सख्या पावसा रे
सख्या पावसा रे
सख्या पावसा रे सांग
कधी येशील परतून
तुझ्या वाटेत पसरले
माझे उदास कोरडे मन
सख्या पावसा रे तू
भेटशील ना पुन्हा
पुसून टाकशील ना साऱ्या
विरहाच्या वेदना तेव्हा
सख्या पावसा रे असा
नको आता अंत पाहूस
भिजव वेड्या मनाला या
आता दूर नको सारुस
सख्या पावसा रे आता
नाही तुझ्याविना काही
पुन्हापुन्हा झुरतो जीव
तुझ्या भेटीची वाट पाही
सख्या पावसा रे असा
बरस या सखीसाठी
संपवण्या सारी तृषा
थेंब स्पर्शु दे रे ओठी
सख्या पावसा रे तुझी
अशी मिठी आता घाल
रुक्ष मनात स्वप्नांची
बीजे नवी रुजतील
सख्या पावसा रे तुझी
किती करू विनवणी
ये ना आता तरी मेघा
झाली जड़ रे पापणी
सख्या पावसा रे माझ्या
कर धारांचा वर्षाव
चिंब भिजू दे ही धरा
लावण्य हे बहराव
सख्या पावसा पावसा
आलास ना माझ्यासाठी
जन्मोजन्मीचे हे नाते
किती अतूट या प्रीतगाठी
तुझ्या स्पर्शाने लाभले
संजीवन या जीवास
याच एका क्षणासाठी
केला होता अट्टहास
