santosh selukar

Others

4.0  

santosh selukar

Others

आवळीची विहीर

आवळीची विहीर

2 mins
219


 पावसाळा सुरू झाला की परिसरातील विहीरी तुडूंब भरुन जायच्या.नदी नाले ओहोळ,ओढे बघता-बघता गढूळ पाण्याने भरून वाहायचे.रात्रभर पाऊस पडून गेल्यावर सकाळी डांबरी रस्ते जरी स्वच्छ होऊन जात असले तरी आम्हाला मात्र बारा महिणे आठरा काळ चिखलाच्या रस्त्यानेच ये-जा करावी लागायची. सकाळीच विहीरीवरुन पाणी आणण्यासाठी लोकांची लगबग सुरू व्हायची.भर पावसाळ्यातही आमच्याकडे पाणी टंचाई असायची.नळाला पाणी यायचे नाही,कधी पाईपलाईन फुटायची,कधी लाईट नसायची,इकडून-तिकडून आलेच नळाला पाणी तर ते पिण्यालायक नसायचे.आमचं पालम तसं खेडेगावंच दोन-चारशे घरं असतील त्यातही आमच्यासारखे खेड्यागावातून शिकण्याच्या निमित्ताने आलेल्या काही घरांची त्यात भर,पण सोयी सुविधेच्या नावानं मात्र बोंबाबोंबच.अगदी हातपंपासारख्या सुविधासुध्दा तेवढ्या प्रमाणात पोहोचलेल्या नव्हत्या.असुविधेच्या गर्तेत मग्न असणारं आमचं त्याकाळचं सोशिक जगणं मात्र खूपकाही पेलण्याची शक्ती देणारं होतं.सुदैवाने आजच्या पिढीला तांब्याही भरून घेण्याची गरज पडत नाही मग घागर अन् कावड तर लांबच !

    पाण्यासाठी बायकापोरांसह आवळीच्या विहीरीपासून पार मोतिराम महाराजांच्या मंदिरापर्यंत रांग लागायची.बायका डोक्यावर अन् पुरुष खांद्यावर घागरी घेऊन चिखलातील अरूंद पायवाटेने चालायचे.आमच्यासारखे पोरं-पोरी सुध्दा कळशी नाहीतर फिरकीचा तांब्या घेऊन निघायचे.एक रांग येणा-यांची दुसरी जाणा-यांची म्हणजे आजच्या भाषेत वन-वे ट्राफिकंच म्हणांना ! त्या रांगेला विशिष्ट गती प्राप्त व्हायची.गंमत म्हणजे सर्वांना एकाच गतीत चालावे लागायचे,गती चुकली तर रांगेच्या बाहेर गेलाच म्हणून समजा ! मग कोणी लवकर रांगेत घ्यायचे नाही.


    मधूनच कावड खांद्यावर घेऊन आलेल्या माणसामुळे भला मोठा रस्ता व्यापून जायचा.दोन बाजूला डब्बे एका काठीला साखळीने आडकवून खांद्यावर कावड घेऊन जाणारा,कमरेतून करकर वाकणारा माणूस चिखलातून कसरत करत चालायचा.पत्री डब्याचा धडधड आवाज यायचा.आत्ताच्या पिढीला कावड हा शब्द समजून सांगतांनाही तोंडाला फेस येईल अशी स्थिती आहे. 

सगळं दृश्य आज डोळयासमोरून तरळतांना आणि आठवतांना विलक्षण वाटंत असलं तरी त्यावेळी मात्र आमचं ते दैनंदिन सहज जीवन होतं.पाणी भरणे म्हणजे आवश्यक असणारं नित्यकाम,कुटूंबातील सर्वांनी मिळून पाणी आणावे लागायचे.आवळीची विहीर तुडूंब भरलेली असायची.हातानं वरुनच पाणी घेता यायचं.निळ्याशार पाण्यानं काठोकाठ भरलेल्या विहीरीचं नितळ,गोडं पाणी घेण्यासाठी गर्दी व्हायची.लगतच् तशीच शेन्नीची विहीर होती, तिथेही लोक पाणी भरत.विहीरीकडे जाण्याचा रस्ता फारच भारी होता.पावसामुळे सगळा रस्ता निसरडा व्हायचा.त्यावरून कोणी घसरून पडायचं मग काय हसायची मजा. दिवसभर तो किस्सा सर्वांना हसूहसू सांगायचा. एका रांगेत डोक्यावर घागरीचे ओझे घेऊन लोक चिखलातून चालत जायचे.चार-पाच खेपा करायचे.चिखलातून वहाणा घालून चालता येत नसे त्यामुळे कोणाच्याच पायात वहाणा नसायच्या. एखादी वाट पडली की लोक त्याच वाटेने वळायचे.चिखलात रोज चालून पायाला चिखल्या यायच्या.चिखल्या म्हणजे पायाच्या दोन बोटांमधील असणा-या नाजूक त्वचेला झालेल्या जखमा,त्या पसरू नये आणि ठणकू नये म्हणून बिब्याला विस्तवावर ठेवून सुई टोचून त्यातील गरम तेलाचा फणका बोटात द्यायचा.यामुळं पायाच्या बोटावर काळसर नक्षी दिसायची.अशा खाजगी उपचारामुळे एकदम टकाटक वाटायचे मग काय आवळीच्या विहिरीचं पाणी अधिकच गोड लागायचं !


Rate this content
Log in