संध्याकाळ
संध्याकाळ
सोडून दे विचार सारे
वेळ स्वतःसाठी काढ जरा
तोडून दे बंध सारे
आनंद घेऊन बघ जरा ॥१॥
संसाराच्या श्रृंखला त्या
बाजूला तू सार जरा
श्वास घेण्या मोकळा तू
कर उंबरठा तो पार जरा ॥२॥
निळ्या आकाशाची निळाई
तिच्यात रंगून ,जा तू जरा
पाखरांचे सुरेल संगीत
हरवून जा तू भान जरा॥३॥
फेसाळलेल्या सागराच्या त्या
लाटांमध्ये ,तू भिज जरा
झुळझुळणार्या अवखळ नदीत
पाय घालूनी बस जरा ॥४॥
कोसळणाऱ्या पावसात तू
चिंब न्हाऊनी निघ जरा
इंद्रधनुचे सप्तरंग ते
घे अंगावरती उधळून जरा ॥५॥
किनाऱ्यावर वाळूमध्ये
बोटाने नक्षी काढ जरा
निसर्गातल्या कलाकुसरीत
छंद तुझे तू जप जरा ॥६॥
क्षितिजाला ही कवेत घेण्यास
धडपड ती ,तू कर जरा
स्वत्वाची जाणीव थोडी
तुझीच तू ग कर जरा ॥७॥
दुसऱ्यासाठी जगता जगता
स्वतःसाठी जग जर
इतरांना सुख देता देता
सुख स्वतःचे शोध जरा ॥८॥
जीवनात तू, तुझ्याच थोडी
डोकावून तू ,बघ जरा
आयुष्यातील काही क्षण ते
तुझ्याच साठी ठेव जरा ॥९॥
मावळतीच्या सूर्यास्ताचा
आनंद तो, तू घे ग जरा
उतरणीची संध्याकाळ ती
मृदू गंधित ,तू कर जरा ॥१०॥
