Vaidehi Kulkarni

Others

3  

Vaidehi Kulkarni

Others

बंधू शोभे नारायण

बंधू शोभे नारायण

3 mins
234


   एव्हाना श्रावणसखा धरेच्या पाहुणचाराने तुष्ट झालाय. उन्हाचे रेशीम कवडसे, मध्येच पर्जन्याच्या कोमलधारा, धरेलाही आता त्याची ही रूपे परिचयाची झाली आहेत. परिजातक पहाटेपहाटेच लक्षसुमने रोजच तिच्या चरणी वाहत आहे, रंगरूपंगांधाचे चाफ्याचे सुवर्णअलंकार तिच्या अंगोपांगी खुलून दिसताहेत. केतकीची हिरवी काया हळूहळू यौवनाचा तजेलदार पिवळसर रंग धारण करते आहे, कित्येक व्रतवैकल्ये ठायीठायी सुरू आहेत. असा श्रावण तिला मनापासून आवडायचा, पण तो मध्याकडे झुकला की मात्र तिला हुरहूर लागे.

   अतिसामान्य घरातील ती, चार भावांची एकटी बहीण, गडगंज घरात दिलेली, घरात कशाचीच ददात नव्हती पण घराला माणसांचं वावडं होतं, काही मोजकेच तोलामोलाचे नातेवाईक त्या घराने सांभाळले होते, इतरांची किंमत त्यांच्यालेखी कस्पटासमान होती, हिच्या माहेरचे अतिसामान्य लोक त्या घरच्यांना ओसरीवर बसण्याच्या लायकीचे पण वाटत नसत, लग्नानंतर एकदोन प्रसंगातच तिचं माहेर तुटलं... कायमचं. श्रावण मध्यावर आला की रोज येणारी भावांची आणि माहेरची आठवण जास्तच तीव्रतेने यायची, पौर्णिमेला तर तिचे दारापर्यंत कित्येक हेलपाटे होत, चुकून एखादा भाऊ येईल, अपमान सहन करूनही ... फक्त आपल्या भेटीच्या ओढीने... दरवर्षी खोटी आशा लागून रहायची आणि दरवर्षी अपेक्षाभंगही होत असे...

   यावर्षी श्रावणमास अधिक आलेला, दारातल्या ताज्या प्रजक्तफुलांचा कृष्णतुळशींनी सजवलेला हार ती गोपालकृष्णासाठी करू लागली, रोज मनोभावे त्याला तो हार अर्पण करत होती, श्रावण सुरू झाला तरीही तिने तिचा नेम सुरूच ठेवला, आजकाल कृष्णपूजेत तिचा थोडा जास्तच वेळ जात होता, सासूबाई असेपर्यंत तिला पूजा करावी लागलीच नव्हती, सुंदर सुबक तयारी करून द्यायची ती त्यांना आणि इतर कामांमध्ये गढून जायची, कधी तक्रार नाही की कधी काही मागणी, निरपेक्ष भावनेने सगळ्यांचं सगळं करत होती, माहेर तुटलं तरी सासर राखून चित्ती समाधान बाळगून होती. सासूबाई गेल्या आणि पूजेची जबाबदारी हिच्याकडे आली. हिने देवांना पण आपलंसं केलं, देवघरावर वेगळीच प्रसन्न चमक आली होती, अधिक मासापासून तर तिच्या आणि देवाच्या नात्याला जणू सोनेरी किनारच लाभली, तल्लीन होऊन ती त्या सावळ्या परब्रह्माची आराधना करू लागली. संसारातील इतर जबाबदाऱ्या होत्याच, त्या निभावून नेतानाही तिला सतत ते कृष्णरूप मोहिनी घालू लागले, सकाळची पूजा, संध्याकाळी दिवेलागणी आणि रात्री झोपतानाची मनापासून प्रार्थना, व्यस्त दिनक्रमातले हे सौख्यक्षण भासत होते तिला.

   यंदाही श्रावण मध्याकडे झुकायला आलेला, एक दुःखाची हलकी कळ येऊन गेलीच तिच्या मनात... सवयीने, पण आज तिला काहीतरी नवीन गवसलं, लेकीबरोबर ती पण गेली बाजारात, राखी खरेदीसाठी. सजलेल्या बाजारपेठेत कित्येक चित्ताकर्षक राख्या मांडलेल्या होत्या, किती दुकानं फिरली ती, आणि सरतेशेवटी मिळाली तिला जशी हवी तशी राखी. आता ती येरझाऱ्या घालत नव्हती, कोणाची वाट पाहत नव्हती की उदासही झाली नव्हती.  आज पौर्णिमा, तिने सुंदर साडी नेसली होती, औक्षणाचे तबक सजवले होते, त्यात वेणूवर मोरपीस असलेल्या नक्षीची राखी अगदी खुलून दिसत होती, मनासारखी पूजा झाली, त्या श्रीरंगालाही तिने आज तिच्या मनासारखं सजवलं, त्याच्या प्राजक्तहारात आठवणीने कृष्णकमळाचं फुल गुंफलं, सुवासिक अत्तर लावलं आणि रक्षा करण्याच्या बंधनात त्याला अंतरीच्या तळापासून बांधून घेतलं, साश्रू नयनांनी त्याला औक्षण केलं, औक्षणाचं तबक खाली ठेवून घट्ट डोळे मिटून ती त्याचं रूप आठवू लागली, तिच्या मिटल्या डोळ्यांसमोर ती त्याला राखी बांधत होती, मूर्तीतील तो आज सगुण रुपात तिच्या मन:चक्षूंसमोर उभा ठाकला होता, तिने ती वेणूवर मोरपीस सजलेली राखी त्याच्या मनगटावर बांधली, भास की सत्य, तिचे तिलाच उमगत नव्हते, अतीव आनंदाने मन भरून आले होते, किती वेळ गेला कोणास ठाऊक, हळुवार डोळे उघडले, निरांजनाच्या तेवत्या ज्योतींच्या ठिकाणी दोन मोरपिसे दिसत होती, आजूबाजूला एक दिव्य परिमळ दरवळत होता, खरेच नारायण तिच्या भेटीला येऊन गेला होता, तिच्या आयुष्याचा उदास श्रावण मागे सारून चैतन्यश्रावणाची ओवाळणी तिच्या अंतरंगात भक्तीनिरांजने कायम तेवणाऱ्या तबकात ठेऊन गेला होता.


Rate this content
Log in