकंठक खुनाच्या दारात ढकलून देत्यातं...
राजं यावरन मला येकच कळतय या भेकडांना आपल्यासारख्या महापुरुषांच्या इचारांवर चालणारा देश नगं झालाय. महाराज आपल्या चरणी येवढीच मागणी हाय की या अशा मुर्खास्नी लवकरच चांगली बुद्धी येउदे बगा....
चला राजं आता जातु म्या अजून कोण कुठं धिंगाणा घालायलय बघतु, आपली रजा घेतु .....
आपला मावळा...