विटाळ
विटाळ
मॅडम तुम्हीच शिकवलं ना,
अमिबा आणि अश्मयुगीन माणूस,
हीच आपली सुरवात,
आपणच ना निर्माते यांचे,
असतात देव,दानव,
हे दोन्ही आपल्यात,
माझ्या आईबापाच्या अंगात,
अगदी न चुकता,
म्हणे देवाचे वारं येतं,
महिन्यातून पाच दिवस,
माझ्याच घरातून,
माझंच घराबाहेर स्थलांतर होतं
म्हणे विटाळ पाळायचा असतो,
पण बाहेर बसल्यावर,
त्या काळात होणारा,
विखारी नजरांचा,
मला होणारा विटाळ,
मी कसा पाळावा,
मॅडम आम्ही देवाची लेकरं ना,
मग त्याला हा विटाळ,
चालत का नाही,
माझ्या आईबापातल्या देवाशी,
मॅडम तुम्ही याबाबत,
बोलत का नाही,
विटाळात मी करते सारे काम,
फक्त देव्हारा आणि माणसापासून,
राहते मी लांब,
खूप एकाकी आणि घृणास्पद वाटते
आणि जगणं माझं सगळं,
याच क्षणात गोठतं,
माझ्यापायी येते अपवित्रता,
तर जन्म दिला मला कसा,
मॅडम मीपण चालवायचा का,
हा विटाळाचा वारसा?
शिकवताना मुलींना,
मॅडम एक कराल का,
आयुष्यातून आमच्या,
हा विटाळ दूर साराल का?
