SAURABH AHER

Others Children

4.4  

SAURABH AHER

Others Children

आत्मकथा, थोर मायबाप

आत्मकथा, थोर मायबाप

3 mins
284


      ईश्वरकृपेने माझा जन्म एका खेडेगावात झाला, नाशिक जिल्ह्यातील तिसगाव माझं गाव, आईवडील, मी व लहानभाऊ असा सुखी परीवार, अगदी शुन्यातुन विश्व निर्माण करणारे माझे मायबाप, जणु पंढरीतील विठोबा अन् रखुमाई ची जोडी . लहानपणापासुन अगदी गरीबीत परंतु पुर्ण संस्कारात अन् मायेच्या सावलीत वाढलेलो आम्ही दोघ भावंड,गरीबी अगदी जवळून बघीतलेली, मायबापाच्या कष्टाची जाणीव होतीच म्हणुन अगदी जिद्दीने अभ्यास करनार अशी मनाशी पक्की गाठ बांधलेली . 


परंतु आर्थिक परिस्थिती नसतानाही मुलांना शिकवण्याची त्यांची जिद्द आणखीच मनाला आधार द्यायची. लहान असताना शाळेतुन घरी आल्यावर माय शेतात असायची, मी व लहान भाऊ अनवाणी पावलांनी शेताच्या बांदाबांदाने पळत पळत आईबाबांना गाठायचो , माय दोघांनाही पदराखाली घ्यायची , मग हातात येईल ते काम करायचो सुर्य ढगाआड जाईपर्यंत. त्याचाही कष्टाचा बोझ कमी व्हायचा . जाणीव होती ना हो त्यांच्या कष्टांची . 

शाळेत जाताना माय डब्यात अर्धी भाकर व मिरचीचा ठेसा बांधुन द्यायची . घरात भाकर नसल्यास माय म्हणायची तुम्ही खावा मला भुक नायं, उपवास हाय माझा . मग आम्ही शाळेत जो भात भेटायचाना तो डब्यात घरी आणायचो अन् तीला सांगायचो आम्ही शाळेत खाल्ला तु खा . तीच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले की आम्ही दोघं अश्रूत नाव्हुन निघायचो . 


बघता बघता दिवस संपु लागलेत, मी दहावीत गेलो. त्यांचेही कष्ट संपत नव्हते, दिवसरात्र राबराब राबत होते . वाटायच शिक्षण सोडाव कारण पैसा भरपुर लागायचा, वाटायच त्यांना मदत करावी परंतु ते म्हणायचे लेका तू फक्त शिक आम्ही आहोत ना आणी हाच शब्द फार आधार देवुन जायचा, काम करून दहावीची परीक्षा दिली, पेपराच्या दिवशी देखील 5 किमीचा पायी प्रवास करून पेपर द्यायचो , संपली दहावी . पेपरही चांगले गेलेत , टेन्शन होत ते निकालाच, शेतीतील काम चालुच होती , पेरणीचे दिवस होते , एके दिवशी मका पेरणी चालु होती , मी ,आई व माझे वडील पेरणी करत होतो . अचानक शेजारचे काका धावत धावत आले , वडीलांना सांगीतले कि तुमचा दादा म्हणजे मी दहावीत सेंटरमध्ये पहीला आलो . मला आश्चर्याचा धक्काच बसला. पण त्या दिवशी मी आईवडीलांना खुपच आनंदात पाहीलं , अगदी आनंदाश्रू ओघळत होते . पेरणी संपली सायंकाळी घरी आलो , बाबा म्हणे मी येतो बाहेरुन, आईने स्वयंपाकात गोड केल. आणी वडीलांची वाट पाहत दारात बसलो , बाबा आलेत व माझ्या हातात पिशवी ठेवली , पेढ्याचा पुडा होता त्यात शेजारच्या काकाकडुन उसने पैसे आणुन त्यांनी माझ्यासाठी पेढा आणला होता . माझ्यासाठी सर्वात मोठ बक्षीस होत ते आणी महाप्रसाद देखील . 

ईश्वरालाही दया आली हळुहळु दिवस बदलले , परीस्थिती बदलली , पैसे आलेत परंतु मायबाप नाही बदलले , तसेच राहिलेत अगदी कष्टाळू .

 

शिक्षणासाठी बाहेर पडायचे होते , आईने मनावर दगड ठेवुन परवानगी दिली . वडीलांनी पैशांची जमवाजमव केली . शेवटी जाण्याचा दिवस उगवला आई तर लेकरू दुर जाणार या काळजीने दोन दिवस झोपलीच नव्हती . सकाळी लवकर उठली , मला घेवुन जाण्यासाठी शिदोरी बनवली . अन स्वयंपाकाला लागली , चेहरयावर दुःख व चिंता झळकत होती . माझी माय रडत होती . लेकराच्या काळजीने तीचे हृदय हेलावत होते . वडीलांचाही चेहरा पडला होता , ते बाहेर आले अन् मी पहील्यांदा त्यांच्या डोळ्यात पाणी पाहीले, बसची वेळ होत होती , आईने डबा भरून दिला , आपल्या माणसांची सवय मला झाली होती , ते माझ्या नजरेला दिसणार नव्हते . मन घट्ट केले व रस्ताला लागलो , भरलेल्या डोळ्यांनी आई बघतच राहीली .. 

आजही त्यांचा फोन आल्याशिवाय घश्यात घास उतरत नाही ..


Rate this content
Log in